बँकेने जप्त केलेल्या
मालमत्तेचे सील तोडले
माळशिरसमधील दांपत्याविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ६ : कर्ज थकविल्यामुळे बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी माळशिरस येथील दांपत्याविरुद्ध वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रामदास आबासाहेब देशमुख आणि शुभांगी रामदास देशमुख अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख दांपत्याने रतनचंद शहा सहकारी बँकेच्या नातेपुते शाखेकडून ४४ लाख रुपयांचे मालमत्ता तारण कर्ज घेतले होते. या कर्जासाठी वेळापूर (ता. माळशिरस) येथील गट क्रमांक १२१०/२/अ मधील मालमत्ता क्रमांक ६७०, एकूण १,६०० चौ. मीटर क्षेत्रावरील लॉज, बिअर बार आणि पुढील गाळे बँकेकडे तारण ठेवले होते. मात्र, दीर्घकाळ कर्जाचे हप्ते थकविल्याने बँकेने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २१ ऑक्टोबर २०२६ रोजी मंडल अधिकारी एस. टी. चव्हाण, बँकेचे अधिकारी आणि विशेष वसुली अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मालमत्तेचा ताबा घेण्यात आला. त्यानंतर संपूर्ण मालमत्तेला कुलूप लावून लाखेचे सील करण्यात आले.
२६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नातेपुते शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र माने पाहणीसाठी गेले असता मालमत्तेचे सील तोडल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी बँकेचे प्राधिकृत अधिकारी दीपक आदोने यांनी वेळापूर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार देशमुख दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस कॉन्स्टेबल नितीन माळी तपास करीत आहेत.