AKK26B06413
सोलापूर : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे निवेदन देताना आमदार सचिन कल्याणशेट्टी.
---
अक्कलकोट दुष्काळग्रस्त जाहीर करा
आमदार कल्याणशेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; नुकसानभरपाईचा आग्रह
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट शहर, ता. १२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई आणि शेतीसमोरील संकटाबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली.
यंदा अक्कलकोट तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विविध जलप्रकल्पांमध्येही अपेक्षित पाणीसाठा नसल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, अशी मागणी कल्याणशेट्टी यांनी केली.
टंचाईग्रस्त गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा छावण्या व चारा डेपो सुरू करावेत. बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई व अग्रिम मदत द्यावी, तसेच दुष्काळी परिस्थितीत कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करू नये, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेऊन शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा आणि उपलब्ध जलसाठ्याचे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने नियोजन करावे, असेही आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
-----
AKK26B06415
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन देताना आमदार सचिन कल्याणशेट्टी.
---
रिंगरोडसाठी मैंदर्गी-सोलापूर
रोडदरम्यान बायपासची मागणी
कल्याणशेट्टींनी घेतली मंत्री गडकरी यांची भेट
अक्कलकोट शहर : अक्कलकोट शहरातील भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रिंगरोड पूर्ण करण्यासाठी मैंदर्गी रोड ते सोलापूर रोडदरम्यान नवीन बायपास उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी परिवहन भवन, नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
अक्कलकोट-तडवळ- कोर्सेगाव- टाकळी एसएच- २११ मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच एनएच- ५४८ बी, एनएच-१५० ई आणि एनएच-५२ या मार्गांच्या विकासामुळे भविष्यात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. सध्या एनएच-१५० ईमुळे रिंगरोडचा काही भाग उपलब्ध असून, उर्वरित भाग एनएच-५४८ बीला जोडून मैंदर्गी रोड ते सोलापूर रोडदरम्यान बायपास उभारल्यास शहराला पूर्ण वळसा देणारी वाहतूक व्यवस्था निर्माण होईल. त्यामुळे अवजड वाहतूक शहराबाहेरून वळवून कोंडी व अपघातांचा धोका कमी करता येईल.
---
कोट
अक्कलकोटच्या वाढत्या शहरीकरणासह धार्मिक पर्यटन आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक लक्षात घेता रिंगरोडची गरज भविष्यात आणखी वाढणार आहे. प्रस्तावित बायपासला लवकर मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवू.
- आमदार सचिन कल्याणशेट्टी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.