PNE26W19689
अहिल्यानगर ः स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतलेली आंतरराज्यीय गुन्हेगारांची टोळी.
बिअर बार फोडणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर, ता. १६ ः संगमनेर परिसरात बिअर बारचे दुकान फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक येथे जाऊन ही कारवाई केली.
फिर्यादी किशोर बाळाजी डोके (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) यांचे बिअर बार आरोपींनी फोडले होते. आरोपींनी शटरचे कुलूप तोडून हॉटेलमधील विविध कंपन्यांची तीन लाख सहा हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट व सीसी टिव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर चोरून नेला होता. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलिस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, महिला पोलिस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तसेच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी हसन हमजा कुट्टी याने त्याच्या साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नाशिक येथे जाऊन म्हाडा बिल्डिंग वडाळा येथून आरोपी हसन हमजा कुट्टी (रा. नवनाथनगर, शेवाडी, पंचवटी, नाशिक), आकाश सचिन सूर्यवंशी (रा. दत्त चौक, कालिका माता मंदिराजवळ सिडको, नाशिक), मेहताब गुलाम रसूल अन्सारी (मुळ रा. नुरीनगर, कटहार तांडा, ता. निंम्मेगड, जि. गिरटी, झारखंड) यांना ताब्यात घेतले. त्यांचा साथीदार बंटी दास (पूर्ण नाव माहीत नाही, रा. झारखंड) हा फरार आहे.
---
हॉटेलचालकानेच केली चोरीसाठी मदत
आरोपींकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल पळसे (ता. जि. नाशिक) येथील हॉटेलचालक किरण रामदास उगले व विवेक अरुण उगले यांना विकला असल्याची कबुली आरोपींनी दिली. विवेक याने चोरी करण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले असल्याची कबुली देखील आरोपींनी दिली. पथकाने किरण उगले व विवेक उगले यांचा शोध घेतला असता किरण उगले (रा. सामनेर, ता. इगतपुरी, जि. नाशिक, हल्ली रा. लकी बार रेस्टॉरंट, पळसे, नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले.
---
अनेक गुन्ह्यांची कबुली
ताब्यातील आरोपी किरण उगले यांच्याकडून चार लाख ५ हजार १६० रुपये किमतीची वेगवेगळ्या कंपन्यांची विदेशी दारू, दीड लाख रुपये किमतीची एक कार, कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल स्क्रू डायव्हर, असा एकूण पाच लाख ५५ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी संगमनेर तालुका, वावी, पिंपळगाव बसवंत आदी ठिकाणी गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.