लोगो : जागतिक टपाल दिन विशेष
---
BAR26B13915
आनंद देवणे
---
BAR26B13914, BAR26B13912
आनंद देवणे यांच्या संग्रहातील काही टपाल तिकिटे.
---
बार्शीच्या देवणेंकडे देश-विदेशातील तिकिटांचा खजिना
ब्रिटिशकाळापासून आजपर्यंतच्या तिकिटांचा समावेश; विविध देशांच्या चलनांचाही संग्रह
प्रशांत घोडके : सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ८ : डिजिटल युगात संवादाची साधने बदलली, इंटरनेटमुळे जग जवळ आले; मात्र पत्रातून मिळणारी माया, आपुलकी, काळजी आणि जिव्हाळ्याची जागा कोणतेही माध्यम घेऊ शकलेले नाही. व्हॉट्सॲपवर चोवीस तास संपर्कात राहता येत असला तरी पत्राची ओढ आणि हुरहूर वेगळीच आहे. याच पत्रांचा महत्त्वाचा घटक असलेल्या टपाल तिकिटांचा दोन हजारांहून अधिक संग्रह बार्शीतील आनंद विजयकुमार देवणे यांनी जपला आहे.
डिजिटल सुविधा येण्यापूर्वी विचारांची देवाण- घेवाण, भावना व्यक्त करणे, ख्यालीखुशाली आणि संदेशासाठी टपाल पत्र हाच प्रमुख पर्याय होता. काळ बदलला, पत्रव्यवहार कमी झाला; मात्र टपाल तिकिटांनी इतिहास, संस्कृती आणि महत्त्वाच्या घटनांचा ठेवा जपला. देवणे यांच्या संग्रहात भारतासह अमेरिका, कॅनडा, जर्मनी, पोर्तुगाल, नायजेरिया, इटली, नॉर्वे यांसह ५० ते ६० देशांच्या तिकिटांचा समावेश आहे. ब्रिटिशकालीन तिकिटांपासून आजपर्यंतचा प्रवास त्यातून दिसतो.
भारतीय तिकिटांमध्ये संगीत वाद्ये, बायोगॅस, सौर व पवनऊर्जा, थोर नेते, मंदिरे, प्राणी, वारसा स्थळे, कठपुतळी, संशोधन तसेच महाभारत आणि श्रीराम जन्मभूमीवरील मोठ्या आकाराच्या अखंड तिकिटांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय संग्रहात फिफा विश्वचषक तसेच म्युनिक, बीजिंग, पॅरिस आदी ऑलिंपिक स्पर्धांवरील वैशिष्ट्यपूर्ण तिकिटे आहेत. क्रीडा, दुर्मिळ प्राणी, ऐतिहासिक वारसा आणि विविध देशांची वैशिष्ट्ये दर्शविणारी तिकिटे त्यांच्या संग्रहाला वेगळेपण देतात.
त्यांच्याकडे ४० ते ५० देशांच्या नोटा आणि ब्रिटिशकालीन नाण्यांचाही संग्रह आहे. आगामी काळात या संग्रहाचे प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. विद्यार्थी असो वा कोणीही, प्रत्येकाने आपल्या आवडीचा छंद जोपासावा. त्यातून वेगळा आनंद मिळतो आणि इतिहास, संस्कृती जतन करण्याची संधीही मिळते, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
---
वयाच्या १५व्या वर्षी लागली गोडी
बार्शीतील सोमवार पेठेत राहणारे व सध्या व्यवसाय करणारे देवणे यांनी इलेक्ट्रिकल डिप्लोमा केला आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी सुरू झालेला त्यांचा छंद आजही कायम आहे. मित्र, नातेवाईक, परिचितांकडून मिळालेली तसेच घरात आलेल्या पत्रांवरील तिकिटांतून त्यांनी संग्रह वाढविला. दुर्मिळ तिकिटांसाठी किंमत न पाहता ती मिळविण्याला त्यांनी प्राधान्य दिले. त्रिकोणी, चौकोनी, आयताकृती अशा विविध आकारांची तिकिटेही त्यांनी जपली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.