आठ हजारांची गर्दी
देशाचा आवाज नाही
अमित शहा : काँग्रेसने पराभवासाठी तयार राहावे
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १४ : ‘‘चौदा पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आणून दीड किलोमीटरच्या क्षेत्रात आठ हजारांची गर्दी गोळा करून तुम्ही देशाचा आवाज होऊ शकत नाही,’’ अशी टीका करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. तसेच, नकारात्मक राजकारणाने काँग्रेसला फायदा होणार नाही. राहुल गांधी आणि काँँग्रेसने २०२९ साली प्रचंड पराभवासाठी पुन्हा मनाची तयारी करावी, असा सल्ला दिला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणीच्या (एसआयआर) मुद्द्यावरून राहुल गांधींसह विरोधी पक्षांनी अलीकडच्या काळात जोरदार निदर्शने केली आहेत. विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन छेडले आहे. त्यावर शहा यांनी पलटवार केला. ते म्हणाले, ‘‘एसआयआरच्या बहाण्याने घुसखोरांना वाचविण्याची राहुल गांधी यांची योजना देशाच्या जनतेने ओळखली आहे. देशाचा आवाज शेतांमध्ये, गावांमध्ये, दूर पर्वतांमध्ये, जंगलांमध्ये आणि नद्यांच्या काठांवर आहे, काँग्रेस पक्ष तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. बिहार, उत्तर प्रदेश, तमिळनाडूसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये अनेक दशकांपासून काँग्रेसला जनतेने नाकारले आहे आणि पराभूत केले आहे. माध्यमांसाठी घडवलेले बनावट इव्हेंट आणि ‘असत्याची गूंज’ करून तुम्ही देशाच्या जनतेचा विश्वास संपादन करू शकत नाही.’’
काँग्रेसचा निवडणुकीतील पराभव काही नवीन नाही. त्यांनी गुजरात, आसाम, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराच्या निवडणूक आकडेवारीचा हवाला देत राहुल गांधींना आत्मपरीक्षण करण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘गांधीनगरच्या निवडणुकीत भाजपचा प्रचंड विजय झाला आहे. मी राहुल गांधींना विचारू इच्छितो, हा ‘एसआयआर’चा परिणाम आहे का? तुम्ही ४१ वर्षांपासून एकही निवडणूक जिंकू शकलेले नाही. हा राहुल गांधींसाठी आत्मपरीक्षणाचा विषय असला पाहिजे. नुकताच तमिळनाडू, बंगाल आणि पुदुच्चेरीमध्ये पोटनिवडणूक झाली. येथे काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. आसामच्या नौगावमध्ये भाजपचा उमेदवार एक लाख ४२ हजार मतांनी जिंकला आणि ही जागा आधी काँग्रेसकडे होती.’’ त्रिपुरामध्ये ३३ वर्षे आणि बंगालमध्ये ५६ वर्षांपासून काँग्रेसला विजय मिळालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.