माणुसकीने जोडणारे अर्जुन भोसले
अत्यंत मनमिळाऊ, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व, पाण्यासारखे निर्मळ आणि प्रवाही असणारे आमचे अर्जुन गुलाबराव भोसले ऊर्फ नाना. ज्यांना फक्त जोडणं माहीत आहे तोडणं नाही. जीवन जगण्याची कला आणि व्याख्या कळणारा हा माणूस, सगळ्यांनाच घट्ट फेव्हिकाॅलने जोडणारा हा व्यक्ती आणि जीर्ण झालं म्हणून कोणतंही नातं वाऱ्यावर सोडून न देता त्याला नवीन आकार देणारा हा माणूस.
१९७७ मध्ये जन्माला आलेल्या नानांना पहिल्यापासूनच शेतीची प्रचंड आवड. ते कोरेगाव तालुक्यातील कोलवडी या गावचे. शिक्षण - बी. ए. ऑनर्स आणि ॲग्रिकल्चर इन डिप्लोमा पूर्ण केलेले एक विद्याविभूषित व्यक्ती. घरात चार जण भाऊ, शिक्षणाचा वसा वारसा घरात अतिशय चांगल्या पद्धतीचा. वडिलांनी चारही मुलांना अतिशय चांगलं शिक्षण दिलं. त्यातून एक जण ग्रामसेवक झाले, तर बाकी इतर शेतीत आपलं नाव कमावत आहेत. हाच वसा आता नानाही पुढच्या पिढीत चालवत आहेत. मुलगी सानिका आणि अपेक्षा यांना त्यांनी शिक्षणात अग्रेसर करण्याचं धोरण ठरवलं आहे. नानांच्या पत्नी आरती भोसले या उत्तम हार्मोनिअम वादक आहेत. मुलगी अपेक्षाने बीएस्सी आर्टिफिशियल एन्टेलिजन्स पूर्ण केले असून, ती एक उत्तम कीर्तनकार, हार्मोनिअम वादक म्हणून नावारूपाला येत आहे. दुसरी मुलगी सानिका हिचे सुद्धा बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून, ती चांगली मृदंगवादक आहे. मुलींच्या जडणीघडणीवर नानांचे पहिल्यापासून बारीक लक्ष आहे. त्यामुळेच घराचा आध्यात्मिक वसा, वारसा आता अशा पद्धतीने पुढच्या पिढीत पेरण्यातही ते यशस्वी झाले आहेत.
खरंतर २००१ मध्येच १६००० रुपये घेऊन नानांनी नर्सरी चालू केली. पुढे नर्सरी हीच त्यांची व्यावसायिक ओळख बनली. १० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर २०११ ला त्यांना जिल्हा परिषदेचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला. याच दरम्यान त्यांनी गांडूळखत निर्मिती प्रकल्प उभा केला.
बाबा आमटे परिवारातील कौस्तुभ आमटे, तसेच सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अविनाश पोळ यांनी २०१० मध्ये नर्सरीला भेट देऊन भोसले कुटुंबीयांच्या एकीचं आणि कार्याचं कौतुक केलं होतं, तसेच २०११ मध्ये तत्कालीन कृषी अधिकारी अरुण घोरपडे यांनीही नानांच्या कार्याचा सन्मान केला होता.
नानांना अनेक पुरस्कार मिळाले, सन्मान मिळाले; पण त्यांचा खरा सन्मान २०१३-१४ नंतर सुरू झाला. जेव्हा त्यांनी आर्ट ऑफ लिविंगमध्ये पदार्पण केलं. वैयक्तिक समस्येपासून सुरू झालेल्या या प्रवासाने आज संपूर्ण जिल्हाभर मोठं उदात्त कार्य उभं केलं आहे. श्री. प्रशांत सोनावणे आणि नाना यांनी मिळून हे प्रचंड दणकट काम केले आहे. या सगळ्याला आकाश सकुंडे, संजय सकुंडे, अजिंक्य सकुंडे, जयश्री सकुंडे, अजिंक्य सोनवणे या सगळ्यांचीही मोलाची साथ लाभली आहे. भरकटलेल्या आणि व्यसनाधीन झालेल्या पिढीची गाडी रुळावर आणण्याचं मोठं कार्य आज ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आणि श्री. अमोल भैय्या भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. हॅपीनेस प्रोग्राम, वायएलटीपी, अॅडव्हान्स कोर्स, असे कोर्सेस नाना आणि टीम पूर्णत्वास नेत आहे. नाना आज आर्ट ऑफ लिव्हिंगचे एक महत्त्वाचे टीचर आहेत. त्यांची तळमळ असते, की तरुण चांगल्या मार्गाने पुढे चालावा, त्याला करिअरमध्ये चांगली गती मिळावी, भांडणापासून तो दूर राहवा, त्यांची वेळेत लग्नं व्हावी, दारू तंबाखूपासून तो दूर राहावा.
नाना हे माझ्यासाठीही एक हितचिंतक आणि मार्गदर्शक राहिलेले आहेत. त्यांनी कायम माझ्याही भल्याचा विचार केला आहे. आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे. शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक अंगाच्या सुबत्तेसाठी ते कायम प्रॅक्टिकल सल्ला देतात. त्यांचा प्रामाणिक सल्ला स्वीकारावा असं त्यांचं पारदर्शक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याबद्दल आदर वाटावा असे ते आहेत. कायम लोकांनी वेढलेले, चोवीस तास कामात गढलेले असूनही स्वतःच्या आरोग्यासाठी, तसेच सामाजिक कार्यासाठी ते वेळ राखून ठेवतात. सगळ्यांशीच हसतमुख राहून सगळ्यांच्याच जीवनात आनंद पेरणाऱ्या नानांकडून जगण्याची ही कला निश्चितच शिकण्यासारखी आहे.
- सचिन सकुंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.