बारामती, ता. १० : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदानाच्या पूर्वसंध्येला पैसे वाटपाचा प्रयत्न झाल्याचा आरोप आमदार संजय जगताप, पॅनेलप्रमुख पुरुषोत्तम जगताप आणि सुदाम इंगळे यांनी केला. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी हे आरोप फेटाळून लावत माळेगावच्या नगराध्यक्षांची गाडी फोडल्याचा आरोप करत राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे पत्रकार परिषदेत नमूद केले.
नीरा-बारामती मार्गावरील होळ गावच्या हद्दीत शनिवारी (ता. १०) पहाटे एका चारचाकी वाहनात पैसे आढळल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संजय जगताप, पुरुषोत्तम जगताप यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलच्या उमेदवारांसाठी पैसे वाटप करण्याच्या उद्देशाने वाहनातून पैसे नेले जात असल्याचा संशयावरून कार्यकर्त्यांनी वाहन थांबवून याबाबत पोलिस व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती दिली. वाहनात पैशांची पाकिटे असून त्यावर वीस रुपयांची नोट ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. अशा प्रकारे सुमारे दोन लाख रुपये असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या घटनेशी संबंधित चित्रीकरण समाजमाध्यमांवर उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, पैसे नेण्यामागील उद्देश आणि या प्रकरणातील संबंधितांची भूमिका याबाबत अधिकृत तपासातून स्पष्टता येणे आवश्यक आहे.
राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी
राष्ट्रवादी कॉंग्रेसने हे आरोप फेटाळून लावत ज्या पैशांचा उल्लेख होत आहे, ते पैसे कोठून आले, याची फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली. माळेगावच्या नगराध्यक्षांच्या गाडीवर हल्ला कोणी व कसा केला, याच्या चौकशीचीही मागणी करण्यात आली. ज्या वीस लाखांचा उल्लेख होत आहे, तो वीस लाखांचा आकडा आला कोठून? असाही सवाल कोरेकर व होळकर यांनी उपस्थित केला. पुरुषोत्तम जगताप यांना पराभव समोर दिसल्याने पायाखालची वाळू सरकल्याने राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
परस्परविरोधी तक्रारी
या प्रकरणात संबंधित पक्षांकडून परस्परविरोधी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा आणि निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या समन्वयाने चौकशी करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे व उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करून आचारसंहितेचा भंग किंवा मतदारांना आर्थिक प्रलोभन दिल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सांगितले.
मिलिंद संगई, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.