NZR26A00548
चिणके (ता. सांगोला) : येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित बाल शिवदुर्ग महोत्सवात किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहताना ग्रामस्थ.
---
चिमुकल्यांच्या हातून साकारले ४७ ऐतिहासिक किल्ले!
चिणके येथे बाल शिवदुर्ग महोत्सवाला प्रतिसाद; गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
नाझरे, ता. ९ : छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, गड-किल्ल्यांविषयी प्रेम आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, तसेच मोबाईलच्या वाढत्या वापरापासून मुलांना काही काळ दूर ठेवून त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने चिणके ग्रामस्थांच्या वतीने बाल शिवदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला बाल स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी तब्बल ४७ विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या.
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुट्टीचा विधायक उपयोग व्हावा आणि अभ्यासाच्या चौकटीबाहेर जाऊन त्यांना इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती घेता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. या महोत्सवात मुरुड-जंजिरा, पन्हाळगड, रायगड, शिवनेरी यांसह महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी किल्ल्यांचे बुरुज, तटबंदी, प्रवेशद्वारे, माची आदी ऐतिहासिक रचना उभारल्या. त्यातून त्यांची कल्पकता, कलात्मकता आणि निरीक्षणशक्ती दिसून आली. पाठ्यपुस्तकांमधून किल्ल्यांचा इतिहास वाचण्याबरोबरच स्वतः प्रतिकृती तयार करताना त्यांच्या रचनेची आणि ऐतिहासिक महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीतील गड-किल्ल्यांचे योगदान समजून घेण्याची संधीही या उपक्रमातून मिळाली. या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याची जाणीव नव्या पिढीत रुजविण्याच्या दृष्टीने चिणके ग्रामपंचायतीचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
---
कोट
चिणके ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे गावातील बालचमूंना आपले कलागुण दाखविण्यासाठी एक आगळेवेगळे व्यासपीठ मिळाले. मोबाईलपासून दूर राहून चिमुकल्यांनी किल्ले बनवताना घेतलेला आनंद या सुट्टीचा अविस्मरणीय असल्याचे अनेकांनी सांगितले. बालकांच्या हातून साकारलेल्या या ४७ किल्ल्यांच्या प्रतिकृती म्हणजे केवळ स्पर्धेतील कलाकृती नसून शिवइतिहासाशी नव्या पिढीला जोडणारा एक सुंदर प्रयत्न ठरला आहे.
- डॉ. रामहरी मिसाळ, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.