फोटो : NGP26I32763
नागपूर : चंद्रपूर येथील ‘महाजेनको’च्या परिसरात राखेने गजबजलेला परिसरात संशोधनानंतर लावलेल्या बांबूमुळे हिरवागार झालेला परिसर
राखेतून फुलू लागले बांबूचे वन!
‘नीरी’च्या प्रयोगाला यश : वैराण २७० एकर क्षेत्र झाले हिरवेगार...
कौस्तुभ चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २८ : चंद्रपूर जिल्ह्यातील ‘महाजेनको’च्या परिसरातील ‘फ्लाय ॲश डंपिंग साइट’ म्हणजे राखेच्या २७० एकर वैराण क्षेत्रामुळे तेथील नैसर्गिक जीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. त्यावर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (नीरी) संशोधन करून तेथे बांबूची लागवड केली आहे. त्यामुळे परिसरात नव्याने हरित पट्टा निर्माण झाला आहे.
या जागेच्या जवळच निवासी वस्त्या असल्याने ‘फ्लाय ॲश डंपिंग साइट’मधील उडणाऱ्या राखेचा थेट परिणाम नागरिकांवर होत होता. कोरडे आणि वाऱ्याचे वातावरण असताना या राखेचे बारीक, हलके आणि सैल कण हवेत सहज मिसळतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होते. परिणामी हवेची गुणवत्ता खालावून पीएम१० आणि पीएम२.५ या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढते. घरांच्या छतांवर, रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांवर राख साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण झाला होता. या राखेच्याच्या हलक्या उडणाऱ्या कणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘नीरी’चे वैज्ञानिक लाल सिंग यांनी संशोधन करून ‘इको-रिज्युव्हिनेशन’ या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या ‘डंपिंग साइट’सह परिसरात दाट, बहुस्तरीय हरित पट्टा विकसित केला जात आहे. या राखेच्या पृष्ठभागावर वनस्पतींचे आवरण निर्माण करून वाऱ्यामुळे राख उडण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
बांबूसह स्थानिक निवड
हरित पट्टा विकसित करण्यासाठी बांबूसह स्थानिक आणि प्रतिकूल वातावरणातही वाढू शकणाऱ्या वनस्पतींच्या प्रजातींची निवड करण्यात आली आहे. या परिसरातील वातावरण, जमिनीची स्थिती आणि धुळीचे प्रमाण लक्षात घेऊन वनस्पतींची निवड करण्यात आली. बांबूची वाढ वेगाने होत असल्याने तसेच त्याची मुळे जमिनीला धरून ठेवण्यास मदत करत असल्याने त्याचा वापर करण्यात आला आहे.
सुपीकता वाढविण्यावर भर
‘फ्लायॲश’च्या पृष्ठभागावर थेट झाडे वाढविणे आव्हानात्मक असल्याने त्यासाठी विशेष उपाययोजना करुन सेंद्रीय घटक, सूक्ष्मजीव (मायक्रोबियल कन्सोर्टिया) आणि ‘मायकोरायझा’चा वापर करून जमिनीची गुणवत्ता आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक वातावरण तयार करण्यात आले. त्यामुळे वनस्पतींची मुळे विकसित होण्यास मदत होत असून, ‘फ्लाय ॲश डंपिंग साइट’च्या पृष्ठभागावर हिरवळ निर्माण होत आहे. या प्रक्रियेत तयार करण्यात येणारे वनस्पतींचे आवरण ‘व्हेजीटेटिव्ह बायो-शिल्ड’ म्हणून काम करणार आहे. त्यामुळे ‘फ्लायॲश’चा पृष्ठभाग स्थिर राहण्यास आणि वाऱ्यामुळे राखेचे कण हवेत पसरण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
‘बफर झोन’ची निर्मिती
या राखेचे क्षेत्र अन् निवासी वस्ती यांच्यामध्ये हरित पर्यावरणीय ‘बफर झोन’ तयार करण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे. हा हरित पट्टा धुळीचे कण रोखण्यासोबतच परिसराचे हवामान सुधारण्यास आणि पर्यावरणीय स्थिती स्थिर करण्यास उपयुक्त ठरणार आहे. यामुळे दीर्घकालीन स्तरावर या राखेचे अधिक शाश्वत पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.