उंडाळ्यात रंगली शब्द, चित्रांची मैफील
दादासाहेब उंडाळकर विद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम
उंडाळे, ता. २५ : निसर्ग हाच कलेचा मुख्य स्रोत असून, कोणतेही चित्र साकारण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण आवश्यक आहे. आपल्या आवडीच्या माध्यमात आणि पद्धतीने व्यक्त होणे हीच खरी कला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार व लेखिका आभा भागवत यांनी केले.
येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयात आयोजित ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमांतर्गत त्यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला.
इयत्ता नववीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट या पाठाच्या लेखिका स्वतः आभा भागवत आहेत. पाठ्यपुस्तकातील लेखिका प्रत्यक्षात समोर पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. यावेळी त्यांनी चित्रकलेचे विविध पैलू आणि चित्रकाराची दृष्टी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी कुतूहलापोटी अनेक प्रश्न विचारले. संवाद सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी लेखिकेवर प्रश्नांची सरबत्ती केली. यात प्रामुख्याने जागतिक कीर्तीचे चित्रकार सय्यद हैदर रझा यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये काय? गोंड आदिवासी चित्रकलेचे वेगळेपण कशात आहे? चित्र काढण्याची प्रेरणा नेमकी कोठून मिळते? एब्सट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे काय व ते कसे पाहावे? या सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. माझ्या आईने आणि बालपणातील कलाशिक्षकांनी माझ्यात चित्रकलेची ओढ निर्माण केली, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सहशालेय उपक्रम राबवले जातात. इंग्रजी विभागाच्या वतीने शिक्षक धनंजय पवार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. आर. पाटील, पर्यवेक्षक जे. एस. माळी, शंकर आंबवडे, तसेच स्वाती पाटील, प्रदीप ओंबासे, अक्षय चव्हाण उपस्थित होते. लेखिका आभा भागवत यांच्याशी झालेला हा संवाद विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय पर्वणीच ठरली.
--------------------------
00800
उंडाळे ः येथील विद्यालयात विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना आभा भागवत.
--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.