बालेवाडी, ता. २६ : बाणेर रस्ता येथील बालेवाडी फाट्याजवळच असलेले एक जुने पिंपळाचे झाड काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तोडले आहे. सकाळी ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंधरा दिवसांपूर्वीदेखील बाणेर रस्त्यावरील एक मोठे झाड असेच रात्रीच्या वेळी तोडण्यात आले होते. ‘‘रात्रीच्या वेळी अशाप्रकारे वृक्षतोड होणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी,’’ अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाणेर परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात आणि खूप झपाट्याने होत आहे. त्यामुळे अनेक मोठे गृह प्रकल्प, मोठी दुकाने, हॉटेल व्यवसाय सुरू झालेले आहेत. त्यादृष्टीने या ठिकाणी जाहिराती करताना किंवा पार्किंगसाठी जागा कमी पडत असेल, तर अशा प्रकारे रात्रीतून झाडे कापण्याचा प्रकार सतत सुरू असतात. असाच एक प्रकार बाणेर येथील बालेवाडी फाटा येथे घडला. या ठिकाणी सिग्नलजवळच एक पिंपळाचे झाड गेल्या पंधरा वर्षांपासून होते. या ठिकाणी मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने येथे रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी हे झाड काढण्यात यावे, यासाठी बाणेर वाहतूक पोलिसांकडून महापालिकेला तसे पत्रही देण्यात आले होते. यासंदर्भात औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून या झाडाची पाहणी ही करण्यात आली होती. हे झाड इथून काढून ते दुसरीकडे लावण्याचा प्रस्ताव ही ठेवण्यात आला होता. या झाडाच्या स्थलांतरासाठी परवानगीची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे त्यांच्याकडून हे झाड तोडण्यात आले नसल्याचे वृक्ष निरीक्षक अनिल साबळे यांच्याकडून सांगण्यात आले, तर वाहतूक विभागाकडूनही संबंधित झाड तोडण्यात आले नसल्याचे बाणेर शाखा साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद डोंगरे यांनी सांगितले. त्यामुळे हे झाड नक्की कोणी आणि का तोडले, हा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यासंदर्भात बाणेर-बालेवाडी नागरिक मंच तसेच औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे वृक्ष निरीक्षक यांच्याकडून बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
परिसरात मेट्रोच्या कामासाठी ५० झाडे कापण्यात आली. पथ विभागास रस्ता रुंदीकरणासाठी ८० झाडे कापायची आहेत. त्यामुळे या भागातील हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण, तापमान वाढ आणि पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे झाडे वाचवायची गरज आहे. इथे मात्र रात्रीतून झाडे कापली जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. याची चौकशी व्हायला पाहिजे.
- मेघना भंडारी, बाणेर-बालेवाडी नागरिक मंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.