पुणे

जलसंस्कृतीचा अखंड प्रवाह

CD

जलसंस्कृतीचा अखंड प्रवाह

मुठा नदीच्या खोऱ्यातील या धरणांमुळे पावसाळ्यातील पाणी साठवून त्याचा उपयोग वर्षभर केला जातो. पानशेत आणि वरसगाव ही धरणे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करण्यासाठी उपयुक्त आहेत. टेमघर धरणही या जलव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. या धरणांमधून उपलब्ध होणारे पाणी खडकवासला धरणात सोडले जाते आणि तेथून कालव्यांद्वारे शेतीसाठी तसेच आवश्यकतेनुसार शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते. धरणांची ही साखळी पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी साठवण्यास, उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करण्यास आणि शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास मदत करते. धरणांमुळे पूरनियंत्रण आणि पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यासही मदत होते.
- डॉ. स्मिता पाटसकर
-----------------------------------------------------------------------
पाणी हे जीवन आहे. पृथ्वीवरच्या जीवनाची सुरुवातच मुळी पाण्यातून झाली. गोड्या पाण्याच्या शोधासाठी मानव पृथ्वीवर भटकला आणि पाण्याच्या स्त्रोताच्या आसपास स्थिरावला. मनुष्यवस्ती वाढली आणि त्यातून पाण्याला अटकाव करून, म्हणजेच धरणे बांधून साठा करणे शक्य झाले. सद्यस्थितीला हा साठाही कमी पडू लागला आहे. यातूनच आपण पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीखाली साठवून त्याचा योग्य तेव्हा वापर करण्याचे नियोजन करत आहोत, यालाच आपण ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ असे म्हणतो. पावसाचा प्रत्येक थेंब आपल्यासाठी मोलाचा आहे. दुसरे असे की आता पाणी वाहून नेण्यासाठी विविध पाइप उपलब्ध आहेत. कमी उंचीवरून अधिक उंचीवर पाण्याचे वहन करण्यासाठी पंप उपलब्ध आहेत. पण हजारो वर्षांपूर्वी मानवाने पाणी साठवण्यासाठी काय काय प्रयत्न केले असतील? जगात अनेक ठिकाणी झालेल्या उत्खननातून या गोष्टींवर प्रकाश पडला आहे. कित्येक गड किल्ल्यांवर निर्माण केलेले जलव्यवस्थापन आजही अस्तित्वात आहे. इतिहासाच्या या निरनिराळ्या टप्प्यांवर मानवाच्या चातुर्याने निर्माण केलेले पाण्याचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी आपण पाचेक हजार वर्षे मागे जाऊन सुरुवात करूया.

सिंधू संस्कृतीतील जलव्यवस्थापन
सिंधू नदीच्या काठावर मोहोंजोदारो आणि हरप्पा ही दोन शहरे भरभराटीला आली होती. व्यवसाय आणि सर्व प्रकारची सामाजिक व्यवस्था उत्तम होती. याचे एक प्रमुख कारण पाणी व्यवस्थापन होते. तेथील आपल्याला ज्ञात असलेली पाण्याची व्यवस्था बघूया. दक्षिण आशियातील प्राचीन सिंधू संस्कृती, ज्यामध्ये आजचा पाकिस्तान आणि उत्तर भारतातील काही भाग समाविष्ट होतो, ही पायाभूत सुविधा, जल अभियांत्रिकी आणि स्वच्छता व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत प्रगत होती. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक साधनांची व प्रणालींची ही जगातील ज्ञात प्राचीन उदाहरणे मानली जातात.

सिंधू संस्कृतीतील बहुतेक घरे माती, उन्हात वाळवलेल्या मातीच्या विटा किंवा भाजलेल्या विटांपासून बांधलेली होती. या संस्कृतीतील शहरी भागांमध्ये सार्वजनिक तसेच खासगी स्नानगृहांची व्यवस्था होती. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी अचूकपणे रचलेल्या विटांपासून भूमिगत गटारे बांधण्यात आली होती. पाण्याच्या साठवणुकीसाठी अनेक जलाशय निर्माण करून एक विकसित जलव्यवस्थापन प्रणाली उभारण्यात आली होती. घरांमधील सांडपाणी लहान नाल्यांमधून मोठ्या सार्वजनिक गटारांमध्ये सोडले जात असे. मोहेंजोदडो येथील अनेक इमारती दोन किंवा अधिक मजल्यांच्या होत्या. छतावरील आणि वरच्या मजल्यांवरील स्नानगृहांमधील पाणी बंदिस्त भाजलेल्या मातीच्या नळ्यांद्वारे किंवा उघड्या नळ्यांद्वारे रस्त्यावरील गटारांमध्ये सोडले जात असे.

जमिनीखालील गटार व्यवस्था
हरप्पा, मोहेंजोदडो आणि अलीकडे उत्खननातून समोर आलेल्या राखीगढी येथे प्राचीन नागरी स्वच्छता व्यवस्थेचे सर्वांत जुने पुरावे आढळतात. शहरातील प्रत्येक घराला किंवा घरांच्या समूहाला विहिरींमधून पाणी मिळत असे. अनेक घरांना स्वतंत्र विहिरी होत्या, तसेच सामुदायिक विहिरींचीही व्यवस्था होती. पाणी सर्वांना उपलब्ध होईल, अशा पद्धतीने त्याचे नियोजन केले जात असे. पाणी जमिनीच्या पातळीवरून उचलण्यासाठी शाडूफ आणि साकिया यांसारख्या साधनांचा वापर केला जात असे. सिंधू संस्कृतीतील अनेक घरांच्या मध्यवर्ती अंगणात कपडे किंवा वस्तू धुण्यासाठी स्वतंत्र चौथरा तसेच शौचालय किंवा कचरा विसर्जनासाठी विशिष्ट खड्डा असे. घरातील मध्यवर्ती विहिरीतून आणलेले पाणी मातीच्या भांड्यातून शौचालयात ओतले जात असे. हे पाणी मातीच्या विटांनी बांधलेल्या नळीतून सामायिक विटांच्या गटारात जात असे आणि तेथून जवळच्या शोषखड्ड्यात (सेसपिट) सोडले जात असे. या शोषखड्ड्यांमधील घन पदार्थ वेळोवेळी बाहेर काढले जात असावेत आणि त्यांचा खत म्हणून वापर केला जात असण्याची शक्यता आहे. बहुतेक घरांमध्ये स्वतंत्र खासगी विहिरीही होत्या. मोहेंजोदडोमधील बहुतेक घरांमध्ये किमान एक खासगी विहीर होती. यावरून त्या काळातील पाणीपुरवठा व्यवस्था किती विकसित होती, हे स्पष्ट होते.
उत्खनन केलेल्या क्षेत्रांमध्ये आढळलेल्या विहिरींच्या संख्येच्या आधारे असा अंदाज आहे की, मोहेंजोदडो शहरात ७०० पेक्षा अधिक विहिरी असू शकतात. याउलट, हडप्पा येथे आतापर्यंत उत्खनन केलेल्या भागांमध्ये केवळ आठ विहिरी आढळल्या असल्यामुळे, तेथे विहिरींची संख्या सुमारे तीस इतकी कमी असावी, असा अंदाज आहे. या दोन शहरांमधील फरकाची काही संभाव्य कारणे आहेत. मोहेंजोदडो येथे हिवाळ्यात तुलनेने कमी पाऊस पडत असावा. हडप्पा शहराच्या मध्यभागी असलेली मोठी खोलगट जागा हा एक मोठा तलाव किंवा जलाशय असण्याची शक्यता आहे. शहरातील विविध वस्त्यांमधील रहिवाशांना या जलाशयाचा वापर करता येत असावा. यानंतर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या शहरातही अशा प्रकारची प्रणाली काही बाबतीत जास्त आधुनिक झालेली दिसते. याचे उदाहरण आपल्याला धोलावीरा या ठिकाणी पाहायला मिळते. गुजरातमध्ये वसलेले धोलावीरा हे इसवीसन पूर्व सुमारे ३००० ते १५०० या कालखंडातील महत्त्वाचे शहर आहे. येथे पाणी साठवण्यासाठी अनेक जलाशय आणि पायऱ्यांच्या विहिरी बांधण्यात आल्या होत्या. धोलावीरा येथील जलव्यवस्थापन प्रणाली वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. येथे किमान पाच स्नानगृहे होती. त्यांपैकी एका स्नानगृहाचा आकार मोहेंजोदडो येथील महास्नानगृहाशी तुलनीय आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे ही या शहराची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. या शहरासाठी आवश्यक असलेले बहुतांश पाणी पावसाळ्यात मोठ्या दगडी जलकुंडांमध्ये साठवले जात असे. पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी बांधलेले नाले आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे नाले स्वतंत्रपणे बांधलेले होते. यावरून पावसाचे पाणी साठवणे आणि सांडपाण्याचा निचरा करणे यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती, हे स्पष्ट होते. अतिशय उत्तम रीतीने बांधलेली पायऱ्यांची विहीर हे धोलावीराचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. जलव्यवस्थापन आणि जल अभियांत्रिकी क्षेत्राचा अचूक वापर करून त्याकाळी हजारो माणसांची तहान आणि दैनंदिन गरज भागात असे.

धोलावीराची अद्‍भूत व्यवस्था
सिंधू संस्कृतीतील नद्यांच्या काठी वसलेल्या शहरांच्या तुलनेत, धोलावीरा हे एका कोरड्या बेटावर वसलेले होते, त्याच्या चारही बाजूंना मिठाची दलदल होती. येथे जगणे केवळ व्यापार किंवा प्रशासनावरच नव्हे, तर त्याहूनही अधिक मूलभूत गोष्टीवर अवलंबून होते आणि ती म्हणजे पाणी. येथे पाणीसंवर्धनाची एक प्रगत प्रणाली विकसित करून पाणीटंचाईच्या आव्हानावर मात केली होती. ही प्रणाली त्यांच्या काळाच्या कित्येक शतके पुढची होती. वस्तीच्या बाहेर वाहणाऱ्या दोन हंगामी ओढ्यांवर बांध घालून, त्याचे पाणी जलाशये, कालवे आणि जमिनीखालील टाक्यांच्या एका विस्तीर्ण जाळ्यामध्ये वळवले. उत्खननादरम्यान शहराच्या तटबंदीच्या आत १६ जलाशये सापडली आहेत, ज्यामुळे दुष्काळातही पाण्याचा अखंड पुरवठा सुनिश्चित होत असे. यातील एक जलाशय मोहेंजोदडो येथील ''ग्रेट बाथ'' (महास्नानगृह) पेक्षा तीनपट मोठा आहे, जे धोलावीराच्या जलव्यवस्थापनविषयक कल्पकतेचे उत्तम उदाहरण आहे. गुजरातमधीलच लोथल या ठिकाणी उत्खनन केले असताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना समोर आल्या. लोथल हे इसवी सन पूर्व सुमारे २३५० ते १९०० या कालखंडातील महत्त्वाचे हडप्पाकालीन स्थळ आहे. उत्खननात शहरातील दोन विहिरी आढळल्या. त्यांपैकी एक उंच वसाहतीच्या भागात (ॲक्रोपोलिस) आणि दुसरी गोदीजवळ होती. ॲक्रोपोलिसमधील डझनाहून अधिक घरांमध्ये स्वतंत्र स्नानचौथरे होती. त्यांमधील सांडपाणी जिप्समयुक्त गिलाव्याने जोडलेल्या विटांच्या झाकलेल्या सामुदायिक गटारांमध्ये सोडले जात असे. हे गटार शहराच्या भिंतीबाहेरील शोषखड्ड्यात रिकामे होत असे. ॲक्रोपोलिसमधील एका तुलनेने मोठ्या घरात स्नानचौथऱ्याला जोडलेले शौचालय होते. त्यातील सांडपाणी स्वतंत्र उघड्या नाल्यातून शहराच्या गोदीत सोडले जात असे. शहराच्या खालच्या भागात तळाशी छिद्र असलेली मोठी, जमिनीत पुरलेली मातीची भांडी आढळली आहेत. त्यांचा वापर द्रव कचरा जमिनीत मुरवण्यासाठी केला जात असे. ही भांडी नियमितपणे रिकामी करून स्वच्छ केली जात असावीत.

लेण्यामध्येही पाण्याचे व्यवस्थापन
दीर्घकालीन दुष्काळामुळे जलसाठे कमी झाले, व्यापारात घसरण झाली आणि एकूणच या प्राचीन शहरांच्या अस्तित्वावर परिणाम झाला असावा. शिवाय वारंवार येणारे पूर, नदीच्या प्रवाहातील बदल, पर्जन्यमानातील घट आणि पर्यावरणीय समस्यांमुळे शहराच्या ऱ्हासाला हातभार लागला असावा आणि कोणे एकेकाळी भरभराटीला असलेली ही शहरे काळाच्या पडद्याआड गेली.
मधल्याकाळात जनजीवन सुरूच होते. पावसाळ्यात पाणी मिळणे आणि ते वर्षभर पुरवून वापरणे ही नित्याची बाब होती. अशाच काही शतकांच्या नंतर आलेल्या बौद्ध काळातील जलव्यवस्थापनावर नजर टाकूया. बौद्ध भिक्षू भगवान बुद्धाच्या निर्वाणानंतर धम्म प्रचारासाठी देशभर गेले. त्यांच्यासाठी ठिकठिकाणी चैत्यगृहे आणि राहण्यासाठी विहार बांधण्यात आले. या विहारांमधील जलव्यवस्थापन प्रणाली ही अत्यंत प्रगत आणि पर्यावरणपूरक होती. महाराष्ट्रातील कान्हेरी आणि अजिंठा यांसारख्या दगडात कोरलेल्या गुंफांमध्ये याचे उत्तम पुरावे पाहायला मिळतात. पावसाळ्यात भिक्षू एकाच ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य (वर्षावास) करत असल्याने, वर्षभर पाण्याचा पुरवठा होण्यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित वितरण प्रणाली विकसित करण्यात आली होती. डोंगरावर निवास करत असल्याने पाण्याचा मुख्य स्रोत हा पाऊस होता. त्यामुळे पावसाचे पाणी गोळा करणे आणि ते वर्षभर साठवण्यासाठी व्यवस्था करणे हे अतिशय आवश्यक असायचे. याच्यासाठी भिक्षूंनी डोंगराच्या उतारावर, गुंफांच्या छतावर आणि खडकांवर खास पन्हाळे कोरले होते, जेणेकरून पावसाचा प्रत्येक थेंब गोळा करता येईल. गुंफांच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा पाण्याच्या मार्गावर खडकात खोल पाण्याच्या टाक्या कोरल्या जात असत. बाष्पीभवन कमी व्हावे म्हणून या टाक्यांचे वरचे तोंड लहान आणि आतील भाग विस्तीर्ण असायचा. मुख्य टाक्यांमध्ये पाणी जाण्यापूर्वी ते एका शुद्धीकरण प्रणालीतून जात असे, जिथे माती आणि कचरा खाली बसायचा आणि स्वच्छ पाणी साठवले जायचे. बौद्ध विहाराच्या जवळच किंवा तिथेच खालच्या बाजूला या टाक्या कोरण्यात येत असत ज्यामुळे भिक्षूंना पाणी घेणे सोयीचे व्हावे.

हंपीतही होते सुंदर जलव्यवस्थापन
कित्येक उतारांवर आपल्याला कपडे धुण्याच्या जागाही दिसतात. वरच्या स्तरावरून येणाऱ्या पाण्याने कपडे नीट धुता यावेत म्हणून खडकांनाही गोलाकार आकारात कापलेले दिसते. कपडे पिळण्यासाठीसुद्धा खास सोय केली होती. म्हणजे तेसुद्धा पाणी वापरात यावे यासाठी किती खटाटोप केलेला होता. त्यानंतर हेच वापरलेले पाणी शेतीसाठी आणि इतर स्वच्छतेसाठी वापरले जाई. पूर्णपणे काळ्या दगडावर कोरलेल्या या कान्हेरी गुंफांना तुम्ही कधी भेट द्याल तेव्हा एखाद्या उंच ठिकाणी उभे राहून खाली नजर टाका आणि कल्पना करा की हजार-पंधराशे वर्षांपूर्वी याच ठिकाणी जवळपास दोन हजार बौद्ध भिक्षू राहत होते. त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमाची सांगड उत्तम रीतीने केलेल्या जलसंवर्धनाशी केली होती. उच्च रवाने शिक्षण घेतानाच निसर्गाच्या ‘पाणी’ या अत्यंत सुंदर आविष्काराचे जतन अत्यंत निगुतीने केले होते. आता आपण ६०० ते ७०० वर्षे मागे जाऊन हंपी या जगप्रसिद्ध ठिकाणाला भेट देऊया. कर्नाटकातील हे ठिकाण बेंगळुरूहून ३४० किमी उत्तरेस तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले आहे. एकेकाळी जगातील अत्यंत समृद्ध आणि सर्वात मोठे शहर मानले जाणारे हे ठिकाण आज भग्नावस्थेत असले, तरी येथे सुमारे ४० चौरस किलोमीटर परिसरात पसरलेली एक भव्य जलव्यवस्थापन प्रणाली दिसून येते. इसवी सन १३३६ ते १५६५ या काळात दगडात बांधलेली तळी, कालवे आणि जलवाहिन्यांचे जाळे हंपीच्या या विस्मयकारक प्राचीन जलव्यवस्थापन प्रणालीचा भाग आहेत. हे जलवाहिन्यांचे जाळे हंपीच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले होते. याद्वारे एका बाजूला तुंगभद्रा नदीतून, तर दुसऱ्या बाजूला कमलपुरा येथील सरोवरातून (जे अधिक उंचीवर स्थित आहे) पाणी आणले जात असे. योग्य उतार असलेल्या दगडी जलवाहिन्यांमधून हे पाणी वर्षभर ''पुष्करणी'' (पवित्र कुंड) किंवा इतर तळ्यांपर्यंत पोहोचवले जात असे.

पाण्याची शुद्धता राखली जाई
मध्यप्रदेशातील मांडू या ठिकाणी पंधराव्या आणि सोळाव्या शतकात बांधल्या गेलेल्या जहाज महाल येथे सुद्धा जलव्यवस्थापनाचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळतो. २००० फूट उंचीवर स्थित असलेल्या या प्रदेशात कोणतीही नदी नाही की नैसर्गिक पाण्याचा स्रोत नाही, त्यामुळे येथील रहिवासी पाण्यासाठी फक्त पावसावर अवलंबून होते. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा होता. जवळपास ८० चौरस किलोमीटर परिघात वसलेल्या या राजधानीने अनेक राजकीय उलथापालथ पाहिली. सत्तेच्या या गदारोळात मात्र येथील निर्माण केलेले जलव्यवस्थापन आपल्याला अचंबित करते.
पाणी जमा करणे आणि स्वच्छ पाणी साठवणे हे काम अतिशय कौशल्याने केले गेलेले आपल्याला दिसते. छतावरचे पाणी जमा करून अनेक चॅनेल्समधून तिथेच बांधलेल्या टाक्यांमध्ये साठवले जात होते. गोळा केलेले पाणी राजवाड्याच्या जलतरण तलावांपर्यंत किंवा पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी, ते शुद्धीकरण प्रक्रियेतून जात असे. राजवाड्याच्या छतावरून येणारे पावसाचे पाणी विशेष गाळण-रचनांमध्ये वळवले जात असे. पाण्यात विरघळलेले स्थायू पदार्थ आणि अशुद्धी काढून टाकण्यासाठी, ते वाळू, कोळसा, खडे, चुनखडी आणि गवत यांच्या नैसर्गिक थरांमधून क्रमाने गाळून घेतले जात असे. गाळण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, पाणी अतिशय सुंदररीत्या घडवलेल्या, सर्पिल आकाराच्या दगडी वाहिन्यांतून आणि कमानी असलेल्या जलमार्गांतून पुढे जात असे. या रचनेची भूमिती दोन महत्त्वाची कार्ये साधत असे: एक म्हणजे पाण्याचा वेग कमी करणे. वळणावळणाचे मार्ग पावसाच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करत, ज्यामुळे संरचनेची धूप टळत असे. शिवाय सर्पिल प्रवाहामुळे पाण्यात नैसर्गिकरीत्या हवा मिसळली जात असे. यामुळे ''कमल कुंड'' (कमळाच्या आकाराचा जलाशय) किंवा कासवाच्या आकाराच्या कुंडात पाणी जमा होण्यापूर्वी त्याची गुणवत्ता आणि ताजेपणा सुधारत असे.
पाण्याची प्रणाली थेट राजवाड्याच्या भिंती आणि खांबांमध्ये समाविष्ट केलेली होती. जेव्हा पाणी या पोकळ मार्गांतून वाहत असे, तेव्हा त्याद्वारे थंड हवा राजवाड्याच्या खाजगी कक्षांमध्ये (जनाना) खेळती राही. अशा प्रकारे मध्य भारतातील कडक उन्हाळ्याच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी एक प्राचीन वातानुकूलन (एअर कंडिशनिंग) व्यवस्था निर्माण केली गेली होती. या पाण्यात ऑक्सिजन जास्तीत जास्त मिसळावा यासाठी खवल्याखवल्यांसारख्या पृष्ठभागावरून खाली येत असे. असे घरंगळत येणारे पाणी किती सुरेख नाद निर्माण करत असेल, नाही का? अशीच रचना काश्मीरमध्ये चश्मेशाही बागेतही आपल्याला दिसते.

गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावरील जलरचना
याचबरोबर जहाज महालात राजांच्या विलासासाठी निर्माण केलेल्या वाफेच्या स्नानगृहात गरम आणि गार पाण्यासाठी असलेले चॅनेल्स अत्यंत शास्त्रीय रीतीने जोडण्यात आलेले आपण पाहू शकतो. कलात्मकता आणि अभियांत्रिकी यांचा इतका सुंदर मेळ क्वचितच कुठे केला गेलेला असावा.
या सर्वांहून निराळी आणि अधिक प्रगत अशी एक अद्भुत जलव्यवस्थापन आपल्या पुण्यातही अस्तित्वात होते. पेशवे काळात (१८ वे शतक) पुण्यातील पाणीपुरवठा आणि व्यवस्थापन करणारी ही प्रणाली जल-अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना होती. १७४९ मध्ये बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही प्रणाली पुण्यातील ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला अखंडितपणे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवत असे. ही संपूर्ण प्रणाली कोणत्याही बाह्य मोटारी किंवा विजेचा वापर न करता, केवळ गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर कार्यरत होती. याची रचना चार मुख्य अभियांत्रिकी स्तंभांवर आधारित होती:

१. दुहेरी धरण आणि गाळ साठवणूक प्रणाली: वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी, नानासाहेब पेशवे यांनी शहराच्या दक्षिण सीमेवर, कात्रज येथे दगडी बांधकामाची दोन धरणे उभारली. वरचा जलाशय प्रामुख्याने डोंगराळ ओढ्यांतून वाहून येणारा गाळ, वाळू, चिखल आणि इतर नैसर्गिक कचरा अडवून तो तळाला बसवण्यासाठी तयार करण्यात आला होता. यातून गाळमुक्त होऊन बाहेर पडणारे शुद्ध पाणी खालच्या जलाशयात साठवले जात असे. हा जलाशय समुद्रसपाटीपासून ७२३ मीटर उंचीवर होता, ज्यामुळे पाणी उताराच्या दिशेने वाहत जाऊन शनिवारवाड्यापर्यंत (५४० मीटर उंचीवर) पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला नैसर्गिक उतार उपलब्ध होत असे.

२. भूमिगत जलवाहिन्या (नहर): कात्रजमधील जलाशयांपासून पाणी जमिनीखाली ३० फुटांपर्यंत खोलवर बांधलेल्या, विटा आणि चुना वापरून तयार केलेल्या भव्य भूमिगत जलवाहिन्यांतून (नहर) नेले जात असे. कात्रजची मूळ जलवाहिनी साधारण २ ते ३ फूट रुंद आणि ६ ते ७ फूट उंच होती, जिची लांबी ८ ते १५ किलोमीटरपर्यंत होती. टिकाऊपणासाठी, सुरुवातीच्या काळात जलवाहिन्या थेट अखंड दगडातून कोरून बनवल्या जात असत, तर नंतरच्या टप्प्यात मातीची नळी आणि दगडी बांधकामातील सांध्यांचा वापर करण्यात आला. नंतर ही प्रणाली विस्तारून २० किमीचा एक अवाढव्य आराखडा तयार करण्यात आला.

३. उच्छ्वास: लांब अंतरावरील संरचनात्मक प्रवाह नियंत्रित करण्यासाठी, अभियंत्यांनी जलवाहिनीच्या मार्गावर दर ३० ते १०० मीटरवर उच्छ्वास (किंवा ओसवास) नावाचे उभे खड्डे बांधले. याची महत्वाची कार्ये म्हणजे अडकलेले हवेचे अडथळे (एअर लॉक्स) मोकळे करून, पाण्याचा वेग स्थिर करत असे आणि उच्च दाबामुळे पाईपलाईन फुटण्याचे प्रकार टाळणे, सूक्ष्म गाळ खाली ठेवून स्वच्छ पाणी प्रवाहाच्या पुढील भागात वाहत राहील याची खात्री करणे आणि देखभाल करणाऱ्या कामगारांना जमिनीखालील कोणतेही अडथळे साफ करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी प्रवेश देणे.

४. शहरी वितरण आणि साठवणूक (हौद): मुख्य जलवाहिनी शहरात पोहोचल्यानंतर, तिचे रूपांतर एका गुंतागुंतीच्या भूमिगत जाळ्यामध्ये होत असे, ज्यातून १३४ ते २०० हून अधिक वितरण मार्ग बाहेर पडत असत. हे मार्ग स्थानिक पातळीवरील उघड्या दगडी सार्वजनिक जलाशयांमध्ये किंवा टाक्यांमध्ये पाणी सोडत असत, ज्यांना ''हौद'' असे म्हटले जाई. ''काला हौद'', ''बुधवार हौद'', ''फडके हौद'' आणि ''बदामी हौद'' यांसारख्या प्रसिद्ध सार्वजनिक ठिकाणांवरून विविध ''पेठां''मधील (परिसरांमधील) सामान्य नागरिकांना पाणी पुरवले जात असे. याव्यतिरिक्त, काही विशेष जलवाहिन्या थेट पेशव्यांच्या राजधानीतील ''शनिवार वाडा'' या खाजगी वाड्याच्या आवारात जात असत, ज्याद्वारे तिथल्या शाही कारंज्यांना आणि बागांना पाणी पुरवले जाई.

१७९० च्या दशकाच्या उत्तरार्धात राजधानीचा वेगाने विस्तार होत असताना, विविध सरदारांनी शहराच्या जलवितरण प्रणालीमध्ये आणखी तीन स्वतंत्र आणि महत्त्वाच्या जलवाहिन्यांची भर घातली नऱ्हे आंबेगाव येथून पाणी आणून सदाशिव पेठेला पुरवठा करणारी नाना फडणवीस जलवाहिनी, कोंढवा येथून पाणी आणून रस्ता पेठेला पुरवठा करणारी सरदार रास्ते जलवाहिनी आणि कोंढवा येथून पाणी आणून शहराच्या पूर्व भागातील जलाशये भरण्यासाठी वापरली जाणारी रूपराम चौधरी जलवाहिनी यांचा समावेश होतो. या सर्वांचे मिळून एक एकत्रित जाळे तयार झाले होते, ज्याद्वारे दररोज सुमारे ३.८ दशलक्ष लिटर शुद्ध पिण्याचे पाणी पुरवले जात असे. विशेष म्हणजे, २५० वर्षे जुन्या असलेल्या या गुरुत्वाकर्षणावर आधारित जलवाहिनी प्रणालीचे काही भाग आजही शहराच्या जुन्या मध्यवर्ती भागात शुद्ध भूजल पुरवत आहेत.
१८१७ नंतर ब्रिटिशांनी पुण्याचे पूर्ण नियंत्रण हाती घेतले. आपल्या विस्तारणाऱ्या लष्करी छावण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्याचे निकष पाळण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी, ब्रिटिशांनी शहराची पाण्याची भिस्त पारंपरिक जलवाहिन्या आणि विहिरींवरून हटवून मोठ्या बाह्य जलाशयांकडे वळवली. याची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात सन १८७९ मध्ये बांधण्यात आलेल्या खडकवासला धरणापासून झाली. पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी त्याला पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांची जोड देऊन जलव्यवस्थापनाची एक साखळी निर्माण झाली. या धरणांमधील पाणी साठवण आणि त्याचे नियोजन यांचा पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याशी जवळचा संबंध आहे. शहराच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी या धरण साखळीने असाधारण काम केले आहे. मुठा नदीच्या खोऱ्यातील या धरणांमुळे पावसाळ्यातील पाणी साठवून त्याचा उपयोग वर्षभर केला जातो. पानशेत आणि वरसगाव ही धरणे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करण्यासाठी उपयुक्त आहेत. टेमघर धरणही या जलव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. या धरणांमधून उपलब्ध होणारे पाणी खडकवासला धरणात सोडले जाते आणि तेथून कालव्यांद्वारे शेतीसाठी तसेच आवश्यकतेनुसार शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते. धरणांची ही साखळी पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी साठवण्यास, उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करण्यास आणि शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास मदत करते. धरणांमुळे पूरनियंत्रण आणि पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यासही मदत होते.

पाणीपुरवठा करणारी धरणांची शृंखला
अशा धरणांचा उपयोग आताच्या नवीन तंत्रज्ञानामुळे अधिक व्यापक झालेला आहे. पाणी व्यवस्थापन, शेती, वीज निर्मिती या क्षेत्रात ही धरणे वरदान ठरली आहेत. भारतातील प्रमुख बहुउद्देशीय धरण प्रकल्पांमध्ये हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील भाक्रा-नांगल धरण, गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरण, उत्तराखंडमधील टिहरी धरण आणि ओडिशामधील हिराकुड धरण यांचा समावेश होतो. हे प्रकल्प कृषी विकास, वीज निर्मिती आणि प्रादेशिक जलसुरक्षेमध्ये योगदान देतात. त्याचप्रमाणे, दक्षिण भारतात नागार्जुन सागर आणि श्रीशैलम प्रकल्प सिंचन व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात.
या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, भारताला मोठ्या प्रमाणावरील जल पायाभूत सुविधा आणि स्थानिक संवर्धन उपाययोजना यांचा मेळ घालणाऱ्या एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे. इमारतींमध्ये पर्जन्यजल संचयन, पाणलोट क्षेत्राचा विकास, तलाव आणि डबक्यांचे पुनरुज्जीवन, ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धती आणि सांडपाण्याचा पुनर्वापर यांसारख्या उपायांमुळे गोड्या पाण्याच्या स्रोतांवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. याचबरोबर नागरिक म्हणून पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. सध्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या काळात जमिनीवर काँक्रीटचे थर चढवून आपण जमिनीला तहानलेले ठेवत आहोत. कालांतराने ही भूमीच आपल्याला तहानलेले ठेवेल. हे न व्हावे यासाठी ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’ ही जीवनशैली अंगीकारून, चला आपणच आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पाण्याची बेगमी करूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; १५०० की ३०००?

Viral Video: मुंबईत महिला कार चालकाचा धुमाकूळ; पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

८ वर्षीय मुलाचा क्रौर्याचा कळस, वर्गात ६ वर्षीय चिमुकलीला विटा, कुंडीने मारहाण; बेशुद्ध झाली तरी मारत राहिला, घटना CCTVत कैद

Marathi News Live Updates : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, सोमवारपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

Bank Holiday November 2026: नोव्हेंबरमध्ये बँकांना तब्बल 17 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद? पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT