लोगो ः सारासार
अर्जुन महाराज साळुंखे
लहानांचे ऐकणारे मोठे मन
आपल्या मोठेपणाची ओळख स्वतःपेक्षा लहान असलेल्या व्यक्तीचे म्हणणे किती मनापासून ऐकतो यात असते. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा किंवा अधिकाराचा अभिमान असला की दुसऱ्याचे म्हणणे ऐकणे कठीण जाते. विशेषतः आपल्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती काही वेगळा विचार मांडत असेल, तर तो विचार ऐकून घेण्याऐवजी त्याला दुय्यम ठरवण्याची प्रवृत्ती सहज निर्माण होते. परंतु संत निवृत्तीनाथांचे व्यक्तिमत्त्व याच्या अगदी उलट दिसते.
आई-वडिलांनी आळंदीत देहांत प्रायश्चित्त स्वीकारल्यानंतरही मुलांना सामाजिक शुद्धिपत्र देण्यास नाकारले. ब्रह्मसभेने पैठणला जाऊन शुद्धिपत्र आणावे म्हणजे सामाजिक मान्यता मिळविण्यासाठी एक विशिष्ट व्यवहारमार्ग स्वीकारावा ही सूचना केली. श्रीज्ञानदेवांनी त्याचा स्वीकार केला मात्र हे श्रीनिवृत्तीनाथ आणि सोपानदेवांना विशेष रुचले नाही.
श्रीनिवृत्तीनाथ म्हणतात,
नाहीं जाती कुळ वर्ण अधिकार । क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हों ॥
ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट । निजबोधें इष्ट स्वरूप माझें ॥
आत्मस्वरूपाची अनुभूती झाली की जात, कुळ, वर्ण अथवा बाह्य सामाजिक मान्यता अंतिम सत्य ठरत नाही. त्यामुळे शुद्धिपत्र मिळाले किंवा नाही, याने त्यांच्या आत्मज्ञानात काहीही फरक पडणार नव्हता.
मात्र ज्ञानदेवांची भूमिका व्यवहाराच्या दुसऱ्या बाजूकडे पाहणारी होती.
विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाही भेदाभेद स्वस्वरूपी ॥
आत्मस्वरूपाच्या पातळीवर भेद नाही; मात्र सामाजिक व्यवहाराच्या पातळीवर काही संकेत अस्तित्वात आहेत.
स्वधर्म अधिकार जातीपरत्व भेद । उचित तें शुद्ध ज्याचें तया ॥
म्हणोनियां संतीं अवश्य आचरावें । जनां दाखवावें वर्तोनियां ॥
एखाद्या गोष्टीला आपण अंतिम सत्य मानत नसलो, तरी तिचा व्यवहार समजून घेणे म्हणजे तिच्यासमोर शरण जाणे नव्हे.
या संवादाचा शेवट श्रीज्ञानदेव अत्यंत नम्रतेने करतात,
ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ति । बोलिली पद्धती धर्मशास्त्रीं ॥
‘ऐकाजी निवृत्ति’ हे शब्द विशेष महत्त्वाचे आहेत. ज्ञानदेव आपल्या गुरूंना आपला विचार सांगतात; परंतु त्यात अहंकार नाही. ते म्हणतात, ‘‘निवृत्तीनाथ महाराज, ऐका; धर्मशास्त्रातील पद्धती अशी सांगितली आहे.’’
श्रीनिवृत्तीनाथ हे केवळ शिकवणारे गुरू नव्हते; ते लहानांचे म्हणणे ऐकणारे गुरू होते. श्रीज्ञानदेव वयाने लहान आहेत म्हणून त्यांचे म्हणणे कमी महत्त्वाचे, ही भूमिका त्यांनी घेतली नाही. योग्य विचार कुणाकडूनही आला तर तो ऐकण्याची विशालता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती.
येथे गुरूची सत्ता आणि शिष्याची अधीनता नाही; येथे विचारांचा संवाद आहे. श्रीज्ञानदेव विचार मांडतात, श्रीनिवृत्तीनाथ ऐकतात आणि त्या विचाराला स्थान देतात. ज्ञानाचे नाते वयावर नव्हे, तर विचाराच्या गांभीर्यावर उभे राहते. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीने काही सांगितले म्हणून ते कमी महत्त्वाचे समजणे ही अपरिपक्वता आहे. वय अनुभव देऊ शकते; परंतु प्रत्येक वेळी अंतिम सत्य देत नाही. कधी कनिष्ठाकडूनही श्रेष्ठ विचार मिळू शकतो.
म्हणून आपल्या तत्त्वांवर ठाम राहावे; तथापि दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्याइतके मन खुले ठेवावे. एखादी गोष्ट योग्य वाटत नसेल, तर आधी तिचा विचार करावा, अनुभव घ्यावा आणि मग स्वीकार अथवा त्यागाचा निर्णय घ्यावा. श्रीनिवृत्तीनाथांचे मोठेपण केवळ ते मोठे संत होते यात नाही; ते लहान्यांचे म्हणणे मोठ्या मनाने ऐकत होते, यातही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.