मंचर, ता. १२ : आंबेगाव तालुक्यात आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आखाड पार्टीचा अनेकांचा बेत असल्याने चिकन, मटण, गावरान कोंबड्या आणि मासळी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक, पेठ, रांजणी, एकलहरे, कळंब, निरगुडसर, डिंभे, शिनोली आदी प्रमुख गावांतील मांसविक्री केंद्रे आणि हॉटेलमध्ये दिवसभर गर्दी दिसून आली.
श्रावण व भाद्रपद महिन्यात अनेक कुटुंबांत मांसाहार वर्ज्य केला जात असल्याने आषाढाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मांसाहाराची खरेदी करण्यात आली. तालुक्यात सुमारे १५ टनांहून अधिक चिकन आणि पाच टनांहून अधिक मटणाची विक्री झाल्याची माहिती विक्रेते इसाक शेख यांनी दिली. हॉटेलमध्ये खवय्यांची ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली, असे हॉटेल व्यावसायिक हर्षद शिंदे यांनी सांगितले.
मंचर शहरात मटण व चिकन विक्रीची सुमारे २५ लहान-मोठी दुकाने असून, मासळी विक्रीची सात दुकाने आहेत. पुणे व मुंबई येथून दोन टेम्पोद्वारे सुमारे दोन टन मासळी तालुक्यात विक्रीसाठी आणली जाते. तसेच डिंभे, वडज धरण परिसर, मीना व घोड नदीतून मासळी विक्रीसाठी आणणाऱ्यांची संख्या १५०पेक्षा अधिक आहे. स्थानिक पातळीवरही सरासरी सात टनांहून अधिक मासळी उपलब्ध होते. आखाड पार्टीनिमित्त तालुक्यात एकूण सुमारे नऊ टन मासळीची विक्री झाल्याची माहिती मंचर येथील मासळी विक्रेते असिफ शेख यांनी दिली.
गावठी कोंबड्यांनाही ग्राहकांकडून विशेष मागणी होती. आकारानुसार एका गावठी कोंबडीला ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. मित्रमंडळी, नातेवाईक आणि पाहुणे एकत्र येऊन घरगुती मांसाहारी मेजवानीचे आयोजन करत असल्याने सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू होती.
बाजारभाव प्रतिकिलो
बॉयलर चिकन : २२० ते २४० रुपये, गावरान चिकन : सुमारे ३०० रुपये, मटण : ८०० ते ८४० रुपये, गावठी कोंबडी : ५०० ते १,००० रुपये.
ओले बोंबील : ६०० रुपये, कोळंबी ः ५०० रुपये, पापलेट : १,००० ते १,२०० रुपये, कटला : २४० रुपये
हलवा : १८० रुपये, राहू : १८० रुपये, वाम : ६०० रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.