पिंपरी, ता. १६ ः मोशी येथे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) स्वयंचलित चाचणी केंद्र उभारण्यात आले असून एक जुलैपासून ते सुरु करण्यात आले आहे. पहिल्या पंधरा दिवसात एकूण ८४ वाहनांची फिटनेस तपासणी करण्यात आली असून यात तब्बल ७४ टक्के वाहने फेल झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड स्वयंचलित चाचणी केंद्राची जून २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर मोशी येथे ११ हजार चौरस फुटांचे चाचणी केंद्र उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. एक जूलै पासून हे केंद्र सुरु करण्यात आले असून प्रवासी आणि मालवाहतूक वाहन स्वयंचलित ट्रॅकवर गेल्यावर हेडलाईट अलायनर, स्पीडो मीटर टेस्टर, रोलर ब्रेक टेस्टर, कारसाठी सस्पेंशन टेस्टर, स्टेअरिंग प्ले, गिअर, स्पीड गव्हर्नर, प्रवासी वाहनांचे व्हीएलटीडी अशी त्याची विविध प्रकारची चाचणी करण्यात येत आहे. वाहनांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर वाहनांना स्वयंचलित यंत्रांच्या माध्यमातून योग्यता प्रमाणपत्र दिले जात आहे. एक ते १४ जूलै दरम्यान एकूण ८४ वाहनांची फिटनेस तपासणी स्वयंचलीत चाचणी केंद्रावर करण्यात आली असून यापैकी केवळ २२ वाहनेच फिटनेस तपासणीत पास झाले आहेत. तर ६२ वाहने फेल झाले. यावरून तपासणी केलेल्या एकूण वाहनांच्या केवळ २६ टक्केच वाहने फीट असून ७४ टक्के वाहने अनफिट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान वाहनांमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यामुळे ही वाहने फेल होत असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली आहे.
सहा मिनिटांत तपासणी कागदावरच
नवीन स्वयंचलित चाचणी केंद्र सुरू झाल्यानंतर स्वयंचलित यंत्रांद्वारे केवळ सहा मिनिटांत वाहनांची तपासणी होणार. वाहन योग्यता तपासणी क्षमता ३०० इतकी होणार असा दावा आरटीओ प्रशासनाने केला होता. मात्र प्रत्यक्षात १४ दिवसात केवळ ८४ वाहनांची आणि दिवसाला सरासरी फक्त सहा वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
कुठे कराल नोंदणी
योग्यता प्रमाणपत्र चाचणीसाठी https://vahan.parivahan.gov.in/AFMS/ या संकेतस्थळावर नोंदणी करूनच वाहनांची स्वयंचलित चाचणी केंद्रावर योग्यता तपासणी बंधनकारक करण्यात आले आहे.
मनुष्यबळावर आधारित तपासणीला ‘ब्रेक’
परिवहन संवर्गातील वाहनांची पहिली आठ वर्षे योग्यता तपासणी प्रत्येकी दोन वर्षांनी करण्यात येते. आठ वर्षांनंतर ही तपासणी दरवर्षी करण्यात येते. ती केल्यानंतरच वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. पूर्वी वाहनांची तपासणी पूर्णपणे मनुष्यबळावर आधारित होती. निरीक्षक वाहनांचे ब्रेक, दिवे तपासून तसेच सुमारे २५० ते ४०० मीटर अंतरावर वाहन चालवून फिटनेस प्रमाणपत्र देत असत; मात्र या पद्धतीत त्रुटी राहण्याची शक्यता असून, निकाल निरीक्षकांच्या वैयक्तिक मतावर अवलंबून राहत होता. वाहनांचे अपघात कमी करून त्यांची अचूक तपासणी करण्याच्यादृष्टीने परिवहन विभागाने पिंपरी चिंचवडसह राज्यातील ५२ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित चाचणी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला होता.
वाहनांची पूर्ण तपासणी यंत्रामार्फत होत असल्यामुळे थोड्या जरी त्रुटी राहिल्या तरी ती वाहने फेल होत आहेत. नवीन पद्धतीने तपासणी होत असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे. पण, पुढील काळात तपासणीची गती वाढेल.
- राहूल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.