ashtavinayak ganpati sakal
पुणे

अष्टविनायकाचा महिमा अपार; जाणून घ्या सर्व गणपतींची आख्यायिका

अष्टविनायक गणपतींची आख्यायिकाची माहिती वाचा याठिकाणी

सकाळ वृत्तसेवा

अष्टविनायक गणपतींची आख्यायिकाची माहिती वाचा याठिकाणी

मयुरेश्वर - मोरगाव (ता. बारामती)

मंदिराची माहिती

मोरगाव येथे गावामध्ये मध्यभागी मयुरेश्वराचे मंदिर आहे. जमिनीपासून साधारणतः पन्नास फूट उंचीवर दगडी चौथऱ्यावर हे मंदिर वसले आहे. मंदिर बांधणी बहामनी राजवटीत झाल्याचे काही इतिहासकारांचे मत आहे. आदिलशाही काळात सरदार गोरे यांनी बांधणी केली आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यांवर चार मशिदींप्रमाणे मिनार होते. मंदिर शिखर साधारणतः ६० फूट उंच आहे. मुख्य मंदिर गर्भगृह, दर्शन मंडप, सभामंडप, अशा तीन भागांमध्ये विभागले आहे. मूर्तीची स्थापना ब्रम्हा, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंच देवतांनी केल्याचे मानले जाते. त्यामुळे या गणपतीस स्वयंभू गणपती मानतात. मयुरेश्वर मुर्तीशेजारी हलवता येण्यासारख्या सिद्धी-बुद्धी मुर्ती आहेत. तर, डोक्यावर नागाचा फणा, बेंबीत हिरा आहे.

आख्यायिका

पुरातन काळात सिंध नावाच्या राक्षसाने पृथ्वी, स्वर्ग व पातळ येथे उन्माद माजविला होता. त्यामुळे सर्व देवतांनी गणपतीची आराधना केली. भगवान गणेश व सिंध राक्षसाच्या झालेल्या युद्धात गणेशाने मोरावर आरूढ होऊन सिंधाचा वध केल्यामुळे या गणपतीस मयुरेश्वर या नावाने संबोधले जाऊ लागले.

पुण्यापासून अंतर : ६५ किलोमीटर

चिंतामणी - थेऊर (ता. हवेली)

मंदिर व मूर्ती

थेऊरचे गणेश मंदिर श्री चिंतामणी महाराज देव यांनी बांधले. हे मंदिर उत्तराभिमुख असून, भव्य व सुंदर आहे. त्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सभामंडप बांधला व देवालयाचा विस्तार केला. हरिपंत फडके व अन्य गणेश भक्तांनी देवालयात फेरफार करून त्याची भव्यता व शोभा वाढविली. मंदिराच्या उत्तरेकडील महाद्वारापासून नदीपर्यंत पेशव्यांनी दगडी सडक बांधली आहे. श्रीचिंतामणीची मूर्ती भव्य, पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. मस्तक व सोंड याखेरीज अन्य अवयव स्पष्ट दिसत नाहीत. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे.

आख्यायिका

एकदा ब्रम्हदेवाच्या चित्तात चंचलता निर्माण झाली. त्यामुळे त्याच्याकडून सर्जनकार्य व्यवस्थित पार पडेना. चित्ताच्या स्थिरतेसाठी त्याने विघ्नहर्ता गणेशाचे चिंतन व नृपानुष्ठान केले. त्या तपामुळे त्याच्या चित्ताची चंचलता नष्ट झाली. त्याचे चित्त शांत व स्थिर (अथर्व) झाले. ज्याठिकाणी ब्रह्मदेवास ही सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणाला त्याने चित्तस्थैर्याची सिद्धी देणारे स्थावर क्षेत्र असे नाव दिले. स्थावर वरून थेऊर हे नाव पडले. ब्रह्मदेवाने चित्तवृत्तीत प्रकाश पाडणाऱ्या चिंतामणी गणेशाची तेथे स्थापना केली. येथे तपश्चर्या केली असता चित्ताला स्थिरता व शांती प्राप्त होते.

पुण्यापासून अंतर- २१ किलोमीटर

श्री गिरीजात्मज गणपती - लेण्याद्री (ता. जुन्नर)

मंदिर व मूर्ती

अष्टविनायकांपैकी एकमेव श्री गिरीजात्मज गणपती लेण्याद्री डोंगराच्या सानिध्यात वास्तव्यास आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे ३०० पायऱ्यांचा चढणीचा नागमोडी वळणाचा मार्ग आहे. मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजूस २८ लेणी आहेत. मंदिराची लेणी एका मोठ्या आकाराच्या शिळेत कोरली आहे. लेण्याद्री गणपती मंदिर सात क्रमांकाच्या लेणीत असून, तेथे पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. समोरील सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. सभामंडपाच्या तीनही बाजूस ओवऱ्या कोरल्या आहेत. उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मजाची मूर्ती कोरलेली आहे.

आख्यायिका

गिरीजात्मज नावाने पूजनीय असलेल्या लेण्याद्री गणेशाच्या जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. गिरीजा म्हणजे पार्वती व आत्मज म्हणजे मुलगा. पार्वतीने आपल्याला पुत्र प्राप्तीसाठी लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली. मन एकाग्र व्हावे म्हणून मातीची बालमूर्ती बनवली. याच मूर्तीची अनन्यभावाने सेवा केली. पार्वतीच्या भक्तीला यश येऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रकट झाले, तो हा गिरिजात्मज, असे सांगितले जाते.

पुण्यापासून अंतर- ९७ किलोमीटर

महागणपती - रांजणगाव (ता. शिरूर)

मंदिराची माहिती

महागणपती मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे असून, दगडी गाभाऱ्याचे काम पेशवाईमध्ये झाले. सवाई माधवराव पेशव्यांनी हे काम केले. मंदिराच्या उजव्या बाजूला दगडी ओवऱ्या असून, पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी त्या बांधल्या. मंदिरासमोरील लाकडी मंडपाचे काम इंदूरच्या सरदार किबे यांनी केले.

आख्यायिका

प्राचीन काळी गृत्समद नावाच्या थोर ज्ञानी व्यक्तीच्या शिंकेतून जन्मलेल्या मुलाला त्यांनी आपले पूत्र मानले. त्याने पुढे त्रिलोक पादाक्रांत करण्यासाठी गणेशाची पाच हजार वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्यातून प्रसन्न झालेल्या गणेशाने त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. त्याचप्रमाणे लोखंड, रूपे व सुवर्णाची नगरी बहाल केल्याने त्याला त्रिपुरासूर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्रिपुरासूराने मृत्युलोक तर पादाक्रांत केलाच पण इंद्राचा पराभव करून स्वर्गावरही ताबा मिळवून त्रिपुरासुराने सर्वत्र हाहाकार माजविला. त्रिपुरासुराच्या वधाविषयी देवलोकांत चर्चा चालू असतानाच, नारदमुनींनी यासाठी श्री गणेशाची आराधना करण्याविषयी सुचविले. महादेवांनी मणिपुरात ही आराधना करून श्री गणेशाला प्रसन्न केले. तेथे गणेशाने एका बाणात त्रिपुरासूराचा वध करण्याचे वरदान महादेवाला दिले. मणिपुरात महादेवाने गणेशाची आराधना केली. तेच आजचे रांजणगाव. तेथे महादेवाने गणेशाची पार्थिव मूर्ती स्थापन करून घोर तपश्चर्या केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या गणेशाने दहा तोंड व शस्त्रास्त्रांसह वीस हाताचे विराट दर्शन दिले. म्हणून या गणपतीस महागणपती म्हणून संबोधले जाते. पुढे भीमाशंकर येथे महादेवाने त्रिपुरासूराचा वध केला.

पुण्यापासून अंतर : पन्नास किलोमीटर

सिद्धिविनायक - सिद्धटेक (ता. कर्जत, जि. नगर)

मंदिराची माहिती

भीमा नदीकाठी असलेल्या या उत्तराभिमुख मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा हा एकमेव गणपती आहे. मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद असून सिंहासन दगडी आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर बांधले आहे. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय व विजयाच्या मोठ्या मूर्ती आहेत. गाभारा १५ फूट उंच व १० फूट रुंद आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार असून त्यावर नगारखाना आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती टेकडीमध्ये स्थापलेली असल्याने या मंदिरास एक किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग आहे.

आख्यायिका

भगवान विष्णू हे मधू व कैटभ या दैत्यांशी लढत होते. मात्र या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नसल्याने ते मदतीसाठी श्री शंकर यांच्याकडे गेले. श्री शंकरांनी त्यांना गणपतीची आराधना करण्यास सांगितल्यावर त्यांनी ‘ऊॅं श्री गणेशाय नम:’ या मंत्राचा टेकडीवर जप करीत सिद्धी प्राप्त करीत दैत्यांचा नि:पात केला. म्हणून या क्षेत्राला सिद्धटेक व गणपतीस श्री सिद्धिविनायक असे म्हणतात.

पुण्यापासून अंतर - ९९ किलोमीटर

विघ्नहर गणपती - ओझर (ता. जुन्नर)

मंदिराची माहिती

ओझरच्या विघ्नहर गणपतीचे मंदिर कुकडी नदीच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात स्थानापन्न आहे. हा अष्टविनायकांतील सातवा गणपती असून येथे ऋषिमुनींनी तपश्चर्या केल्याचा उल्लेख काही ग्रंथामध्ये आढळतो. वसईची लढाई जिंकल्यावर चिमाजी अप्पा पेशव्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून पहिला कळस बसविला. मंदिराच्या चारही बाजूंनी साधारणपणे दहा फूट उंचीची दगडाची तटबंदी आहे. मंदिराचा कळस साधारणतः पन्नास फूट उंचीचा असून कळस आणि शिखर सोनेरी आहे. देवळाच्या समोरील प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीमध्ये दगडीओवऱ्या (खोली) आहेत. प्रवेशद्वारावर दोन द्वारपाल असून त्यांच्या हातात शिवलिंग आहे. विघ्नहर गणपतीची मुर्ती पूर्वाभिमुख असून दोन्ही बाजूला रिद्धी, सिद्धीची मूर्ती आहे. गणेश मूर्तीच्या कपाळावर, नाभीमध्ये हिरे असून डोळ्यांमध्ये माणके आहेत.

आख्यायिका

पुरातन काळात विघ्नासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर उच्छाद माजविला होता. त्यावेळी गणपती आणि विघ्ना सूर राक्षसाचे युध्द झाले त्यात विघ्नासूराची हार होऊन तो गणपतीला शरण आला म्हणून त्या राक्षसाच्या नावाने विघ्नहर गणपती प्रसिद्ध झाला. विघ्न दूर करणारा गणपती तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणूनही याची प्रसिद्धी आहे.

पुण्यापासून अंतर- ९५ किलोमीटर

वरदविनायक - महड (जि. रायगड)

मंदिराची माहिती

अष्टविनायकांत चौथा गणपती म्हणून महडचा वरदविनायक ओळखला जातो. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट व सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. येथे गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.

आख्यायिका

श्री वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. इसवी सन १७२५मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

पुण्यापासून अंतर - ८९ किलोमीटर

श्री बल्लाळेश्वर - पाली (जि. रायगड)

मंदिराची माहिती

श्री बल्लाळेश्वर मंदिर हे फार पूर्वी लाकडी होते. त्यानंतर नाना फडणीसांनी सदर मंदिराचा जीर्णोद्धार करून सांप्रतेचे पाषाणी मंदिर १७७०च्या सुमारास बांधले. मंदिर श्रीकरी घाटणीचे बांधण्यात आले आहे. मंदिर पूर्वाभिमुख, दक्षिणायनात सूर्योदय होताच सूर्याचे किरण श्रींवर पडतात. मंदिरास दोन गाभारे असून आतील गाभारा विस्तृत असून त्यात श्रींची मूर्ती सिंहासानाधिष्ठीत स्वयंभू आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम बारा फूट रुंदीचे दगडात केले असून प्रत्येक सांध्यावर शिसे ओतण्यात आले आहे.

आख्यायिका

श्री बल्लाळेश्वर कथेचा उल्लेख श्री गणेश पुराण अध्याय २२/२३ (उपासना खंड) व मुद्गल पुराण खंड ८ अध्याय ३८/३९ यांत वर्णिला आहे. पाली या गावाचे नाव पूर्वी पल्लीपूर असे होते व येथील भक्त बल्लाळ याने

अंतःकरण पूर्वक केलेल्या भक्तीमुळे गणपती ब्राम्हण रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यामुळे बल्लाळाने वर मागताना गणपतीकडे प्रार्थना केली. तुम्ही माझे नावाने येथे वास्तव्य करावे व तुमची मनोभावे प्रार्थना केल्यावर भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्या. त्यामुळे सदर स्थानास बल्लाळेश्वर असे म्हटले जाते.

पुण्यापासून अंतर - १२३ किलोमीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

Latest Marathi News Live Update : जय पवार यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी

Pune Civic Negligence: पुण्यात बेमोसमी पावसानंतर धुळीचे लोट, रस्त्यावर खडी-मातीचा ढिगारा; महापालिका, ठेकेदारांच्या निष्क्रियतेने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT