सोमेश्वरनगर, ता. २९ : ‘‘अजितदादा यांनी सोमेश्वर साखर कारखान्याच्या शेतकरी आणि कामगारांच्या प्रपंचात सुधारणा व्हावी म्हणून इतके कष्ट उपसले आहेत की ते सांगण्यासाठी माझ्याकडे आज शब्द नाहीत...’’ असे बोलत असतानाच सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षांना हुंदका फुटला आणि ते पुढे बोलू शकले नाहीत. माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनाही भरून आल्याने त्यांनी आवरते घेतले.
सोमेश्वर कारखान्याच्या उत्कर्षासाठी अजित पवार सन १९९२पासून गेली ३३ वर्षे प्रचंड झिजले आहेत. अडीच हजार टनी असणारा कारखाना त्यांनी दहा हजार टनी केला असून, सहवीज, अल्कोहोल, बायोगॅस असे उपपदार्थ प्रकल्पही उभारले आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, यासाठी गुरुवारी सायंकाळी संचालक, कामगार यांनी शोकसभा आयोजित केली होती. याप्रसंगी कामगार नेते तुकाराम जगताप, जेष्ठ संचालक शिवाजीराजे निंबाळकर, विश्वास जगताप, मिलिंद कांबळे, लक्ष्मण गोफणे, आनंदकुमार होळकर, संग्राम सोरटे, शैलेश रासकर, अभिजित काकडे, प्रणिता खोमणे, जितेंद्र निगडे, रणजित मोरे आदी उपस्थित होते. ‘अजितदादा अमर रहे’ अशा घोषणा सर्वांनी दिल्या.
याप्रसंगी जगताप यांच्या भावना अनावर झाल्या आणि ‘दादांबद्दल पुन्हा बोलीन, त्यांचे आपल्या सगळ्यावर डोंगरएवढे उपकार आहेत, त्यामुळे ते कायम स्मरणात राहतील,’ एवढे ते बोलू शकले. अजित पवार यांचे सन १९८७पासूनचे सहकारी व सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे म्हणाले, ‘‘अजितदादांमुळे सोमेश्वरसारख्या संस्था राज्यात नावारूपाला आल्या. त्या सक्षमपणे चालवून शेतकऱ्याना न्याय देण्याचे काम करणे, हीच श्रद्धांजली ठरेल. काही चुकीचे घडले तर आपण सगळे पापी ठरू. माझ्यासारख्या कॉलेज करून आलेल्या सामान्य कुटुंबातील तरुणाला ताकद देत दूध संघ, साखर कारखाना याचे पद देणे हे केवळ अजितदादा करू शकतात.’’
संचालक तुषार माहूरकर म्हणाले, ‘‘लहानपणी दादांच्या कडेवर बसण्याचे भाग्य मला लाभले आणि तरुण झाल्यावर संचालक करून मला खांद्यावर घेतले.’’ संचालक ऋषीकेश गायकवाड म्हणाले, ‘‘जनतेसाठी राबणाऱ्या नेत्याला ईश्वराने अवेळी घेऊन जाणे हा कसला कर्मयोग?’’ कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, ‘‘अजितदादा यांनी उभ्या केलेल्या संस्था, त्यांचे पुरोगामी व प्रगतशील विचार जपणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.’’
सुनील शिंदे, राहुल सोरटे या कामगारांनीही, ‘अजितदादा यांच्यामुळे आमचे प्रपंच सुरळीत सुरू होते, त्यांच्याकडे राज्याचे कामगारांचे प्रश्न तातडीने सुटत होते,’ अशा भावना मनोगतातून मांडल्या. भाऊसाहेब जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.