वडगाव मावळ, ता. २९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे गुरुवारी पुकारण्यात आलेल्या मावळ ‘बंद’ला वडगावमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. येथील आठवडे बाजारात ‘बंद’चा परिणाम जाणवला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामतीत अपघाती निधन झाले. मावळशी कायम संपर्क राहिल्याने त्यांच्या अकाली निधनामुळे तालुक्यात शोककळा पसरली. त्यांना श्रद्धांजली म्हणून मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मावळ ‘बंद’चे भावनिक आवाहन करण्यात आले होते. वडगाव बाजारपेठेतील व्यावसायिकांनी व व्यापाऱ्यांनी बुधवारी उत्स्फूर्तपणे दैनंदिन व्यवहार बंद ठेवले होते. गुरुवारी सकाळीही काही वेळ दुकाने बंद होती. पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुकाने उघडली. गुरुवारी येथील आठवडे बाजारात मात्र बंदचा परिणाम दिसून आला. सकाळी बाजार भरला नव्हता. दुपारी हळूहळू विक्रेते येण्यास सुरुवात झाली. प्रत्येक गुरुवारी मोठ्या प्रमाणावर विक्रेते माल विक्रीसाठी बाजारात येत असतात. मात्र, यावेळी ‘बंद’मुळे त्यांची संख्या रोडावली होती. ‘बंद’च्या पुकाऱ्यामुळे ग्राहकांची संख्याही कमी होती. नेहमीपेक्षा आज विक्रेते व ग्राहक या दोघांचीही संख्या फारच कमी असल्याचे बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले.
निवडणुकीचा प्रचार ठप्प
मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मंगळवारी सायंकाळी अर्ज माघारीची मुदत संपून लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराला वेग आला होता. उमेदवारांनी बुधवारपासून गावनिहाय प्रचार दौऱ्यांचे नियोजन केले होते. मात्र, बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला व दुपारी तालुक्याच्या माजी आमदार रूपलेखा ढोरे यांचे निधन झाले. या दुःखद घटनेची वार्ता तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व तालुक्यात शोककळा पसरली. प्रचाराची रणधुमाळी व धामधूम जागेवरच स्तब्ध झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना या घटनेचा धक्का बसला आणि त्याक्षणी प्रचार नव्हे, तर माणुसकीच अग्रक्रमावर आली. गजबजलेली प्रचार यंत्रणा अचानक शांत झाली आणि त्याची जागा दुःखाने घेतली. उमेदवारांनी स्वतःहून प्रचार दौरे रद्द केले. बुधवार व गुरुवार या दोन्ही दिवशी संपूर्ण तालुक्यात प्रचार ठप्प होता. सर्वत्र घडलेल्या दुःखद घटनेचीच चर्चा सुरू होती. सत्तास्पर्धा आणि राजकीय धावपळीतही कार्यकर्त्यांमध्ये संवेदना व माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय या कृतीतून दिसून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.