आपले सरकार सेवा केंद्रांसाठी २२५३ अर्ज
स्थळ पाहणीचे काम ८५ टक्के पूर्ण; तालुकास्तरावर अर्जदारांच्या मुलाखती होणार
सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. ४ : नवीन आपले सरकार सेवा केंद्रांसाठीची प्रक्रिया सुरू असून, अर्ज केलेल्यांच्या स्थळ पाहणीची प्रक्रिया ८५ टक्के पूर्ण झाली आहे. १४७८ केंद्रांसाठी २२५३ जणांनी अर्ज केले आहेत. आता पात्र अर्जदारांच्या मुलाखती घेऊन त्यातून दिलेल्या ठिकाणी सेवा केंद्रांना मंजुरी देण्याचे काम होणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावर प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिस उपअधीक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात विद्यार्थ्यांसह नागरिकांना वेळेत विविध दाखले मिळावेत आणि तालुकास्तरावरील ई- सेवा केंद्रांवरील ताण कमी व्हावा, यासाठी जिल्ह्यात नवीन १४७८ आपले सरकार सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्याला सर्व तालुक्यांतून मोठा प्रतिसाद मिळाला असून, गावागावांत आपले सरकार सेवा केंद्रे मिळविण्यासाठी उमेदवारांतून स्पर्धा लागल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत २२५३ अर्ज जिल्ह्यातून दाखल झालेले आहेत. यामध्ये २४ महाविद्यालयांतूनही अर्ज आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॉलेजस्तरावरच आपले सरकार सेवा केंद्र सुरू केली जाणार आहेत. त्यानुसार त्यालाही महाविद्यालयांनी प्रतिसाद दिलेला आहे. आता अर्जदारांच्या स्थळ पाहणीचे काम सुरू होते. आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे यापुढे पात्र अर्जदारांच्या मुलाखती होणार आहेत. सध्या तपासणीचे काम तालुकास्तरीय समितीकडून होत आहे. यापुढील मुलाखतीही याच तालुकास्तरीय समितीकडून होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
४१२ गावांतून आपले सरकार सेवा केंद्रांसाठी एकही अर्ज आलेला नाही. ही गावे कमी लोकसंख्येची व दुर्गम असण्याची शक्यता आहे.
...........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.