वाईत अजितदादांच्या आठवणींना उजाळा
सर्वपक्षीय शोकसभेत आदरांजली
वाई, ता. २ : उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासाचे चालते बोलते विद्यापीठ होते. वाई शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. राजकारण आणि समाजकारण काम करताना त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात वाईकरांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली.
येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण व समाजकारण केले. विकासकामांबाबत भेटण्याची अनेकदा संधी मिळाली. शहराचे नागरीकरण करताना सामान्य लोकांना आवश्यक मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, यावर त्यांचे बारकाईने लक्ष असे. समाजासाठी चांगले काम कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांच्याशी मैत्री करणारे त्यांचे नेतृत्व होते. आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पालिका प्रशासकीय इमारत, कृष्णा पूल, शाळा क्रमांक एक, भाजीबाजार अशा विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध दिल्याने खऱ्या अर्थाने वाईच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी धोम धरणातून पाणी उपलब्ध करण्याची संकल्पना दादांसमोर मांडली होती. त्यानंतर त्यांनी सहा महिन्यांत नवीन पाणीपुरवठा मंजूर केली. त्यांच्या कार्याच्या स्मृती लोकांसमोर कायम राहाव्यात, यासाठी फळ आणि भाजीपाला मार्केट इमारतीला दादांचे नाव देण्यात यावे, अशी इच्छा काहींनी व्यक्त केली आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.’’
या वेळी ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड, माजी उपसभापती विजय नायकवडी, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, डॉ. नितीन कदम, गोविंद इथापे, काँग्रेसचे प्रदीप जायगुडे, नगरसेवक विजय ढेकाने, नगरसेविका डॉ. जीविता जमदाडे, भारत खामकर, तेजपाल वाघ, अरुण आदलिंगे, मनीषा घैसास, संतोष काळे आदींनी अजित पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहिली. सचिन अनपट यांनी प्रास्ताविक केले. सामूहिक पसायदानाने सेवेची सांगता झाली. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-----
07546
वाई : अजित पवार यांच्या शोकसभेत बोलताना नगराध्यक्ष अनिल सावंत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.