नातेपुते : टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत माउलींसमवेत आलेल्या लाखो वारकऱ्यांनी सोमवारी दिवसभर कडकडीत उन्हात वाटचाल केली. पुण्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील वाटचाल पूर्ण करून सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
बरड येथील मुक्काम उरकून माउलींचा पालखी सोहळा नातेपुतेच्या दिशेने मार्गस्थ झाला. काकड्याचे अभंग गात सोहळा वाटचाल करीत होता. साडेआठच्या सुमारास साधुबुवाच्या ओढ्याजवळ न्याहरीसाठी सोहळा थांबला. साधुबुवा कुंभारगावकर यांच्या समाधी मंदिरात पालखी ठेवली. पालखीसमोर कुंभारगावकर यांच्यावतीने कीर्तन झाले. शेताशिवारात वारकरी न्याहरी करीत होते. काही काळ झाडाझुडपांच्या आडोशाने विश्रांती घेत होते. अर्धापाऊण तासाचा विसावा घेऊन सोहळा पुन्हा चालू लागला.
मंदिरातील पालखी ग्रामस्थांनी रथात ठेवली. परिसरात विसावलेले वारकरी सहभागी होऊ लागले. उन्हाची तिरीप जाणवत असल्याने वारकरी घामाघूम झाले. सकाळी दहाच्या सुमारास सोहळ्याने धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. तेथे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फटाक्यांच्या आतशबाजीत पुष्पवृष्टी करत सोहळ्याचे स्वागत केले.
यानंतर उन्हातच वाटचाल करीत सोहळा धर्मपुरी बंगला परिसरात आला. पालखी जवळपास एक तासभर लवकर आली. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दीड तासाच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा पुन्हा नातेपुतेकडे चालू लागला. शिखरशिंगणापूरचा डोंगर दिसू लागताच हरिहराचे अभंग सुरू झाले.
वारकऱ्यांमध्ये चैतन्य संचारले होते. उन्हाची तिरीप जाणवत असलीतरी वाऱ्याची झुळूक वारकऱ्यांना वाटचालीत दिलासा देत होती. शिखरशिंगणापूर फाट्याजवळील विसावा उरकून सोहळ्याने नातेपुते हद्दीत प्रवेश केला. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा नातेपुते मुक्कामी पोचला.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदोबाच्या लिंबाजवळ उभे रिंगण झाले. या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण मंगळवारी (ता. १) पुरंदवडे येथील माळरानावर होणार आहे.
नातेपुते बाह्यवळण मार्गावर माळशिरसकडून वाहने सोडल्याने कोंडी
धुळीमुळे वारकऱ्यांना वाटचालीत त्रास
बाह्यवळण मार्गाच्या दुभाजकावरील झाडांच्या सावलीत काहींची विश्रांती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.