PNE26W55950
सोलापूर : लोकमान्य टिळक सभागृहात अंतरंगातले तरंग कार्यक्रम सादर करताना कलावंत.
---
‘अंतरंगातले तरंग’ने घेतला मनाचा ठाव
विविध कथांच्या सादरीकरणातून उलगडले आयुष्याचे वेगवेगळे पैलू
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : कला, साहित्य आणि संगीताचा सुरेल मिलाफ साधणाऱ्या ‘अंतरंगातले तरंग’ या सांगितिक अभिवाचनाच्या प्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. पसायदान योगतर्फे आयोजित या कार्यक्रमात विनोदी, भावस्पर्शी आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश देणाऱ्या कथांनी रसिकांना खिळवून ठेवले.
लेखक मिलिंद गोरटे यांनी कथांचे सादरीकरण केले, तर अदिती कुलकर्णी यांच्या ओघवत्या अभिवाचनाने कथांना रंगत आणली. आयुष्य आनंदाने आणि सकारात्मकतेने कसे जगावे, याचा संदेश देणारी ‘वेचूया सुखांचे क्षण’, बालविकास मंदिरमधील केळकरबाईंच्या शाळेतील शिस्तीचा आठवणीतील किस्सा सांगणारी ‘न मेलेल्या सरड्याची कथा’ आणि बालपणापासून आजपर्यंतच्या मजेशीर प्रसंगांची पेरणी करणारी ‘कर्तनकारांच्या वर्तनाचं कीर्तन’ या कथांना विशेष दाद मिळाली.
जीवन-मृत्यूच्या संवेदनशील प्रवासातील आठवणी उलगडणारी ‘काहूर’, बालपणीच्या समृद्ध आठवणी जागवणारी ‘आठवणीतली दिवाळी’, रेल्वे प्रवासातील एका व्यक्तिविशेषाचा विनोदी प्रसंग मांडणारी ‘बूमरँग’ आणि वार्धक्यात जोडीदार गमावल्यानंतरच्या मानसिक अवस्थेवर सकारात्मक दृष्टिकोनातून भाष्य करणारी ‘सखी मंद झाल्या तारका’ या कथांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विनोद आणि भावुकतेची सुरेख सांगड घालत कथांनी विविध भावभावनांचा अनुभव दिला.
कथांच्या आशयाला संगीताची सुरेख जोड देण्यात आली. रूपक आणि स्वरदा यांनी गायन केले. शर्वरी कुलकर्णी यांनी संवाद सादर केले, तर जयेश कुलकर्णी व केदार गुळवणी यांनी वादन आणि सन्मित रणदिवे यांनी तालाची साथ दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उमेश मोहोळकर, समीर रणदिवे, झंकार कुलकर्णी, आरती गोरटे, रक्षा गोरटे-रणदिवे आणि आर्या गोरटे यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.