बारामती, ता. २७ : ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान डीजे व साऊंड सिस्टीम बंद करण्याच्या पोलिसांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी १७ डीजे व साऊंड सिस्टीम मालक-चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिरवणुकीपूर्वीच सार्वजनिक शांतता, धार्मिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधितांवर प्रतिबंधात्मक नोटीस पोलिसांनी बजावली होती. धार्मिक अथवा संवेदनशील ठिकाणांसमोर आवाज वाढवू नये, मिरवणूक थांबवून साऊंड सिस्टीम वाजवू नये, चिथावणीखोर गाणी किंवा ऑडिओ प्रसारित करू नयेत तसेच पोलिसांनी डीजे बंद करण्यास सांगितल्यास तत्काळ आदेशाचे पालन करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
याप्रकरणाची फिर्याद पोलिस शिपाई अमोल रावसाहेब देवकाते यांनी दिली. तपासादरम्यान संबंधित डीजे व साऊंड सिस्टीमची ओळख, वाहनांची माहिती, नोटिसा बजावल्याचे पुरावे, घटनास्थळी दिलेल्या सूचना तसेच सीसीटीव्ही, फोटो, व्हिडिओ आणि इतर ई-साक्ष्यांची पडताळणी केली जाणार आहे. गुन्ह्यात संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्यास डीजे, स्पीकर, बास युनिट, ॲम्प्लिफायर, मिक्सर व इतर साहित्य कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.