पुणे

देवराई, वाघजाई आणि यात्रा

CD

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं अजिवली गाव. गावाच्या वेशीवर वाघजाईचं दगडी मंदिर आणि त्यासमोर आकाशाशी स्पर्धा करणारं सायरीचं झाड. गावापासून तीन किलोमीटरवर माडाच्या झाडांनी दाटलेली देवराई. तिच्या काळोख्या कुशीत शेंदूर फासलेल्या अनघड शिळेच्या रूपात वाघजाईचं मूळ स्थान. वर्षातून एकदा भरणाऱ्या यात्रेत या देवीच्या भेटीला येणाऱ्या देवकाठ्या, भगताची भाकणूक, ढोलांचा गजर आणि पुरणपोळीचा दरवळ. या सगळ्या गोष्टी केवळ श्रद्धेच्या नाहीत; त्या निसर्गाशी जोडलेल्या जगण्याच्या आहेत. झाडात देव पाहणाऱ्या आणि रानाला देवाच्या नावानं जपणाऱ्या गावकऱ्यांनी परंपरेच्या पदरात पर्यावरणसंवर्धनाची शिदोरीही बांधली आहे. अजिवलीची वाघजाई म्हणूनच एका गावाची देवी न राहता निसर्ग आणि माणसाच्या नात्याची साक्ष बनते.
- प्रणव पाटील
---------------------------

रानाच्या कुशीत विसावलेली वाघजाई
पुण्याहून दीड-दोन तासांचा प्रवास करून कोळवण, हडशी, जवणचा मार्ग धरला की पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय मागे पडतो. डोंगरांच्या रांगांमध्ये वळणावळणाने जाणारा रस्ता अजिवलीकडे घेऊन जातो. दुपार सरत आलेली असते. डोंगरउतारावर विसावलेल्या घरांच्या छपरांवर उन्हाची तिरपी किरणं उतरलेली असतात. एरवी शांत असणारं गाव मात्र यात्रेच्या निमित्तानं जागं झालेलं असतं. पुण्या-मुंबईत स्थायिक झालेली गावची माणसं परतलेली असतात. बंद असलेल्या जुन्या मावळी घरांचे दरवाजे उघडलेले असतात. अंगणं सारवलेली असतात आणि घराघरांत पाहुण्यांच्या स्वागताची लगबग सुरू असते. गावाच्या वेशीवरच मधोमध वाघजाईचं दगडी मंदिर उभं आहे. त्याच्या भोवती उतरत्या छपरांची जुनी घरं आणि त्यांच्या शेजारी उभ्या राहिलेल्या नव्या बांधणीच्या इमारती. काळ बदलल्याच्या खुणा गावाच्या वास्तूत दिसतात; पण गावाच्या मनात रुजलेल्या श्रद्धेच्या मुळांना अजूनही धक्का लागलेला नाही. मंदिरासमोर सायरीचं भलंमोठं झाड आहे. त्याचा जाडजूड बुंधा आणि आकाशाकडे झेपावलेल्या फांद्या पाहिल्या की नकळत नजर वर जाते. आसपासच्या परिसरात त्याच्या तोडीचं दुसरं झाड सहज दिसत नाही. झाडाच्या सावलीत पांढरे शुभ्र कपडे आणि गांधी टोप्या घातलेली गावातली ज्येष्ठ मंडळी यात्रेच्या तयारीत बसलेली दिसतात. मंदिरासमोर रंगीत मांडव उभारलेला असतो. तरुण मंडळी रात्रीच्या रोषणाईसाठी मंदिरावर दिव्यांच्या माळा चढवत असतात. मंदिरात प्रवेश करताच जुन्या लाकडी तुळ्यांवरील नक्षीकाम लक्ष वेधून घेतं. मुख्य देवता वाघजाई असली, तरी प्रवेशद्वाराजवळचा नंदी कुतूहल जागवतो. गाभाऱ्यात देवीच्या मूर्तीवर चांदीचे मुखवटे विराजमान झालेले असतात. फुलांचे हार, उदबत्तीचा सुगंध आणि पुरणपोळीच्या नैवेद्याची ताटं यांमुळे मंदिरात उत्सवाचं वातावरण भरून राहिलेलं असतं. दर्शन घेऊन बाहेर पडताच गावकरी सांगतात, “यात्रेला अजून वेळ आहे. तोपर्यंत राईतल्या वाघजाईचं दर्शन घेऊन या.” राई! गावकऱ्यांच्या बोलण्यातला हा साधा शब्द जंगलाच्या एका वेगळ्याच जगाची दारं उघडणारा असतो. आपल्या परिसरात देवराईला राई म्हणण्याची प्रथा आहे. काही भागांत तिला बन असेही संबोधलं जातं. नाव कोणतंही असो, या राईत केवळ झाडं उभी नसतात; पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या श्रद्धेची मुळंही खोलवर रुजलेली असतात.

देवराईच्या काळोखातलं उजेडाचं स्थान
गावातून देवराईकडे जाणारी वाट घरांच्या मधून पुढे सरकते. आणखी एक वाट गावाला वळसा घालून राईच्या दिशेनं जाते. दोन्ही वाटा एकत्र येतात आणि पुढे मातीचा कच्चा रस्ता सुरू होतो. पायाखाली माती, भोवती डोंगर आणि हळूहळू दाट होत जाणारी झाडी. गाव मागे पडतं तसं सभोवतालच्या आवाजांची जागा पक्ष्यांच्या हाका आणि पानांच्या सळसळीने घेतलेली असते. साधारण तीन किलोमीटरची पायपीट करून देवराईत प्रवेश होतो. सुरुवातीला विरळ वाटणारी झाडी काही अंतरावर इतकी दाट होते की दुपारच्या वेळीसुद्धा संध्याकाळ उतरल्याचा भास होतो. झाडांच्या फांद्यांनी आकाश झाकून टाकलेलं असतं. जमिनीवर उन्हाचे कवडसे शोधावे लागतात. रस्त्याच्या कडेला पडलेली पानं, ओलसर मातीचा गंध आणि उंच झाडांच्या सावल्या यांमुळे आपण एखाद्या रहस्यकथेतील जंगलात आलो आहोत, असं वाटतं.
या देवराईचं वैशिष्ट्य म्हणजे भेरली माडाची झाडं. सह्याद्रीच्या काही देवराया तिथल्या विशिष्ट वृक्षांमुळे ओळखल्या जातात. हिरडोशीची हिरड्यांची राई, शिरकोळीची वेळूची राई आणि अजिवलीची माडाची राई. प्रत्येक देवराईचं स्वतःचं असं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. झाडांची जात, त्यांची घनता आणि परिसराशी जुळलेलं नातं त्या राईची ओळख बनवतं. थोडासा चढ चढून पुढे गेल्यावर वाघजाईचं मंदिर दिसतं. अलीकडे बांधलेल्या या मंदिरात प्रवेश करताच डोंगराच्या पोटात गेलेली एक मोठी नैसर्गिक घळ नजरेस पडते. लांबवर गेलेली ही अरुंद घळ आत किती खोलवर पसरली आहे, याचा अंदाज येत नाही. तिच्या तोंडाशी शेंदूर लावलेली अनघड शिळा वाघजाई म्हणून पूजली जाते. यात्रेचा दिवस असल्याने शिळेसमोर फुलांचा खच पडलेला असतो. खणानारळाने देवीची ओटी भरलेली असते. पुरणपोळीचा नैवेद्य, उदबत्तीचा धूर आणि घळीच्या तोंडाशी पसरलेला अंधार यांमुळे तिथे एक गूढ शांतता जाणवते. निसर्गानं तयार केलेल्या या मंदिरात मानवी हातांनी बांधलेल्या वास्तूचा थाट नाही; पण श्रद्धेची श्रीमंती मात्र भरभरून आहे. गावकरी सांगतात, “या घळीत आत खूप दूरवर पाण्याचं कुंड आहे, असं पूर्वीची माणसं सांगायची.” मंदिराच्या बाजूला झाडाच्या खोडाखाली आणखी एक नैसर्गिक घळ दिसते. अशा जागा पाहताना निसर्गाच्या पोटात किती अनोळखी रहस्यं दडलेली असतील, याचा विचार मनात येतो. या घळींची खोली आणि त्यांचं स्वरूप यांचा शास्त्रीय अभ्यास झाल्याशिवाय त्यांच्याविषयी ठाम निष्कर्ष काढता येणार नाहीत; पण गावकऱ्यांच्या स्मृतीत त्या श्रद्धेचा अविभाज्य भाग बनून राहिल्या आहेत. देवराईचा नेमका विस्तार किती, याबाबत गावकऱ्यांकडून वेगवेगळी माहिती मिळते. काहींच्या मते, हा परिसर सुमारे बावीसशे एकरांचा आहे. प्रत्यक्ष मोजणीशिवाय त्याची खात्री करता येत नसली, तरी या जंगलाचं स्थानिकांसाठी असलेलं महत्त्व निर्विवाद आहे. शेतांच्या सीमा आणि देवराईची हद्द यांमधली रेषा बाहेरच्यांना सहज दिसणार नाही; मात्र पिढ्यान्‌पिढ्या इथे राहणाऱ्या गावकऱ्यांना ती ठाऊक आहे. देवराईतल्या झाडांकडे केवळ लाकूड किंवा उत्पन्नाचं साधन म्हणून पाहिलं जात नाही. देवीचं स्थान असलेल्या या रानाला हात लावण्यापूर्वी विचार करावा लागतो, ही भावना त्यामागे आहे. श्रद्धेने आखलेली ही मर्यादा जंगलाच्या रक्षणासाठी महत्त्वाची ठरते.

रानातून गावाच्या विकासाचा मार्ग
अजिवलीच्या देवराईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माडीच्या झाडांपासून मिळणारं उत्पन्न. या झाडांशी निगडित हंगामी व्यवहारासाठी दरवर्षी लिलाव केला जातो. गणेशोत्सवाच्या सुमारास होणाऱ्या या लिलावातून वर्षभरासाठी झाडांपासून उत्पन्न घेण्याची व्यवस्था केली जाते. मिळालेलं उत्पन्न ग्रामपंचायतीकडे जमा होतं आणि गावाच्या विकासासाठी त्याचा उपयोग केला जातो.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार, या व्यवहारातून वर्षाकाठी पंधरा ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. हा आकडा वर्षानुसार बदलू शकतो. मात्र देवराईचं संरक्षण आणि गावाच्या अर्थकारणाची सांगड कशी घातली जाऊ शकते, याचं अजिवली हे उदाहरण ठरतं. निसर्ग वाचवायचा म्हणजे त्याच्याकडे पाठ फिरवायची, असं नाही. त्याचं महत्त्व ओळखून, त्याची मर्यादा सांभाळून आणि त्याच्या पुनर्निर्मितीक्षम साधनांचा जबाबदारीनं वापर करून विकासाचा मार्ग शोधता येतो. अजिवलीच्या माडाच्या झाडांनी गावाला दिलेला आर्थिक आधार या विचाराला बळ देतो. गावाच्या नावाबाबतही काही स्थानिक अर्थ लावले जातात. ‘अज’ म्हणजे स्वयंभू आणि ‘वली’ हा शब्द ‘पल्ली’शी जोडला जातो, अशी एक व्युत्पत्ती सांगितली जाते. डोंगराच्या कुशीत वसलेलं स्वयंभू स्थान, असा त्याचा अर्थ लावला जातो. या व्युत्पत्तीची ऐतिहासिक भाषाशास्त्रीय खातरजमा स्वतंत्रपणे व्हायला हवी; मात्र डोंगर, देवराई आणि स्वयंभू देवस्थान यांचं अजिवलीच्या जगण्यातलं नातं पाहिलं की या अर्थामागची स्थानिक भावना समजते.

पालखीच्या पावलांनी जागं झालेलं गाव
संध्याकाळ जवळ येताच देवराईतील मंदिरात गावचे मानकरी जमू लागतात. देवीची पालखी सजवली जाते. पालखीत वाघजाईच्या नावानं दुर्गादेवीचा फोटो पूजेसाठी ठेवलेला असतो. मागे अब्दागिरी घेऊन एक गावकरी चालतो. ढोलांचा आवाज घनदाट रानात घुमू लागतो आणि पालखी गावाच्या दिशेनं मार्गस्थ होते.
रानातून गावाकडे येणारी ही पालखी म्हणजे केवळ देवतेची मिरवणूक नसते. ज्या जंगलात देवीचं मूळ स्थान आहे, तिथून ती गावातल्या माणसांना भेटायला निघालेली असते. डोंगर आणि वस्ती यांच्यातला दुवा जणू त्या पालखीच्या रूपानं चालत आलेला असतो. गावातल्या घरांसमोर रांगोळ्या काढलेल्या असतात. उंबरठ्यांवर सुवासिनी आरतीची ताटं घेऊन उभ्या असतात. पालखी येताच त्या खांदेकऱ्यांचे पाय धुतात आणि देवीचं दर्शन घेतात. वर्षभर बंद असलेल्या पिढीजात घरांच्या अंगणात पुन्हा माणसांचा वावर सुरू झालेला असतो. नोकरी-व्यवसायानिमित्त दूर गेलेली मुलं, शहरात संसार थाटलेली कुटुंबं आणि गावातच राहिलेली ज्येष्ठ मंडळी एका धाग्यानं जोडली जातात.

पालखी मात्र गावातल्या मंदिरात लगेच जात नाही. ती एका वस्तीवर थांबते. रात्री गावाची प्रदक्षिणा करून दुसऱ्या दिवशी मंदिरात जाण्याची परंपरा आहे. पालखीच्या प्रत्येक थांब्यावर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी ओढ ही परंपरेच्या जिवंतपणाची खूण आहे. यात्रेच्या गर्दीत गावातल्या ज्येष्ठांकडून वाघजाईच्या कथा ऐकायला मिळतात. परिसरात महादेव कोळी समाजातील एक भक्त होता. त्याच्या आग्रहाखातर डोंगरकड्यावरच्या देवीने देवराईत ठाणं केलं, अशी आख्यायिका सांगितली जाते. पुढे वय झालेल्या पुजाऱ्याला रानात जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून देवीने गावाजवळही स्थान निर्माण केलं, असं गावकरी सांगतात. देवीची सेवा करणाऱ्या कोळी घराण्याला त्यानुसार मानपान आणि काही जमीन देण्यात आली, अशी स्थानिक परंपरेत नोंद आहे. वाघापासून रक्षण करणारी देवी, अशी वाघजाईची श्रद्धेतील ओळख आहे. कधी काळी या भागात वाघांचा अधिवास असावा, असा अंदाज या नावावरून बांधता येतो; आज मात्र परिसरात अधूनमधून बिबट्या दिसत असल्याचं गावकरी सांगतात. रान आणि माणूस यांच्यातलं जुनं नातं अशा कथांतून डोकावत राहतं.

भगताची भाकणूक आणि देवकाठ्यांचा गजर
गावातल्या मंदिराभोवती आता गर्दी वाढलेली असते. केंडे घराण्यातील भगत देवीसमोर भाकणूक करण्यासाठी सज्ज झालेला असतो. काही ग्रामस्थ त्याला उचलून मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत आणतात. त्याच्या गळ्यात फुलांचे हार असतात. हातात वेताची काठी घेऊन तो लोकरीच्या घोंगडीवर बसतो. ढोलांचा नाद वातावरणात भरून राहतो.
तेवढ्यात शेजारच्या शिळीम, वाघेश्वर आणि जवण या गावांतून देवकाठ्या येऊ लागतात. या गावांच्या ग्रामदेवता भैरवनाथ आहेत आणि वाघजाई ही त्यांची बहीण, अशी स्थानिक मान्यता आहे. बहिणीच्या यात्रेला भेट देण्यासाठी भैरवनाथ देवकाठ्यांच्या रूपानं येतात, असं गावकरी सांगतात. उंच बांबूंना रंगीत कापडी पताका लावलेल्या असतात. शेंड्यावर आंब्याच्या डहाळ्यांचा तुरा असतो. त्या काठ्या तोल सांभाळत, ढोलांच्या तालावर डोलत मंदिराच्या दिशेनं पुढे येतात. गर्दीत लहान मुलं आईच्या पदराला धरून हा सोहळा पाहत असतात. पुरुषांच्या पांढऱ्या पोशाखांत आणि गांधी टोप्यांतून जुन्या ग्रामीण परंपरेची झलक दिसते, तर रंगीबेरंगी साड्यांत सजलेल्या स्त्रिया यात्रेच्या उत्साहाला वेगळाच रंग देतात.
देवकाठ्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून सायरीच्या झाडाजवळ येतात. त्या झाडाला दोन-तीनदा टेकवल्या जातात. प्रथमदर्शनी हा एखादा विधी वाटतो; पण गावकरी सांगतात की या झाडात देवाचं अस्तित्व मानलं जातं.

आणि मग त्या दृश्याचा अर्थ बदलतो.
ज्या झाडाखाली गावची ज्येष्ठ मंडळी बसलेली होती, ज्या झाडानं मंदिराच्या परिसराला सावली दिली होती, त्याच झाडाला आता देवकाठ्या स्पर्श करत होत्या. झाड हे केवळ लाकूड, पानं आणि फांद्यांनी बनलेलं सजीव रूप नसून त्यात दैवी अस्तित्व आहे, अशी आदिम भावना या विधीतून प्रकट होत होती. निसर्गातील घटकांना पवित्र मानण्याची परंपरा माणसाच्या इतिहासात किती खोलवर रुजलेली आहे, याची जाणीव त्या क्षणी होते.
यात्रेत बागाडाची परंपराही होती. बागाडाचा जुना लाकडी खांब मोडल्यामुळे ही प्रथा गेल्या दोन-तीन वर्षांपासून बंद असल्याचं समजतं. तरीही या विधीशी निगडित काही धार्मिक कृती केल्या जातात. कोळी घराण्यातील एका तरुणाच्या पाठीत गळ टोचण्याचा विधी भगताच्या उपस्थितीत पार पडतो. त्या वेळी पांढरं कापड धरलं जातं. गळ टोचलेला तरुण हातात दिवा असलेलं आरतीचं ताट घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतो. ढोलांचा गजर आणि जमलेल्या लोकांची नजर या विधीकडे खिळलेली असते.
अशा प्रथा पाहताना त्यामागच्या श्रद्धेचा आणि ऐतिहासिक संदर्भांचा आदर राखणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर मानवी आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. परंपरा टिकवताना तिचं स्वरूप काळानुरूप सुरक्षित पद्धतीनं जपता येतं, याचाही विचार व्हायला हवा. देवकाठ्यांची पूजा झाल्यानंतर भगत, पुजारी आणि मानकरी पुन्हा मंदिरात जमतात. आरती सुरू होते. मंदिराच्या आवारात गर्दी उसळलेली असते. प्रत्येक जण हात जोडून देवीसमोर नतमस्तक होतो. ढोलांचा नाद, दिव्यांचा उजेड आणि एकाच वेळी उमटणारा आरतीचा स्वर यांत वातावरण भारून जातं. आरती संपते आणि यात्रा सुरू झाल्याची जाणीव गावाला होते. घराघरांत पुरणपोळीचा सुगंध दरवळतो. मंदिराच्या पारावर गप्पांचे फड रंगतात. शहरात राहणारे गावकरी एकमेकांची विचारपूस करतात. कुणी जुन्या आठवणी सांगतं, कुणी गावात झालेल्या बदलांचा हिशेब मांडतं, तर कुणी पुढच्या पिढीला देवीच्या यात्रेचे किस्से ऐकवतं.यात्रा अशा रीतीनं केवळ देवदर्शनापुरती मर्यादित राहत नाही. ती नात्यांची उजळणी असते. गाव सोडून गेलेल्यांना पुन्हा गावाशी जोडणारा धागा असते. नव्या पिढीला आपल्या मुळांची ओळख करून देणारी अनौपचारिक शाळा असते.

देवराई : श्रद्धेच्या पलीकडचं पर्यावरणभान
अजिवलीच्या वाघजाईच्या यात्रेतून परतताना मनात अनेक प्रश्न आणि विचार फेर धरतात. कधीकाळी या डोंगररांगांमध्ये घनदाट जंगल पसरलेलं असावं. रानटी प्राण्यांच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांना आपल्या जनावरांचं आणि वस्तीचं रक्षण करण्याची गरज भासली असावी. अशा काळात वाघजाईसारख्या रक्षक देवतेची कल्पना आकाराला आली असेल. देवतेचं स्थान असलेलं जंगल पवित्र मानलं गेलं असेल आणि त्या पावित्र्याच्या भावनेतून त्याला हात लावण्यावर मर्यादा आल्या असतील.
हा घटनाक्रम इतिहासातील सिद्ध निष्कर्ष म्हणून मांडता येत नसला, तरी देवराईच्या अस्तित्वामागची एक संभाव्य सामाजिक-सांस्कृतिक प्रक्रिया म्हणून त्याकडे पाहता येतं. जंगलाचं रक्षण करण्यासाठी कायदे किंवा आधुनिक पर्यावरणशास्त्राची भाषा उपलब्ध नसलेल्या काळात श्रद्धेनं काही मर्यादा घालून दिल्या असतील. त्या मर्यादांमुळे झाडं, वनस्पती, पक्षी आणि वन्यजीवांसाठी सुरक्षित जागा टिकून राहिली असण्याची शक्यता आहे.
देवराई ही केवळ झाडांची गर्दी नसते. अशा जंगलांमध्ये स्थानिक जैवविविधता टिकून राहण्यास मदत होऊ शकते. झाडांच्या मुळांमुळे माती धरून राहते. पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास हातभार लागतो. अनेक सूक्ष्मजीव, कीटक, पक्षी आणि इतर जीवांना अधिवास मिळतो. काही वनस्पतींचे पारंपरिक औषधी उपयोगही स्थानिक ज्ञानातून पिढ्यान्‌पिढ्या जतन झालेले असतात. प्रत्येक देवराईचं पर्यावरणीय महत्त्व तिच्या प्रत्यक्ष अभ्यासातून समजून घेणं आवश्यक असलं, तरी या पवित्र वनपरंपरेचं संवर्धन करण्यामागे मोठा निसर्गहिताचा अर्थ दडलेला आहे.
अजिवलीच्या बाबतीत या संरक्षणाला आर्थिक बाजूही जोडलेली दिसते. माडीच्या झाडांपासून मिळणारं उत्पन्न गावाच्या विकासासाठी वापरलं जातं. त्यामुळे राई टिकली तर तिचं सांस्कृतिक महत्त्वच नव्हे, तर गावाच्या अर्थकारणालाही आधार मिळतो. निसर्ग आणि विकास यांच्यात संघर्षच असतो, असं नाही; योग्य व्यवस्थापन असेल तर दोघांनाही बळ देणारा मार्ग शोधता येतो. या सगळ्यात गावच्या परंपरांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू जाणवतो. यात्रेचे मानपान, पुजारी घराण्याची सेवा, देवकाठ्यांचं आगमन, पालखीचा मार्ग, सायरीच्या झाडाची पूजा अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून गावाचा सामूहिक इतिहास पुढच्या पिढीकडे पोहोचतो. या प्रथा केवळ पुस्तकांत लिहून टिकत नाहीत. त्या प्रत्यक्ष जगाव्या लागतात. मुलांनी त्या पाहाव्या लागतात. ज्येष्ठांनी त्यांचे अर्थ सांगावे लागतात. मानकऱ्यांनी जबाबदारीनं त्या पुढे न्याव्या लागतात. म्हणूनच यात्रेचा दिवस हा भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा दिवस असतो. एका पिढीनं जपलेलं दुसऱ्या पिढीच्या हातात सोपवण्याचा तो क्षण असतो.

अंधारात उजळलेलं अजिवली
संध्याकाळ आता पूर्णपणे उतरलेली असते. मंदिरावरच्या रोषणाईनं दगडी वास्तू उजळून निघते. सायरीच्या झाडाची उंच सावली रात्रीच्या आकाशात विरघळते. यात्रेसाठी आलेल्या माणसांची लगबग अजूनही सुरू असते. गावकरी जेवणाचा आग्रह करतात; पण परतीचा प्रवास लांबचा असल्याने निरोप घ्यावा लागतो.
गावाबाहेर पडताना मागे वळून पाहिलं की डोंगराच्या कुशीतलं अजिवली उजळून निघालेलं दिसतं. काही तासांपूर्वी शांत भासणारं गाव आता ढोलांच्या नादानं, दिव्यांच्या प्रकाशानं आणि माणसांच्या आवाजानं भरलेलं असतं. पण या उजेडाचा खरा अर्थ मंदिरावरच्या विद्युत रोषणाईपुरता मर्यादित नाही. गावापासून तीन किलोमीटरवर अंधारात विसावलेली देवराईही त्याच उजेडाचा भाग आहे. तिथल्या झाडांमध्ये, नैसर्गिक घळीमध्ये आणि शेंदूर लावलेल्या शिळेमध्ये गावकऱ्यांच्या श्रद्धेचा इतिहास जिवंत आहे. त्या श्रद्धेनं रानाला पवित्र मानलं आणि रानानं गावाला निसर्गाची संपत्ती दिली. आज पर्यावरणाचा ऱ्हास, वाढतं शहरीकरण आणि जंगलांवरील वाढता ताण यांची चर्चा मोठ्या व्यासपीठांवर होते. त्याच वेळी सह्याद्रीच्या कुशीतली काही गावं आपल्या स्थानिक परंपरांतून निसर्गाशी असलेलं नातं जपत आहेत. त्यांच्या अनुभवांतून आधुनिक पर्यावरणसंवर्धनाला काही महत्त्वाचे धडे मिळू शकतात.
अजिवलीच्या वाघजाईनं दिलेला हा धडा साधा आहे. निसर्गाचं रक्षण करण्यासाठी त्याचं महत्त्व केवळ उपयोगात मोजता कामा नये. त्याच्याशी भावनिक नातं जोडावं लागतं. त्याला आपलं मानावं लागतं. झाडात देव दिसला की त्याला तोडण्यापूर्वी हात थबकतो; रान पवित्र वाटलं की त्याचा विनाश करण्यापूर्वी मन विचार करतं. अर्थात, श्रद्धा ही संवर्धनाची एकमेव हमी नाही. बदलत्या काळात देवराईची हद्द स्पष्ट करणं, झाडांची शास्त्रीय नोंद ठेवणं, नैसर्गिक जलस्रोतांचं संरक्षण करणं आणि उत्पन्न मिळवताना जंगलाचं आरोग्य अबाधित राखणंही आवश्यक आहे. परंपरेला आधुनिक पर्यावरणभानाची जोड मिळाली, तर अशा देवराया पुढच्या अनेक पिढ्यांसाठी टिकून राहू शकतात.
अजिवलीची यात्रा म्हणूनच एका देवीच्या उत्सवाची कहाणी नाही. ती डोंगर, जंगल, गाव, माणसं आणि त्यांच्या सामूहिक स्मृतींची गोष्ट आहे. पालखीच्या पावलांबरोबर चालत आलेली परंपरा आणि झाडांच्या सावलीत विसावलेली श्रद्धा यांचा इथे सुंदर संगम दिसतो. रात्रीच्या गडद अंधारात अजिवलीची दिव्यांनी उजळलेली वस्ती मागे पडत जाते. मात्र मनात एक दृश्य कायम राहतं-देवकाठ्या सायरीच्या झाडाला टेकलेल्या, ढोलांचा नाद घुमणारा आणि त्या सगळ्या गजबजाटाच्या पलीकडे शांतपणे उभं असलेलं हिरवं रान. त्या रानाच्या काळोखातही एक उजेड आहे. तो श्रद्धेचा आहे, सहजीवनाचा आहे आणि निसर्ग जपण्याच्या सामूहिक शहाणपणाचा आहे.

झाडात देव आणि रानात संस्कृती
अजिवलीच्या यात्रेत सायरीच्या झाडाजवळ देवकाठ्या टेकवण्याचा विधी हा केवळ धार्मिक सोपस्कार नाही. झाडात देवाचं अस्तित्व मानणाऱ्या जुन्या लोकपरंपरेची ती जिवंत खूण आहे. आधुनिक पर्यावरणशास्त्राने जंगलातील जैवविविधता, माती, पाणी आणि वन्यजीवांच्या अधिवासाचं महत्त्व स्पष्ट केलं; पण अनेक गावांनी श्रद्धेच्या बळावर काही वनक्षेत्रं आधीपासूनच जपली आहेत. देवराई ही अशाच परंपरेतून टिकून राहिलेली जागा. अजिवलीत माडीच्या झाडांपासून मिळणारं उत्पन्न गावाच्या विकासासाठी वापरलं जातं. म्हणजेच श्रद्धा, संवर्धन आणि स्थानिक अर्थकारण यांची सांगड इथे दिसते. या परंपरेला शास्त्रीय व्यवस्थापनाची जोड मिळाली, तर देवराईचं वैभव पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Comscore रिपोर्टमध्ये ई-सकाळ महाराष्ट्रातील नंबर 1 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म; 5.5 कोटींहून अधिक युनिक व्हिजिटर्स

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

सचिन तेंडुलकरसोबत केलं भारतीय संघात पदार्पण; वयाच्या २८ व्या वर्षी क्रिकेटमधून घ्यावी लागली निवृत्ती

Latest Marathi News Update: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला नोटीस

Elon Musk Prediction: भविष्यात नोकरी करण्याची गरज उरणार नाही! एलॉन मस्क यांचा मोठा धमाका

SCROLL FOR NEXT