धान बोनससाठी भंडाऱ्यात
आंदोलन उभारण्याचा इशारा
किसान संघाची पत्रकार परिषद; पंधरा दिवसांची दिली मुदत
ॲग्रोवन वृत्तसेवा
साकोली, जि. भंडारा : खरीप हंगाम २०२४-२५ मधील उर्वरित धान बोनस तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, तसेच आधारभूत धान खरेदी केंद्रांवर नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली असून या मागण्यांची पंधरा दिवसांत पूर्तता न झाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
पत्रकार परिषदेत किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. मागील अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा झालेली नसल्याचा दावा संघटनेने केला. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना तातडीने बोनस अदा करावा, अशी मागणी करण्यात आली. आधारभूत धान खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या सर्व धान उत्पादकांना कोणत्याही अटींशिवाय हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्यात यावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. शेतीपंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्याची मागणी करताना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या प्रश्नाकडेही किसान संघाने लक्ष वेधले. वन्यप्राण्यांच्या नुकसानभरपाईमध्ये माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीचाही समावेश करावा. नुकसान झाल्यानंतर तातडीने पंचनामा करून ठरावीक कालावधीत भरपाई अदा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
अस्वल, रानडुक्कर, मधमाशा व अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने अशा घटनांनाही नुकसानभरपाईच्या तरतुदीत समाविष्ट करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. ‘‘धान बोनससह शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शासनाने पंधरा दिवसांत मागण्यांवर निर्णय न घेतल्यास भारतीय किसान संघाच्या वतीने भंडारा जिल्ह्यात जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात येईल,’’ असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
पत्रकार परिषदेला जिल्हा मंत्री दिनेश कापगते, जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर कापगते, भास्कर चिरवतकर, वामन कापगते, मुकेश बावणे, सुरेश हरीणखेडे, एकनाथ दोनोडे, सूर्यभान निर्वाण, गिरीधारी लांजेवार, दीपक कापगते, सतीश मानकर, इंद्रायणी कापगते, माया टेंभुर्णे, रजनी करंजेकर व ईश्वर नागपुरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.