पुणे

दिवाळी ः डुकरे

CD

फायनल
----------------------------------
दिवाळी ः डुकरे


शोभिवंत रोपांतून विस्तारले
व्यवसायाचे क्षितिज
------------
दहावीत शिकणारा शेतकरी मुलगा. वडिलांचे निधन झाल्यानंतर रोपवाटिकेत साडेबारा रुपये रोजंदारीवर अर्धवेळ काम करत शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर आईचे दागिने गहाण ठेवून मिळालेल्या १० हजार रुपयांत मामाच्या १० गुंठे जागेवर स्वतःची रोपवाटिका सुरू केली. गेल्या २८ वर्षांत याच रोपवाटिकेचा विस्तार ७५ एकर नर्सरी आणि २० कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायात झाला. ही कहाणी आहे, इनडोअर शोभिवंत झाडांच्या व्यवसायात स्थानिक पातळीवरून जागतिक बाजारपेठेपर्यंत मजल मारणाऱ्या कुंजीरवाडी (जि. पुणे) येथील श्री बालाजी नर्सरीचे अनिल आंबेकर यांची.
------------------
संतोष डुकरे
------------------
ना कृषी पदवीधर, ना कुटुंबाची काही व्यावसायिक पार्श्वभूमी. शून्यातून सुरुवात करत, प्रत्येक गोष्ट स्वानुभवातून शिकत आणि काळानुरूप बदल स्वीकारत अनिल आंबेकर यांनी जगभरात व्यवसायाचा विस्तार केला. हेच त्यांच्या व्यावसायिक यशाचे गमक आहे. आंबेकर यांना व्यवसायाचा शोध घ्यावा लागला नाही; परिस्थितीनेच त्यांना व्यवसायाकडे वळवले. ते दहावीत असतानाच वडिलांचे निधन झाले. आणि परिस्थितीच अशी आली, की नकळत ते व्यवसायाकडे ढकलले गेले. त्यांचे मूळ गाव वडकी, तर मामाचे गाव कुंजीरवाडी (जि. पुणे). साधारण १९९८ च्या काळात या परिसरात १५ ते २० नर्सरी होत्या. त्यामध्ये गुलाबासह विविध देशी फुलझाडांची रोपे तयार केली जात. त्या वेळी नर्सरीतील कामगाराची रोजंदारी २५ रुपये होती. आंबेकर यांनी साडेबारा रुपये रोजंदारीवर नर्सरीत अर्धवेळ काम सुरू केले. अकरावी आणि बारावीच्या दोन वर्षांत नर्सरीत काम करताना त्यांनी या व्यवसायातील बारकावे शिकून घेतले. याच अनुभवातून त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीचा पाया घातला गेला.
कौटुंबिक परिस्थितीमुळे नोकरीसाठी शिक्षण घेण्यापेक्षा व्यवसायाकडे वळणे आंबेकर यांच्यासाठी अधिक व्यवहार्य होते. आजूबाजूला व्यवसायाची संधी दिसत होती आणि दोन वर्षे नर्सरीत काम केल्यामुळे कलम करण्यापासून नर्सरीतील इत्थंभूत कामांचा अनुभवही त्यांच्या गाठीशी होता. याच बळावर आंबेकर यांनी स्वतःची नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मामांनी १० गुंठे जागा वापरायला दिली, तरी भांडवलाचा प्रश्न होताच. बहिणीचे लग्न झालेले होते आणि कुटुंबात आईशिवाय दुसरा आधार नव्हता. अखेर आईने स्वतःचे सर्व दागिने गहाण ठेवले. त्यातून मिळालेल्या १० हजार रुपयांच्या भांडवलावर मामांच्या जागेत ‘श्री बालाजी नर्सरी’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. गुलाबाच्या रोपांचा पहिलाच लॉट २५ हजार रुपयांना विकला गेला. या पहिल्या यशाने आंबेकर यांचा आत्मविश्वास वाढला. पुढील चार-पाच वर्षांत व्यवसायाचा चांगला जम बसला.
जे चाललंय त्यात आंबेकर समाधानी होते. मात्र नकळत ते एका मर्यादित चौकटीत अडकले होते. साधारणपणे २००४ मध्ये बंगळूरला दिलेल्या भेटीने ही चौकट मोडली. त्या काळात बंगळूर हे शोभिवंत झाडे आणि नर्सरी व्यवसायाचे देशातील प्रमुख केंद्र होते. आजही आहे. या भेटीत आंबेकर यांनी तेथील व्यावसायिकांशी संवाद साधला, त्यांच्या कामकाजाची पद्धत जवळून पाहिली आणि व्यवसायवाढीच्या शक्यतांवर चर्चा केली. या अनुभवातून व्यवसायाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलू लागला. बाजारपेठेतील बदल स्वीकारून अद्ययावत राहण्याची गरज त्यांना जाणवली. बंगलोरमधील व्यावसायिकांनी प्रोत्साहन दिले, क्रेडिट दिले. या बळावर २००५ मध्ये आंबेकरांनी आपल्या व्यवसायाची दिशा बदलली. गुलाब व पारंपरिक फुलझाडांच्या उत्पादनातून बाहेर पडून ते शोभेच्या झाडांकडे वळले.

तांत्रिक जुगाडांतून यश ः
बंगलोर सोबत शोभेच्या फुलझाडांची वाटचाल सुरू झाली असली, तरी ती फक्त तिकडून रोपे आणणे व इकडे मोठी करून विकणे एवढ्याच स्वरूपाची होती. कृषिविषयक शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने बेसिक, तांत्रिक गोष्टी माहीत नव्हत्या. बंगलोरच्या अनुभवातून बोध घेत निरनिराळ्या ठिकाणी अभ्यास दौरे सुरू होते. यातूनच २००८ मध्ये केरळच्या अभ्यास दौऱ्यात अनिल आंबेकर यांना खूप काही शिकायला मिळाले. रूटिंग, प्रपोगेशन, टनेल सिस्टिम, कटिंग चेंबर याविषयी माहिती मिळाली. या सर्व गोष्टी पुण्याच्या परिस्थितीत आहे तशा स्वीकारणे शक्य नव्हते. मग आंबेकरांनी त्यात त्यांच्या पद्धतीने बदल केले. हे बदल शंभर टक्के यशस्वीही झाले. केरळच्या धर्तीवर त्यांनी विकसित केलेली टनेल पद्धत ९० टक्के व्यावसायिक आजही वापरतात.

थायलंड, हॉलंडमधून घेतली आंतरराष्ट्रीय झेप ः
आंबेकर २०११ मध्ये पहिल्यांदा थायलंडला गेले. तेथील बँकॉक हे शोभिवंत झाडांच्या व्यापारातील जगातील प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. तेथे राहून त्यांनी स्थानिक व्यावसायिकांशी संपर्क वाढविला आणि व्यवसायाचा अभ्यास केला. रोपवाढीच्या पद्धती आणि व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी आत्मसात केला. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी हॉलंडचा अभ्यासदौरा केला. या देशातील नर्सरी व्यवसायाचे नियोजन त्यांना विशेष भावले. तेथे पाच-पाच एकर क्षेत्रावर एकाच वाणाचे उत्पादन घेतले जात होते, तर आपल्याकडे एकाच एकरात पाच-पाच वाणांची लागवड केली जात होती. आपल्याकडील उत्पादनाचे हे नियोजन आंबेकर यांना खटकले. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे असलेल्या या देशातील व्यावसायिकांशी झालेल्या चर्चेतून आणि माहितीच्या देवाणघेवाणीतून त्यांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.
‘एक पॉलिहाउस, एक पीक’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी परदेशातील कंपन्यांशी करार केले.
जर्मनीमधील एसेन (ESSEN) शहरातील आयपीएम व नेदरलँड्समधील विविध प्रदर्शनांमध्ये ते २०१३ पासून दरवर्षी सहभागी होत आहेत. या प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांना अनेक नवीन कंपन्यांशी संपर्क साधता आला. त्यातूनच
कुंडीतील शोभिवंत झाडांच्या (पॉट प्लँट) व्यवसायातील नवे दालन त्यांच्यासाठी खुले झाले.
-----------
व्यवसायाची दिशा बदलली ः
साधारण १४ वर्षे गुलाबाच्या व्यवसायात काम केल्यानंतर आंबेकर यांनी २०१५ पासून गुलाबाचे उत्पादन पूर्णपणे बंद केले आणि केवळ इनडोअर प्लँट्स अर्थात घरात सावलीत ठेवता येणाऱ्या कुंडीतील शोभिवंत झाडांवर लक्ष केंद्रित केले. या निर्णयामागे काही व्यावसायिक कारणे होती. पारंपरिक नर्सरीत काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले होते. त्यातच गेल्या दीड दशकात परिसरातील नर्सरी व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे सर्वांनी एकाच प्रकारच्या झाडांच्या उत्पादनात काम करण्याऐवजी वेगळ्या इतर झाडांच्या उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इतर व्यावसायिक जी झाडे तयार करत आहेत, ते आपण नाही करायचं. ग्राहकांना नेहमीच काहीतरी नवीन हवे असते. ही गरज ओळखून त्यांनी पारंपरिक नर्सरीचे रूपांतर इनडोअर प्लँट इंडस्ट्रीमध्ये केले. यासाठी परदेशातील प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते आत्मसात केले. परदेशातून मदर प्लँट्स आयात करत त्यांचे स्थानिक पद्धतीने प्रवर्धन (प्रपोगेशन) करून रोपांची निर्मिती सुरू केली. अशा प्रकारे नव्या जातींच्या इनडोअर प्लँट्सचे उत्पादन आणि विक्री करण्यास सुरुवात केली.

कोकणात यशस्वी सीमोल्लंघन ः
व्यवसायात चांगली प्रगती झाल्यानंतर उत्पादनवाढीसाठी क्षेत्रविस्ताराची गरज निर्माण झाली. पुणे परिसरात जमिनींचे दर जास्त होते. तुलनेने कोकणात जमीन स्वस्त आणि शोभिवंत झाडांच्या वाढीसाठी हवामान अनुकूल होते. त्यामुळे कोकणात प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-गणपतीपुळे परिसरात रोपवाटिकांचे चांगले जाळे होते. प्रकल्पासाठी या भागात एकरी एक ते दोन लाख रुपये दराने ३० एकर जमीन खरेदी केली. मात्र पुण्यापासून सुमारे सहा तासांचा प्रवास करून तेथे जाऊन व्यवसाय पाहणे जिकिरीचं होईल हे जाणवलं. त्यामुळे त्यांनी ही जमीन विकली आणि कुंजीरवाडी येथील विक्री केंद्राजवळ यवत परिसरातील बोरीएंदी येथे व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. तेथे स्वतःच्या १० एकर आणि भाडेतत्त्वावरील २५ एकर अशा एकूण ३५ एकर क्षेत्रावर पॉलिहाउस उभारले. या प्रकल्पातून इनडोअर प्लँट्सचे उत्पादन सुरू केले.
बोरीएंदी येथील प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आंबेकर यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा कोकणाकडे वळवला. या वेळी त्यांच्या सोबत नर्सरी व्यवसायातील ज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या प्रवासात सुरुवातीपासून साथ देणारे कृपा नर्सरीचे बाबू सरवसे, बालाजी ब्लॉसमचे संतोष शितोळ आणि तुळजाई नर्सरीचे गणेश शेंडगे हे तीन मित्रही होते. चौघांनी मिळून रोहा (जि. रायगड) येथे सुमारे पावणेदोनशे एकर क्षेत्रावर पॉलिहाउस प्रकल्प उभारले. पुढे आंबेकर यांनी रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे ४० एकरांवर इनडोअर प्लँट्स निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प उभारला. २०२२ पासून या प्रकल्पात रोपनिर्मिती सुरू झाली. सध्या येथून दरवर्षी ३५ ते ४० लाख कुंडीतील शोभिवंत रोपांची घाऊक विक्री होते. या प्रकल्पातून व्यवसाय विस्तारासह स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे.

पवार, तटकरेंचे सहकार्य ः
रायगड जिल्ह्यात नर्सरी प्रकल्पासाठी जमीन घेतल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प उभारताना अनेक अडचणी आल्या. मग आंबेकर व मित्रमंडळींनी शिरूरचे तत्कालीन आमदार अशोक पवार यांची भेट घेतली. त्यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना या सर्व व्यवसायिकांना मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर तटकरेंनी पुण्यातील प्रकल्पांची पाहणी करून कोकणात या माध्यमातून काय बदल होऊ शकतो याचा आढावा घेतला. कोकणात असे प्रोजेक्ट येत असतील, इथल्या लोकांसमोर शेतीपूरक व्यवसायाची मॉडेल उभी राहत असतील आणि रोजगार निर्मिती होत असेल तर त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाईल, अशी ग्वाही दिली. तटकरे यांच्या सहकार्यामुळे प्रकल्प वेगाने उभे राहिले. कृषी विभागाकडूनही त्यांना सामुहिक शेततळे, पॉलिहाउस, पॅकहाउस यासाठी साह्य मिळाले.
-----------
जागतिक पातळीवर नेटवर्किंग ः
आंबेकर यांनी विविध देशांचे अभ्यासदौरे करून आंतरराष्ट्रीय पातळीवर परदेशातील व्यावसायिकांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि व्यावसायिक नेटवर्क विकसित केले. इटली, हॉलंड, अमेरिका, चीन, थायलंड आणि इंडोनेशिया आदी देशांतील कंपन्यांसोबत त्यांचे व्यावसायिक करार आहेत. या देशांतून अग्लोनेमा, पीस लिली, शेवंती, पॅाईनसेटिया, जास्वंद, जिरेनियम आणि फायकस आदी विविध प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या मदर प्लँट्स आयात केल्या जातात.

पुणे झाले जागतिक नर्सरी हब ः
आंबेकरांच्या वाटचालीशी पुण्याच्या नर्सरी व्यवसायाच्या विकासाची गाथा जुळलेली आहे. १९९८ दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर फक्त २०-२५ हायटेक पॉलिहाउस नर्सरी होत्या. हे सर्व लोक स्थानिक शेतकरी होते. त्यातही गुलाब, जाई, जुई, रातराणी अशी देशी रोपे असायची. त्यांची नाशिक, शिर्डी भागात विक्री व्हायची. यात मेहनत खूप जास्त आणि नफ्याचे गुणोत्तर फार कमी होते. गुलाब रोपांचा ग्राहक हा प्रामुख्याने शेतकरी असल्याने दर मर्यादित होते. याच काळात लांजा-गणपतीपुळे भागात नर्सरीचे मोठे जाळे होते. पुढे व्यवसायात बदल होत गेले तशी तेथील मक्तेदारी कमी होत गेली.
पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी ते यवत दरम्यानच्या भागात गेल्या २५ वर्षांत नर्सरींचे जाळे वेगाने वाढत गेले. सध्या या भागात सुमारे २००० हून अधिक नर्सरी कार्यरत आहेत. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे इथले शेतकरीच रोपनिर्मिती, नर्सरी व्यवसायात उतरले आणि त्यांनी स्वतःच पूर्णवेळ हा व्यवसाय केला व वाढवला. त्यामुळे पुणे अल्पावधीत जागतिक पातळीवरील नर्सरीचे हब झाले आहे. दरवर्षी सुमारे ४०० ते ५०० परदेशी व्यावसायिक येथे व्यापारासाठी येतात.

महाराष्ट्र नर्सरी असोसिएशन मार्फत सीमोल्लंघन ः
महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनच्या स्थापनेपासून अनिल आंबेकर या संघटनेत सक्रिय असून, त्या माध्यमातून नर्सरी व्यवसायाच्या विकासात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. संस्थेचे सचिव म्हणून २०१५ ते १९ या काळात त्यांनी काम पाहिले. त्याव्यतिरिक्तही ते संघटनेच्या उपक्रमात सहभागी असतात. प्लॅस्टिक बंदी, वीज दराची समस्या आदी विषयांवर संघटनेमार्फत महत्त्वाचे काम झाले. नर्सरी व्यवसायिकांना परदेश अभ्यास दौऱ्यांतून व्यवसाय विकासाच्या संधी खुल्या करण्यात आल्या. त्याच वेळी ग्राहकवृद्धीसाठी पुणे- मुंबईत हॉर्टी एक्स्पो, फ्लॉवर शो आयोजित केले. या प्रदर्शनांच्या माध्यमातून नव्या पिढीला आकर्षित करण्यावर भर दिला. त्यातूनच पुणे- मुंबईत मार्केट विस्तारले.

शोभिवंत झाडांत कमी जोखीम, नफ्याची संधी अधिक ः
ऑर्नामेंटल अर्थात शोभिवंत झाडांचा वापर प्रामुख्याने बागबगीचे आणि फार्महाउसच्या सुशोभीकरणासाठी केला जातो. शहरांतील वाढते प्रदूषण आणि घरातील हिरवाईची आवड यामुळे ऑक्सिजन देणाऱ्या इनडोअर प्लँट्सची मागणीही वाढत आहे. सोशल मीडियामुळे या झाडांविषयी जागरूकता वाढली असून, त्यातून मागणीलाही चालना मिळाली आहे. भाजीपाला रोप निर्मितीच्या व्यवसायात बियाण्यांच्या गुणवत्तेपासून ते फसवणुकीपर्यंत अनेक आव्हाने आणि धोके आहेत. याउलट, शोभिवंत झाडांच्या व्यवसायात तुलनेने धोका कमी आणि नफ्याची शक्यता अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या दोन्ही व्यवसायांतील झाडांचा वापर, ग्राहकवर्ग आणि खरेदीची पद्धत वेगवेगळी आहे.

बदलती बाजारपेठ ः
आंबेकर सांगतात, की नर्सरी व्यवसायाच्या बाबतीत कोरोना महामारीपूर्वीची आणि त्यानंतरची परिस्थिती यांत आमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी विक्रीचा ४० टक्के हिस्सा उत्तरेकडील भागाचा होता. आता ४० टक्के विक्री एकट्या मुंबई-पुण्यात होतेय. उर्वरित ६० टक्के विक्री देशभरातील विविध बाजारपेठांमध्ये विखुरलेली आहे. त्यांचे प्रमुख ग्राहक देशभरातील छोट्या नर्सरी आहेत. हे व्यावसायिक आंबेकर यांच्याकडून घाऊक दराने ट्रकभर रोपे खरेदी करतात आणि पुढे किरकोळ दराने त्यांची विक्री करतात. सोरतापवाडी येथील विक्री केंद्रातून किरकोळ विक्रीही केली जाते. मात्र एकूण विक्रीच्या तुलनेत तिचे प्रमाण नगण्य आहे. खरेदीदारांना उत्पादन केंद्रांवरूनच थेट देशभर रोपांचा पुरवठा केला जातो. गुजरात, दिल्ली, जयपूर, भोपाळ, हुबळी, धारवाड, गोवा, नैनिताल, सारंगपूर, गजरोला, मिझोरम, चंडीगड अशा विविध ठिकाणी रोपे पाठवली जातात. ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेतील कलानुसार दरवर्षी कोणत्या प्रकारच्या रोपांचे उत्पादन करायचे, याचे नियोजन बदलत राहते, असे अनिल आंबेकर सांगतात.
------------------------------------------
- अनिल आंबेकर, ९०७५२८५७५७
श्री बालाजी नर्सरी, सोरतापवाडी (पुणे), सुतारवाडी (रायगड)
https://www.shreebalajinursery.com/

फोटो ः
संतोष डुकरे
अनिल आंबेकर
सुतारवाडी (ता. रोहा) येथे उभारलेला इनडोअर प्लँट्स निर्मितीचा प्रकल्प.
रोपवाटिकेतील विविध प्रकारची शोभिवंत झाडे.
रोपवाटिकेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray News : राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन, लवकरच गुड न्युज; कृष्णकुंजवर भेटीसाठी दिल निमंत्रण

Your Money: ऑनलाइन शॉपिंगमध्ये पैसे अडकले? ‘Refund will be processed shortly’ म्हणत कंपनी टाळाटाळ करतेय? मग असा मिळवा रिफंड!

तेव्हा सोनाली बेंद्रेंकडून मिळालं होतं बक्षीस, आता त्यांच्यासमोरच केला डान्स; प्राजक्ता माळीला ओळखणं ही कठीण

Maharashtra Live News : राज्यातील आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्र्यांची माहिती

Kumbh Mela 2026: हरिद्वार कुंभमेळा २०२७ चा बिगुल वाजला; लोगो, अधिकृत वेबसाइट अन् कुंभगीताचे लोकार्पण

SCROLL FOR NEXT