टाकळी हाजी, ता. ८ : दुष्काळ आणि हवामान बदलाच्या संकटात डाळिंबाचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत मधमाशांची साथ मिळावी, नैसर्गिक परागीभवनाला चालना मिळावी व उपलब्ध फुलांपासून चांगली फळधारणा व्हावी, यासाठी टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी आधुनिक शेतीसोबत निसर्गाची मदत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
उपलब्ध असलेल्या मर्यादित पाण्यावर डाळिंबाचे पीक यशस्वी करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर असताना, चांगली फळधारणा होण्यासाठी आता मधमाशांच्या पेट्या बागेत ठेवण्याचा नवा प्रयोग सुरू झाला आहे. टाकळी हाजी परिसरात हजारो हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झाली आहे. मात्र वाढती जंगलतोड, रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या आणि हवामानातील असमतोल यामुळे नैसर्गिक मधमाशांची संख्या कमी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी फुलांचे परागीभवन आणि फळधारणेचा प्रश्न निर्माण होत आहे. फळधारणेस मदत होण्यासाठी मधमाशांची साथ मिळावी, अशी आशा उत्पादकांना आहे.
डाळिंब बागेतील फूलधारणा आणि फळधारणा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. एका मधमाशी पेटीची किंमत सुमारे पाच हजार रुपये असून, एका हेक्टर क्षेत्रासाठी पाच ते सहा पेट्या ठेवण्याचे नियोजन केले जाते. सुरुवातीला खर्च येत असला तरी फळधारणेसाठी हा प्रयोग उपयुक्त ठरेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. राजस्थानमधून पेट्या आणल्या जात असून, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण होत आहे.
दरम्यान, मधपेट्या चोरीला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आता डाळिंबाबरोबरच पेटीचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे.
मधमाशा एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे परागीभवनास मदत होऊन फळधारणा सुधारू शकते. डाळिंबाबरोबरच आंबा, पेरू तसेच विविध भाजीपाला पिकांसाठीही मधमाशा उपयुक्त ठरतात.
- सुवर्णा आदक, कृषी अधिकारी
मधमाशा या निसर्गातील महत्त्वाच्या परागीभवन करणाऱ्या कीटकांपैकी आहेत. त्यांच्या माध्यमातून परागीभवनाची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. मधमाशांचे संवर्धन केल्यास शेती उत्पादनाला हातभार लागण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होते.
- कैलास गावडे, डाळिंब मार्गदर्शक
मधमाशा बागेत फिरताना दिसल्या की बाग जिवंत झाल्यासारखी वाटते. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध पाण्यावर पीक घेणे अवघड झाले आहे. अशा वेळी फुलांचे योग्य परागीभवन होऊन लवकर फळधारणा व्हावी, हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे मधपेट्यांवरील खर्च हा उत्पादनासाठी केलेली गुंतवणूक आहे.
- देवीदास पवार, डाळिंब उत्पादक शेतकरी
00989, 00988
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.