खड्ड्यांच्या विळख्यात आरडगाव-हिंगणगाव रस्ता
निगडे वस्तीपासून हिंगणगावपर्यंत चाळण; साइडपट्ट्याही खचल्या, विद्यार्थी व दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
आरडगाव, ता. १२ : आरडगाव ते हिंगणगाव या वर्दळीच्या मार्गाची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. निगडे वस्तीच्या पुढे नव्याने बांधलेल्या पुलापासून हिंगणगावपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचा पृष्ठभाग उखडल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवत अक्षरशः कसरत करावी लागत आहे. त्यातच दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या खचल्याने हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.
या मार्गावरून आरडगाव, निगडे वस्ती आणि हिंगणगाव परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था थेट दैनंदिन वाहतुकीवर परिणाम करणारी ठरत आहे. समोरून एखादे वाहन आल्यास बाजूला घेण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असून, काही ठिकाणी दुचाकी घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीही हा प्रवास धोकादायक बनला आहे.
पावसाने वाढवली समस्या
पावसाळ्यात या रस्त्यावरील परिस्थिती आणखी बिकट होते. मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. परिणामी, अचानक खड्ड्यात वाहन आदळण्याचे प्रकार घडतात. दुचाकीस्वारांसाठी ही बाब विशेष धोकादायक आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशाअभावी खड्डे दिसत नसल्याने धोका अधिक वाढतो.
विद्यार्थ्यांचीही रोजची कसरत
याच मार्गावरून परिसरातील विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. सकाळी शाळेच्या वेळेत तसेच शाळा सुटल्यानंतर वाहनांची वर्दळ वाढते. अशा वेळी खड्ड्यांमधून मार्ग काढताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती ही केवळ वाहतुकीची नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचीही गरज बनली आहे.
‘केवळ मुरूम टाकून प्रश्न सुटणार नाही’
कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज
रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीची व्याप्ती निश्चित करण्याची गरज आहे. खड्डे बुजविण्याबरोबरच उखडलेला पृष्ठभाग दुरुस्त करणे, आवश्यक ठिकाणी डांबरीकरण करणे आणि खचलेल्या साइडपट्ट्या मजबूत करणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील तात्पुरत्या डागडुजीपेक्षा रस्त्याची टिकाऊ दुरुस्ती केल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
.............
कोट
................
आरडगाव ते हिंगणगाव रस्त्याची अनेक वर्षांपासून अपेक्षित दुरुस्ती झालेली नाही. सध्या रस्त्यावर खड्डे असून, साइडपट्ट्याही खचल्या आहेत. संबंधित विभागाने तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी प्रत्यक्ष पाहणी करून डांबरीकरण, खड्डे बुजविणे आणि साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण करावे.
- जयदीप ढमाळ,
सामाजिक कार्यकर्ते
...........
चौकट
............
प्रमुख समस्या
* नव्या पुलापासून हिंगणगावपर्यंत रस्त्यावर खड्डे
* अनेक ठिकाणी साइडपट्ट्या खचल्याने वाहनांना धोका
* पावसाने खड्ड्यांत पाणी साचून अपघाताचा धोका
* विद्यार्थी, शेतकरी, दूध वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय
* कायमस्वरूपी डांबरीकरणाची मागणी
...................................
A00557
आरडगाव ः निगडे वस्ती ते हिंगणगावपर्यंतचा खराब झालेला रस्ता. (सुरेश भोईटे ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.