उंडवडी, ता. २१ : करपलेल्या पिकांचे फोटो काढले... नुकसानीची पाहणी झाली... पंचनामेही केले... मात्र प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? असा सवाल बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी विचारत आहेत.
पावसाअभावी पिके हातची गेली, शेतीसाठी केलेला खर्च बुडाला आणि आता पुढील हंगामाची तयारी करण्यासाठीही पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी अशा दुहेरी संकटात सापडले असून, पंचनाम्यांनंतर मदत कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पिकांबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. चारा उपलब्ध करणे आणि पशुधनाचा सांभाळ करणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे गावोगावी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी पशुपालक अशोक गणपत मोरे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
बारामती तालुक्यात खरीप हंगामात सुमारे ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यामध्ये बाजरी, मका, सूर्यफूल, भुईमूग, तूर, काही ठिकाणी ऊस तसेच फळबागांचा समावेश आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पंचनामे पूर्ण झाले असले, तरी नुकसानभरपाईची प्रतीक्षा कायम आहे.
आर्थिक गणित कोलमडले
पावसाच्या दीर्घ खंडामुळे बाजरी, कांदा आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत पिके करपल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर केलेला खर्च वाया गेल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
रब्बीच्या पेरणीचेही संकट
खरीप हंगामातील नुकसान भरून निघालेले नसताना रब्बी हंगामाच्या तयारीची वेळ आली आहे. जमिनीची मशागत करूनही पावसाची खात्री नसल्याने पेरणीबाबत संभ्रम आहे. पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी पैसा हवा; मात्र हातात उत्पन्न नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई वेळेत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाण्याअभावी पिके जळाली. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून काही तरी मदत मिळेल, या अपेक्षेने कागदपत्रे तयार करण्यासाठी १५० ते २०० रुपये खर्च केले. आधीच आर्थिक संकटात असताना हा अतिरिक्त खर्च करावा लागल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच गरजूंसाठी रोजगार हमीची कामे सुरू करावीत. तसेच पाण्याचे टँकर वाढवून द्यावेत.
- अशोक मोरे, सोनवडी सुपे
बारामती तालुक्यात खरीप हंगामात ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी सर्व पंचनामे केले आहेत. सध्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल.
- सचिन हाके, तालुका कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.