SHR26B11988
SHR26B11989
सोबत मागील बातम्याेच कात्रणे जोडलेली आहेत.
सकाळ इम्पॅक्ट लोगो वापरावा
बेलापुरात खुर्दला मुलींच्या जन्मदारत वाढ
- ‘सकाळ’ची दखल अन् कारवाईने बदलले चित्र
- ८ महिन्यांत १५ मुलगे, तर १९ मुलींचा जन्म
महेश माळवे ः सकाळ वृत्तसेवा
श्रीरामपूर, ता. १७ : मुलींच्या जन्माचे प्रमाण चिंताजनक पातळीवर घसरलेल्या बेलापूर खुर्दच्या सामाजिक वास्तवाकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांतून गावात आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. प्रशासनाचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली गर्भलिंग निदानाविरोधात झालेली धडाकेबाज कारवाई, यांच्या जोरावर जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत गावात १५ मुलगे आणि १९ मुलींचा जन्म झाला आहे. त्यामुळे पूर्वी ४७७ पर्यंत खाली घसरलेले लिंग गुणोत्तर आता थेट १२३० वर पोहोचले आहे.
गर्भलिंग निदान करून मुलींच्या जन्माला अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तीविरोधात वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली कारवाई या मोहिमेतील टर्निंग पॉईंट ठरली. या कारवाईत डॉक्टर, मेडिकल चालक, वैद्यकीय साहित्याचे पुरवठादार, पती तसेच सोनोग्राफी मशीन विक्रेत्यांसह तब्बल २४ आरोपींना अटक करण्यात आली. या कठोर कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्यांमध्ये संदेश गेला.
''सकाळ''च्या बातमीची दखल घेत २६ जानेवारीला ग्रामपंचायत आवारात महसूल व पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व अंगणवाडी सेविकांची विशेष बैठक झाली. गावात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी गावनिहाय नव्हे, तर कुटुंबपातळीवर लक्ष देण्याचा निर्णय झाला. गर्भवती महिलांशी थेट संवाद, कुटुंबांचे समुपदेशन आणि मुलीच्या जन्माचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी विविध घटकांवर सोपवण्यात आली.
२६ जानेवारीच्या बैठकीत वाघचौरे यांनी गावात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या घरी जाऊन स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता गेल्या आठ महिन्यांत जन्मलेल्या सर्व १९ मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष स्वागत करण्यात येणार आहे.
------------
चौकट
गाव ठरले ''रोल मॉडेल''
‘सकाळ’ने प्रश्न मांडला, प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि पोलिसांनी गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटवर कठोर कारवाई केली. या त्रिसूत्रीमुळे बेलापूर खुर्दमध्ये आता सकारात्मक चित्र दिसत आहे. ४७७ (४४ मुलांमागे २१ मुली) वरून १२३० पर्यंत पोहोचलेले लिंग गुणोत्तर आणि आठ महिन्यांत मुलांपेक्षा अधिक झालेला मुलींचा जन्म हा बदलाचा आशादायी संकेत आहे. श्रीरामपूरसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण ४०० ते ५०० च्या दरम्यान असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर बेलापूर खुर्दने दाखवून दिलेली ही वाट इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.