पुणे, ता. २१ : ‘‘प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा जपणाऱ्या हस्तलिखितांचा ठेवा केंद्र सरकारच्या ‘ज्ञानभारतम्’ अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात सर्वांसाठी खुला होणार आहे,’’ असे केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचे संचालक इंद्रजित सिंग यांनी सांगितले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला दिलेल्या भेटीत सिंग यांनी महाराष्ट्रातील हस्तलिखितधारक निवडक व्यक्ती आणि काही संस्थांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. राज्यातील शंभराहून अधिक व्यक्ती आणि संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. हस्तलिखितांची नोंदणी, जतन, डिजिटायझेशन आणि संशोधन करण्याच्या उपक्रमात भांडारकर संस्थेसह रामटेकचे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय या संस्थांचे समूह केंद्रे म्हणून; तर आनंदाश्रम संस्था आणि भारत इतिहास संशोधक मंडळ हे स्वतंत्र केंद्र म्हणून सहभागी आहेत.
‘सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्रात चांगल्या स्वरूपाचे झाले असून विद्वत्ता आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांत महाराष्ट्र या प्रकल्पातही अग्रेसर राहील,’ असा विश्वास ‘ज्ञानभारतम्’चे प्रकल्प-संचालक डॉ. अनिर्वाण दाश यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रासाठी ‘ज्ञानभारतम्’चे नोडल ऑफिसर म्हणून काम करणारे राज्य पुराभिलेख विभागाचे संचालक सुजित उगले यांनी आजवर झालेल्या कामाचा आणि सर्वेक्षणाचा आढावा घेतला. नुकत्याच झालेल्या हस्तलिखितांच्या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातून सात लाख पोथ्यांची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी केंद्र समन्वयक डॉ. वीणा राज उपस्थित होत्या. भांडारकर संस्थेच्या नियामक परिषदेचे सदस्य मनोज एरंडे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले. मानद सचिव सुधीर वैशंपायन यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.