लोगो : विशेष मुलाखत
---
YSH26B05102
रेश्मा अडगळे
---
अकलूजच्या नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध
नगराध्यक्षा रेश्मा अडगळे : स्वच्छ अन् आदर्श शहराचा संकल्प
शशिकांत कडबाने : सकाळ वृत्तसेवा
अकलूज, ता. १ : अकलूज शहराच्या विविध विकासकामांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यातील मंजूर विविध विकासकामे चालू आहेत. अकलूज शहराचा नियोजनबद्ध व शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
---
प्रश्न : आगामी काळात शहर विकासासाठी काय नियोजन केले आहे?
गेल्या काही वर्षांत अकलूज शहराची लोकसंख्या व व्यापारी वसाहतींमध्ये वाढ झाली आहे. त्या प्रमाणात पायाभूत सुविधा सक्षम करणे गरजेचे झाले आहे. ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर सुमारे चार वर्षे प्रशासकराज होते. या काळात आवश्यक असणारी विकासकामे झाली नाहीत. त्या सर्व विकासकामांना सुरवात करीत असून रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी सांडपाणी योजना, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
---
प्रश्न : अकलूज शहरातील प्रमुख समस्या कोणत्या?
शहरात वाढती वाहतूक कोंडी, पाणीटंचाईचे काही भागातील प्रश्न, तसेच जुन्या गटार व्यवस्थेची दुरुस्ती ही प्रमुख आव्हाने आहेत. झोपडपट्टीमुक्त अकलूज ही संकल्पना आहे. मुख्य चौकांमध्ये वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. पार्किंग व्यवस्था व रस्ते रुंदीकरणाचे प्रस्ताव तयार आहेत.
---
प्रश्न : पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी काय उपाययोजना करणार आहात?
अकलूज शहरात दैनंदिन पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नवीन जलकुंभ व जलवाहिनी बदलण्याची कामे चालू आहेत. ‘स्वच्छ अकलूज’ अभियानांतर्गत दररोज स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नवीन जागेची मागणी केलेली आहे, तो ही प्रकल्प अधिक सक्षम केला जाणार आहे.
---
प्रश्न : युवक व महिलांसाठी कोणते उपक्रम घेणार आहात?
युवकांसाठी व्यायामशाळा, वाचनालय व उच्चशिक्षणासाठी अभ्यासिका उभारण्याचा प्रस्ताव आहे. महिलांसाठी स्वयंसाहाय्य गटांना प्रोत्साहन, प्रशिक्षण कार्यशाळा व उद्योजकतेसाठी विशेष योजना राबविण्यात येतील.
---
प्रश्न : आगामी विकास आराखडा काय असणार आहे?
शहरात आधुनिक आरोग्य केंद्र, सुसज्ज बाजारपेठ, हरित उद्याने तसेच स्मार्ट सिटी संकल्पनेवर आधारित सीसीटीव्ही व एलईडी लाइट प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. शासनाकडून जसा निधी मिळेल तशी टप्प्या- टप्प्याने सर्व प्रलंबित कामे सुरू केली जाणार आहेत. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या भावनेतून सर्वांनी विकासकामांना सहकार्य करावे. अकलूज शहराला आदर्श व स्वच्छ शहर बनविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, ‘सहकारमहर्षी’चे अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक बनविणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.