जुन्नर/नारायणगाव, ता. १३ : जुन्नर तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या आक्रमक कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा दत्तात्रेय बुचके (वय ६१) यांचे रविवारी (ता. १४) पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जुन्नर येथील वैष्णवधाम या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी बुचके यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.
जिल्हा परिषद सदस्या ते जिल्हा परिषदेच्या गटनेत्या असा आशा बुचके यांचा राजकीय प्रवास राहिला. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी जुन्नरमधून कडवी झुंज दिली होती. पक्षाच्या पलीकडे जाऊन सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभे राहणे हीच त्यांच्या राजकारणाची खरी ओळख राहिली. दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून आशा बुचके यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील रुग्णालयात उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते, मात्र रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नाना खैरे आणि मंडल अध्यक्ष आशिष माळवदकर यांनी ही माहिती दिली.
राजकीय प्रवास
२००२मध्ये मुंबई सोडल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या राजकारणात सक्रिय.
शिवसेनेकडून सलग चार वेळा (२००२-२०२२) जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी; जिल्हा परिषद गटनेतेपद भूषवले.
जुन्नर विधानसभेची निवडणूक चार वेळा लढवली; मात्र आमदार होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
आशा बुचके यांच्या निधनाने एक सक्षम, संवेदनशील आणि आक्रमक महिला नेतृत्व हरपले आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी हवाई वाहतूक
आशा बुचके यांनी प्रदीर्घ काळ जिल्हा परिषदेत जुन्नर तालुक्याचे नेतृत्व केले. त्यांचा शासन तथा प्रशासनावर प्रभाव होता. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्ये नेतृत्व हरपले आहे.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ
आशा बुचके यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढणारे लढाऊ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
- दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य
पुणे जिल्ह्यातील व जुन्नर तालुक्यातील कणखर व संघर्षशील महिला नेतृत्व, गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव आवाज उठविणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे.
- राहुल कुल, आमदार, दौंड विधानसभा मतदारसंघ
आशा बुचके यांचा प्रशासनात वेगळा दरारा होता. शासनस्तरावरून कमीत कमी वेळात अधिक विकासनिधी आणण्याचे त्यांचे कौशल्य होते.
- शरद सोनवणे, आमदार, जुन्नर विधानसभा मतदारसंघ
महिला असतानाही राजकीय कार्य कसे करावे, याचा वस्तुपाठच आशाताईंनी घालून दिला. जुन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात विकासाच्या माध्यमातून त्या पोहचल्या.
- बाबाजी काळे, आमदार, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ
आशा बुचके यांची कामाप्रती असलेली बांधिलकी आणि समर्पण नेहमीच वाखाणण्याजोगे होते.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद
आशा बुचके आणि माझे राजकारणापलीकडे अत्यंत जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते. माझ्या राजकीय जीवनातील सुवर्णकाळात त्यांची मोलाची साथ मला लाभली.
- शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार, शिरूर तथा अध्यक्ष, पुणे म्हाडा
महिलांनी कसे नेतृत्व करावे हे आशाताई यांच्याकडून शिकावे. गोरगरीब जनतेच्या त्या आधार होत्या. भारतीय जनता पक्षाने एक मुलुख मैदानी तोफ गमावली.
- प्रदीप कंद, अध्यक्ष, भाजप, पुणे जिल्हा