मंचर, ता. १ : शेवाळवाडी- अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे गोरक्षनाथ टेकडीवर बाबा खेतानाथजी अवधूत योगीराज यांची ३५वी पुण्यतिथी व श्री शैनेश्वर महाराज यांचा २१वा वर्धापनदिन बुधवारी (ता. ३१) उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी राजस्थान, गुजरात, लोणावळा, खोपोली, पुणे येथील भाविक आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाबा खेतानाथजी ट्रस्टचे अध्यक्ष महंत योगी कृष्णानाथजी गुरू रविनाथजी व हनुमानगड- राजस्थान येथील उद्योजक अजित साहू यांच्या हस्ते झाले. पूना ब्लड सेंटर व बाबा खेतानाथजी ट्रस्टच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी ट्रस्टचे सचिव सुरेश भोर, खजिनदार किशोर अडवाणी, दत्ता थोरात, मिलिंद खुडे, अरविंद वळसे पाटील, ऋषिकेश गावडे, बाबूराव तांबडे, भरत सोनी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबा खेतानाथजी, अवधूत योगीराज व राविनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रकाश बाविस्कर व मनीषा बाविस्कर यांच्या हस्ते झाले. प्रतिमांची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. श्री शैनेश्वर महाराज शिळेचे पूजन करण्यात आले. महंत मिरचीनाथ महाराज, माई महाराज, तुफाननाथ महाराज, वालजी गोयल, नरेंद्र तोलानी, गुजरात भवानी शर्मा (वापी- गुजरात), सुनील मदान, तन्मय समदडीया आदी अग्रभागी होते.
रक्तदानाचे महत्व व गरजाबाबत पूना ब्लड सेंटरचे डॉ. लक्ष्मण बिराजदार व डॉ. सुमित पाटील यांनी आणि पर्यावरणाच्या महत्वासंदर्भात गार्गी काळे पाटील व शितल निघोट यांनी मार्गदर्शन केले.