पुणे

कॅमेऱ्यासमोर ‘खरं’ असणं महत्त्वाचं!

CD

आज मी प्रेक्षकांना सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसतेय. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारख्या मोठ्या आणि अनुभवी कलाकारासोबत काम करण्याची संधी मला मिळतेय. पण इथपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास खूप वेगळा आणि तितकाच इंटरेस्टिंग आहे. हा प्रवास मला इंडस्ट्रीत नव्याने येणाऱ्या आणि येऊ पाहणाऱ्या प्रत्येक कलाकारासोबत शेअर करावासा वाटतो. कारण मी एका भूमिकेपासून दुसऱ्या भूमिकेपर्यंत पोहोचले नाही. वेगवेगळ्या स्टेजमधून, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमधून आज इथपर्यंत आले आहे.
- क्षमा देशपांडे, अभिनेत्री

‘ज्युनिअर आर्टिस्ट’पासून सुरुवात करून आज लीड भूमिका साकारण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. माझ्यासाठी या प्रवासातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एका चौकटीत अडकायचं नाही. याच वर्षी मी ‘इंद्रायणी’मध्ये खलनायिकेची भूमिका साकारली आणि त्याच वर्षी मला सावित्रीबाई फुले यांच्यासारखं ऐतिहासिक आणि अत्यंत जबाबदारीचं पात्र साकारण्याची संधी मिळतेय. त्यामुळे एक ‘ॲक्टर’ म्हणून हे वर्ष माझ्यासाठी खरंच ‘गोल्डन इयर’ आहे. पण मला इथेच थांबायचं नाही. पुढे मला अजून वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणांना सुरुवातीला एकच प्रश्न पडतो, नेमकं सुरुवात कुठून करायची? माझ्या मते या प्रवासाची पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे ऑडिशन.

ऑडिशनमध्ये पहिली गोष्ट : तुमची ओळख
ऑडिशनमध्ये आपण अभिनय सुरू करण्याआधीच आपल्याबद्दल खूप काही सांगून गेलेलो असतो. कारण तुमची मुलाखत ही केवळ फॉर्मल माहिती देण्यासाठी नसती. ते तुमचं पहिले ‘इम्प्रेशन’ असतं. म्हणून तुमचं नाव, वय, उंची, तुम्ही मूळचे कुठले आणि सध्या कुठे राहता, या बेसिक गोष्टी स्पष्ट आणि आत्मविश्वासाने सांगता आल्या पाहिजेत. मुलाखत देताना खूप काही सांगण्याच्या नादात अनावश्यक माहिती देण्याची गरज नाही. थोडक्यात, स्पष्ट आणि सहज परिचय करून देणं अधिक प्रभावी ठरतं. फक्त राइट आणि लेफ्ट प्रोफाइल दाखवणंही पुरेसं नसतं. ‘इंट्रोडक्शन व्हिडिओ’ किंवा ‘ऑडिशन प्रोफाइल’ शूट करताना तुमचा चेहरा आणि पर्सनॅलिटी कास्टिंग टीमला व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. शक्य असेल तेव्हा तुमचा नॅचरल लूक आणि ३६०-डिग्री प्रोफाइल व्यवस्थित दाखवला, तर कास्टिंग टीमला तुमचा ‘ओव्हरऑल अपिअरन्स’ समजायला मदत होते. तुम्ही कॅमेऱ्यासमोर किती कम्फर्टेबल आहात, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमचा लूक तुम्ही कसा कॅरी करता, या सगळ्या गोष्टी तिथेच दिसायला लागतात.

कॅमेऱ्यासमोरचा अभिनेता
अभिनय शिकताना आपण कसे बोलायचे, भावना कशा व्यक्त करायच्या, शरीराची भाषा कशी ठेवायची, हे शिकतो. पण कॅमेरा समोर आला की सगळं थोडं वेगळं होतं. कॅमेरा फक्त आपला चेहरा रेकॉर्ड करत नसतो. तो आपल्या प्रत्येक छोट्या हालचालीकडे, नजरेकडे आणि अगदी शांततेकडेही पाहत असतो. म्हणूनच कॅमेऱ्यासमोर अभिनय करणं म्हणजे मोठमोठ्या हालचाली करणं नाही; तर छोट्या छोट्या गोष्टींमधून खरं वाटणं.

कॅमेऱ्याकडे बघणं अन् कॅमेऱ्यासाठी अभिनय करणं यात फरक...
एखाद्या सीनमध्ये समोरची व्यक्ती असेल, तर आपण तिच्याशी बोलतोय असं वाटलं पाहिजे. प्रत्येक वेळी थेट लेन्समध्ये पाहायची गरज नसते. बहुतेक ऑडिशन सीनमध्ये आपली नजर कॅमेऱ्याच्या अगदी जवळ असलेल्या रीडरकडे असते. त्यामुळे आय-लाइन नैसर्गिक राहते. कॅमेरा साधारण डोळ्यांच्या उंचीवर असावा. चेहरा स्पष्ट दिसेल, प्रकाश समोरून किंवा सौम्य बाजूने असेल आणि बॅकग्राउंड शक्य तितका साधा असेल, याची काळजी घ्यावी. सेल्फ-टेपसाठी महागडा कॅमेरा असणं आवश्यक नाही. चांगला स्मार्टफोन, स्टेबल फ्रेमिंग, योग्य प्रकाश आणि क्लिअर ऑडिओ पुरेसा असू शकतो.

‘ऑडिशन’च्या आधीची तयारी
ऑडिशन मिळाल्यावर सर्वात आधी संवाद पाठ करण्याऐवजी सीन समजून घ्या. हे पात्र कोण आहे, या सीनमध्ये त्याला काय हवं आहे, तो समोरच्या व्यक्तीकडून काय मिळवण्याचा प्रयत्न करतोय, त्याची मनःस्थिती काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिलेला संवाद तो आत्ताच का बोलतोय? हे समजलं की संवाद फक्त पाठ केलेल्या ओळी राहत नाहीत; ते त्या पात्राचे विचार बनतात. अभिनय करताना आपण अनेकदा संवादावर जास्त लक्ष केंद्रित करतो. पण प्रत्यक्षात संवादाच्या आधी आणि नंतरचंही तितकंच महत्त्वाचं असतं. समोरची व्यक्ती बोलत असताना आपण काय ऐकतोय? तिच्या बोलण्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय? त्यानंतर आपली प्रतिक्रिया काय आहे? या सगळ्या गोष्टी अभिनयाचा भाग आहेत.

ऑडिशनमध्ये अभिनय किती करायचा?
हा कदाचित सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅमेऱ्यासमोर रंगमंचासारखा मोठा अभिनय करण्याची गरज नसते. रंगमंचावर शेवटच्या रांगेपर्यंत भावना पोहोचवाव्या लागतात; पण कॅमेरा तुमच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ असतो. म्हणूनच कधी कधी एक छोटासा पॉज, एक नजर, हलकंसं हसणं किंवा काही क्षणांची शांतता संवादापेक्षा जास्त काही सांगून जाते. कॅमेऱ्याला भावना दाखवायच्या नसतात; त्या खऱ्या अर्थाने अनुभवायच्या असतात. तुम्ही रडत असल्याचा अभिनय केला आणि खरंच दुःखी असल्यासारखं वाटलं नाही, तर कॅमेरा ते लगेच पकडतो. उलट, डोळ्यांत अश्रू नसतानाही तुमच्या नजरेत भावना खरी असेल, तर ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

‘सेल्फ-टेप’ देताना काय लक्षात ठेवायचं?
आज अनेक ऑडिशन्स सेल्फ-टेपच्या माध्यमातून होतात. त्यामुळे घरातून ऑडिशन देतानाही काही बेसिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फोन किंवा कॅमेरा स्थिर ठेवा. शक्यतो डोळ्यांच्या उंचीवर कॅमेरा ठेवा. चेहरा व्यवस्थित दिसेल असा प्रकाश ठेवा. आवाज स्पष्ट आणि बॅकग्राउंड नॉइज कमी असावा. अनावश्यक फिल्टर किंवा एडिटिंग टाळा. कास्टिंग ब्रिफमध्ये ज्या सूचना दिल्या आहेत, त्या तंतोतंत पाळा. रीडर कॅमेऱ्याच्या अगदी जवळ ठेवल्यास आय-लाइन नॅचरल राहते. टेक देताना स्वतःचा चेहरा स्क्रीनवर पाहण्यापेक्षा सीनवर लक्ष केंद्रित करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ‘सेल्फ-टेप’ हा छोटी फिल्म बनवण्याचा प्रयत्न नाही. तो तुमचा अभिनेता म्हणूनचा सॅम्पल आहे.

ऑडिशनमध्ये ‘परफेक्ट’ होण्याचा प्रयत्न करू नका
ऑडिशनच्या वेळी अनेक कलाकारांच्या मनात एकच विचार असतो, ‘मला ही भूमिका मिळालीच पाहिजे.’ आणि तिथेच प्रेशर सुरू होतं. त्याऐवजी ‘मला ही भूमिका मिळाली तर मी या पात्राला माझ्यातून काय देऊ शकते?’, असा विचार करा. कास्टिंग टीमला तुमचा डायलॉग किती परफेक्ट आहे, यापेक्षा तुम्ही त्या पात्रात किती बिलीव्हेबल दिसता, ऐकता आणि रिॲक्ट करता, हे महत्त्वाचं असतं. अनेकदा तुमचा डायलॉग नसतानाही तुम्ही सीनमध्ये काय ऐकत आहात आणि कसं रिॲक्ट करत आहात, हे तितकंच महत्त्वाचं असतं.

भूमिका मिळाली नाही, म्हणजे ऑडिशन वाईट, असं नाही!
प्रत्येक ऑडिशन म्हणजे रोल मिळवण्याची संधीच असेल असं नाही. कधी तुम्ही खूप चांगलं ऑडिशन देता आणि तरीही भूमिका मिळत नाही. कारण कधी तुमचा लूक पात्राला मॅच होत नाही, कधी दुसरा ॲक्टर त्या भूमिकेसाठी योग्य वाटतो, तर कधी प्रॉडक्शनच्या गरजा वेगळ्या असतात. पण याचा अर्थ तुमची ऑडिशन वाईट होती, असा अजिबात नाही.

अभिनेता म्हणून आपलं काम ऑडिशन ‘जिंकणं’ नाही; आपलं काम त्या काही मिनिटांत पात्राला प्रामाणिकपणे जिवंत करणं आहे. प्रत्येक ऑडिशन हा एक अनुभव असतो. भूमिका मिळाली नाही तरी त्या अनुभवातून काहीतरी शिकता येतं. पुढच्या वेळी कॅमेऱ्यासमोर अधिक सहजपणे उभं राहता येतं. अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर सातत्य हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. अभिनयाचा सराव, आवाजावर काम, शरीराची भाषा, निरीक्षणशक्ती, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचणं, चित्रपट-नाटकं पाहणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माणसांना समजून घेणं, या सगळ्याचा उपयोग कलाकाराला होतो. भूमिका मिळण्याची प्रक्रिया आपल्या हातात नसते. पण भूमिका मिळाल्यावर ती साकारण्यासाठी स्वतःला तयार ठेवणं आपल्या हातात असतं.

आणि शेवटी...
कॅमेरा सुरू झाल्यावर बाहेरचं सगळं विसरून त्या क्षणात जगता आलं, तर कॅमेरा तुमचा शत्रू राहत नाही. तो तुमचा सर्वांत प्रामाणिक पार्टनर बनतो. कदाचित कॅमेरा ॲक्टिंगचं खरं सौंदर्यही हेच आहे, ‘कॅमेऱ्यासमोर ‘अभिनय’ करण्यापेक्षा, कॅमेऱ्यासमोर खरं असणं.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT