पुणे, ता. ११ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात घेतलेल्या बौद्ध धम्मदीक्षेच्या स्मृतींना दस्तऐवज स्वरूपात जतन करणारा दुर्मीळ खंड लवकरच उच्च शिक्षण विभागातर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. खंडामध्ये धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मीळ पत्रव्यवहार, कागदपत्रे, निवेदने, संदर्भसाहित्य आणि विविध ऐतिहासिक दस्तऐवजांचा समावेश करण्यात येणार आहे. या खंडाचे प्रकाशन दसऱ्याच्या दिवशी २० ऑक्टोबरला करण्यात येईल, अशी माहिती उच्च शिक्षण विभागाने दिली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. खंडाच्या निर्मितीचे काम अधिक वेगाने पूर्ण करून संपादन, संकलन, मुद्रण आणि प्रकाशनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. दर्जेदार संपादनासह दस्तऐवजांची सत्यता, संदर्भमूल्य आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे पाटील यांनी बैठकीत नमूद केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर उपलब्ध असलेल्या दुर्मीळ पत्रव्यवहाराचा, महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा आणि अन्य संदर्भ साहित्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध, संकलन, वर्गीकरण आणि जतन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागपुरातील ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ, त्या काळातील सामाजिक वातावरण, नियोजन, पत्रव्यवहार आणि विचारप्रवाह या खंडाच्या माध्यमातून व्यापकपणे समोर येण्यास मदत होईल, असे डॉ. देवळाणकर यांनी सांगितले.
‘‘धम्मदीक्षा हा केवळ धार्मिक परिवर्तनाचा क्षण नसून भारतीय समाजजीवनात समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना नवे अधिष्ठान देणारा ऐतिहासिक टप्पा होता. त्यामुळे या घटनेशी संबंधित असलेले मूळ पुरावे, पत्रे आणि दस्तऐवज भावी संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत. म्हणूनच या विशेष खंडाचे महत्त्व अनन्यसाधारण असणार आहे.’’
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.