आंधळीत उद्या
बैलगाडी शर्यत
दहिवडी, ता. २४ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत, ग्रामपंचायत आंधळी व ग्रामस्थ आंधळी यांच्या वतीने गुरुवारी (ता. २६) ‘एक आदत एक बैल’ बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. आंधळी-टाकेवाडी रस्त्यावरील मैदानावर सकाळी ८ वाजल्यापासून या शर्यतीला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह (ढाल) स्वरूपात बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अनुक्रमे प्रथम सहा क्रमांकांसाठी ६१ हजार रुपये, ४१ हजार, ३१ हजार, २१ हजार, १५ हजार, दहा हजार व सहा हजार रुपये, तसेच प्रत्येक क्रमांकास प्रत्येकी दोन ढाली देण्यात येणार आहेत. याशिवाय उपांत्यपूर्व फेरीसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये आणि दोन मानाच्या ढाली देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य सचिव पै. विलास देशमुख (वाई) उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमांनुसार पार पडणार असून, पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रवेश फी ७०० रुपये ठेवण्यात आली असून, ‘फोन पे’द्वारे ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. नावनोंदणीसाठी शेखर खरात, विकास शेंबडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.