पुणे, ता. १३ : गर्भवती माता आणि किशोरवयीन मुलींमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘सक्षम माता, सशक्त किशोरी, रक्तक्षयमुक्त पुणे’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हिमोग्लोबिन तपासणी, रक्तक्षयाचे वेळेवर निदान, योग्य उपचार आणि पोषणविषयक जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
गर्भवती माता आणि किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी केली जात आहे. रक्तक्षय आढळलेल्या लाभार्थ्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घेणे, लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचे नियमित सेवन करणे आणि आवश्यकतेनुसार पुनर्तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. रक्तक्षय टाळण्यासाठी सकस आणि संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिले जात आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, नाचणी आणि शेंगदाणे यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आवळा, लिंबू आणि पेरू यांसारख्या ‘क’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थांमुळे शरीरातील लोहाचे शोषण सुधारण्यास मदत होते, याबाबतही जनजागृती केली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, ‘‘वेळेवर निदान, पोषक आहार आणि योग्य उपचार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून रक्तक्षयाचे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते.’’ या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांचा समन्वय साधण्यात येत आहे. माता आणि किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे, रक्तक्षयाचे दुष्परिणाम टाळणे आणि नियमित आरोग्य तपासणीची सवय लावणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.