पुणे

शेतकरी नियोजन ः गाय म्हैसपालन

CD

शेतकरी नियोजन ः गाय-म्हैसपालन
----------
शेतकरी : बालाजी भागवत वांगसकर
गाव : मसला, (ता. जि. लातूर)
एकूण जनावरे ः २०
एकूण शेती : चार एकर
-------------------------
मसला (ता.जि. लातूर) शिवारात बालाजी भागवत वांगसकर यांचा बंदिस्त व मुक्तसंचार गाय व म्हैसपालनाचा व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी वडिलोपार्जित किराणा व्यवसाय केला. त्यानंतर ऊस वाहतूक व अन्य व्यवसायही केले. परंतु त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. पारंपरिक पद्धतीने दोन गाईंचे संगोपन केला जात होते. त्याचा विस्तार करण्याचा निर्णय बालाजी यांनी केला. शेतीतून मिळालेले उत्पन्न आणि काही खासगी संस्थांकडून आर्थिक मदत घेऊन तीन वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. हळूहळू गोठ्यातील जनावरांची संख्या वाढवीत गेले. आज गोठ्यात १० गाई, २ म्हशी तसेच लहान मोठी मिळून २० जनावरे आहेत. व्यवसायासाठी बंदिस्त व मुक्तसंचार पद्धतीचे शेड उभारले. यासह चारा लागवड, मुरघास निर्मिती व कालवड संगोपनावर भर देत व्यवसायत कौशल्य प्राप्त केले आहे. आज गोठ्यातून प्रति दिन सुमारे १४० लिटर दुधाचे संकलन होते. दुग्ध व्यवसायात बालाजी यांना पत्नी छाया, मुलगा प्रशांत, त्याची पत्नी पायल, मुलगा नितीन, शिवकुमार यांची मदत मिळते.
--------------
गोठ्यातच पैदाशीवर भर ः
बालाजी व मुलगा प्रशांत यांनी पतसंस्थेकडून कर्ज घेऊन चार एचएफ गाईंची खरेदी केली. व्यवसायातील उत्पन्नातून नवीन चार गाई व दोन म्हशी खरेदी केल्या. दर्जेदार पशुपैदाशीवर भर देत त्यांनी गोठ्यातच पैदाशीवर भर दिला. कालवड संगोपनासाठी खासगी डेअरीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. कालवड संगोपनात कालवडीला तीन महिन्यांपर्यंत एका वेळेला अडीच ते तीन लिटर दूध बाटलीने पाजले जाते. त्यानंतर हळूहळू दूध पिण्याची सवय कमी करून चारा खाण्याची सवय लावली जाते.
------------
मुरघास निर्मितीवर भर ः
चाराटंचाईच्या काळात जनावरांना दर्जेदार आणि पोषक चारा उपलब्ध होण्यासाठी कडवळापासून मुरघास निर्मितीचे तंत्र त्यांनी अवगत केले आहे. गोठ्यात मुरघास वापरून शिल्लक मुरघासाची विक्री केली जाते. या व्यवसायात अर्धा खर्च व अर्धे उत्पन्न मिळत असून फिरता पैसा हाती येतो. मुलगा प्रशांत नोकरीच्या निमित्ताने पुण्याला जाण्याच्या तयारीत होता. मात्र या व्यवसायातील आर्थिक शाश्वती पाहून त्याने गावी राहूनच व्यवसाय वृद्धीचा निर्णय घेतल्याचे बालाजी वांगसकर अभिमानाने सांगतात. त्याच्या साथीने या व्यवसायाला चांगली उभारी मिळाली आहे.
-----------------------
व्यवसायातील बाबी ः
- जनावरांच्या संगोपनासाठी बंदिस्त आणि मुक्त संचार पद्धतीच्या शेडची उभारणी केली आहे. बंदिस्त शेड ४८ फूट लांब आणि १४ फूट रुंद व त्याला जोडून बारा फूट बाय दहा फुटांचे आहे. तर मुक्तसंचार गोठा ९० फूट बाय ३० फुटांचा आहे. त्यात ४८ फूट बाय १२ फूट पत्र्याचे शेड आहे.
- बंदिस्त मुक्तसंचार गोठ्यात लहान कालवडींच्या संगोपनासाठी स्वतंत्र कप्प्य तयार केले आहेत.
- दहा गायींसाठी सिमेंटच्या २५ फूट व ३५ फूट लांबीच्या दोन गव्हाणी आहेत. त्यातून गाईंना चारा खाणे सुलभ होते. उर्वरित जनावरांसाठी सिमेंटच्या कुंड्या आहेत.
- दररोज सकाळी पाच वाजता शेडमधील कामांस सुरुवात होते. सुरुवातीला गोठ्यातील शेण मागे ओढून गोठा स्वच्छ केला जातो. त्यानंतर खुराक दिला जातो.
- त्यानंतर सर्व जनावरांचे दूध मिल्किंग मशिनने काढले जाते. गोठ्यात सर्व जनावरांचे दूध काढून झाल्यावर ते डेअरीला पाठवले जाते.
- सकाळी व सायंकाळी दीड ते दोन तास गोठ्यातील कामांसाठी राखीव ठेवले जातात. त्यामुळे योग्य वेळेत सर्व कामे पूर्ण करणे शक्य होते.
- गोठ्यातून दरवर्षी साधारण ३० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याचा आवश्यकतेनुसार शेतात वापर करून उर्वरित शेणखताची विक्री केली जाते. घरच्या शेतामध्ये शेणखताचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांवरील खर्चात बचत झाली असल्याचे बालाजी सांगतात.
-----
चारा, पाणी व्यवस्थापन ः
- संपूर्ण क्षेत्रावर चारा पिकांच्या लागवडीवर भर दिला जातो. ओला चारा नियमित उपलब्ध होण्यासाठी पाऊण एकरामध्ये ऊस, कडवळ सव्वा एकरावर तर उर्वरित एकरावर नेपिअर लागवड करण्यात आली आहे. एकानंतर एक ओला चारा उपलब्ध होईल, या पद्धतीने चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन केले जाते.
- मुरघास तयार करण्यासाठी दरवर्षी कडवळ लागवड केली जाते. त्यापासून सुमारे १८ टन मुरघास तयार होतो. मुरघासमध्ये कडवळाची कुट्टी करून मोठ्या पिशव्यांत दबाई करून बोध भरून ठेवले जातात. असे पाच टनांचे तीन ते चार मुरघासाचे बोध तयार केले जातात. या माध्यामातून वर्षभर दर्जेदार खाद्य जनावरास उपलब्ध होते.
- आरोग्य आणि दूध उत्पादन टिकून राहण्यासाठी वेळेवर चारा आणि पाणी देण्याचे नियोजन केले जाते.
- प्रत्येक जनावरांना गरजेएवढा चारा देण्यासाठी निरीक्षण करून चाऱ्याचे प्रमाण निश्चित केले जाते.
- प्रति दिन गाईला प्रत्येकी १५ किलो, तर म्हशीला वीस किलो चारा दिला जातो. चाऱ्यात मुरघास पाच किलो, उर्वरित घास गवत व कडबा दिला जातो. दूध उत्पादनानुसार गाईला एका वेळेला तीन ते साडेतीन किलो खुराक दिला जातो.
- पिण्याच्या पाण्यासाठी बंदिस्त शेडमध्ये ड्रम तर मुक्तसंचार गोठ्यात सिमेंटचा हौद तयार केला आहे.
- बंदिस्त गोठ्यातील गाई दररोज धुतल्या जातात. त्यांची व शेडची नियमित स्वच्छताही केली जाते. त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
--------
आरोग्य व्यवस्थापन ः
गाई व म्हशीच्या रोजच्या दिनचर्येत काही बदल दिसून आला तर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. गाईने चारा खाल्ला नाही किंवा कमी खाल्ला किंवा ताप किंवा अन्य लक्षणे असल्यास पशुवैद्यकांना त्वरित पाचारण केले जाते. दिवसभर गोठ्यातच मुक्कामी असल्यामुळे गाई व म्हशींच्या आजाराचे लक्षणे लागलीच दिसून येतात. कृत्रिम रेतन व गर्भधारणेसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी विविध साथीच्या रोगांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. जंतनाशक व टॉनिक पावडरही नियमित दिली जाते.
------
दूध उत्पादन व विक्री ः
दुधाची रांजणीच्या (ता. कळंब) येथील डेअरीला विक्री केली जाते. या डेअरीचे संकलन वांगसकर पितापुत्र चालवतात. गाईपासून दररोज १४० लिटर दूध उत्पादन मिळते. येत्या काळात गोठ्यातील गाईंची संख्या वाढवून व्यवसायाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. मुक्तसंचार गोठा अधिक आधुनिक पद्धतीने तयार करायचा आहे. पक्क्या खोलीचे बांधकाम करायचे आहे. सर्व गाई व म्हशींसाठी आणखी सुविधा उभारणार असल्याचे बालाजी सांगतात.
--------
- बालाजी वांगसकर, ९७६५२०७८२९
(शब्दांकन : विकास गाढवे)

फोटो
बालाजी भागवत वांगसकर
agnltr_21august2026_4.jpg बालाजी वांगसकर यांच्या गायपालनातील मुक्तसंचार गोठ्यातील गाई.
agnltr_21august2026_5.jpg कालवड संगोपनासाठी शेडमध्ये स्वतंत्र कप्पा केला आहे.
agnltr_21august2026_6.jpg बंदिस्त शेडमधील गाई व म्हशी.
agnltr_21august2026_7.jpg मुक्तसंचार गोठ्यात चाऱ्यासाठीच्या कुंड्या.
agnltr_21august2026_8.jpg हिरव्या चाऱ्यासाठी केलेली व्यवस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT