जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला
‘भारती’ नावाने मिळाली ओळख
वनस्पती अभ्यासक, संशोधक रहांगडाले दांपत्याचे यश
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः जुन्नर तालुक्याच्या पश्चिम घाट परिसरात वांगी कुळातील वनस्पतीशी साधर्म्य असलेली आणि आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली वनस्पती आढळून आली आहे. या वनस्पतीचे शास्त्रोक्त विश्लेषण केल्यानंतर तिला ‘भारती’ असे नाव देण्यात आले आहे.
वांगी कुळातील वनस्पतीप्रमाणे दिसणाऱ्या या दुर्लक्षित वनस्पतीचा शोध अभ्यासक आणि संशोधक डॉ. सविता व डॉ. संजयकुमार रहांगडाले यांनी लावला आहे. भारत देशाच्या नावावरून या वनस्पतीचे ‘भारती’ असे नामकरण करण्यात आले आहे. ‘एस्ट्रिपोमोईया भारती’ असे शास्त्रीय नाव देण्यात आलेल्या या वनस्पतीविषयीचे शास्त्रीय विवेचन २०२६ मध्ये ‘फायटोटेक्झा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
गेल्या २८ वर्षांपासून रहांगडाले दांपत्य जुन्नर तालुक्यातील पश्चिम घाटातील वनसंपदेचा अभ्यास करत आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थी सलमान शेख यांच्या मदतीने या दांपत्याने जुन्नर वनविभागाच्या विविध भागांतून या वनस्पतीचे नमुने गोळा केले. त्यानंतर प्रयोगशाळेत तिची फुले, फळे, परागकण आणि बीज यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. जागतिक पातळीवरील हर्बेरियममधील (वनस्पती नमुने) नमुन्यांशी तुलना केल्यानंतर ही वनस्पती विज्ञानासाठी पूर्णपणे नवीन असल्याचे सिद्ध झाले.
हे संशोधन करताना जुन्नर वनविभागाने दुर्गम वनक्षेत्रात प्रवेश, सर्वेक्षण आणि नमुने गोळा करण्यासाठी विशेष परवानगी दिली. वनविभागाच्या सहकार्यामुळे हे संशोधन शक्य झाले. संशोधित ‘एस्ट्रिपोमोईया’ हा वंश मॉर्निंग ग्लोरी कुळातील असून, तो पॅलेओट्रॉपिकल वितरणाचा मानला जातो. आज जगभरात या वंशाच्या केवळ १२ प्रजाती ज्ञात आहेत. त्यापैकी बहुतेक आफ्रिका खंडात आढळतात, असे डॉ. रहांगडाले यांनी सांगितले.
या प्रजातीचा मूळ संदर्भ नमुना आळे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव वनस्पतीशास्त्र हर्बेरियममध्ये वैज्ञानिक पद्धतीने जतन करून ठेवण्यात आला आहे. भविष्यात जगभरातील कोणत्याही वनस्पती संशोधक अथवा अभ्यासकाला अभ्यासासाठी हा नमुना येथे उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी नमूद केले. रहांगडाले दांपत्य गेल्या २८ वर्षांपासून शेकडो प्रजातींची माहिती संकलित करून तिचे पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाशन करत आहे. वनविभागाच्या सहकार्याने केलेल्या या कार्यामुळे जुन्नरच्या जैवविविधतेला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.
कोट ----
या शोधामागील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे या वनस्पतीचे बाह्य शाकीय स्वरूप. ही वनस्पती वांगी कुळातील वनस्पतींसारखी दिसते. त्यामुळे आजवर अनेक वनस्पतीशास्त्रज्ञांच्या नजरेतून ती सुटली आणि भारतात ती दुर्लक्षित टॅक्सा (Neglected Taxa) म्हणून राहिली होती. मात्र, चिकित्सक पद्धतीने तिचा सखोल अभ्यास केल्यामुळे तिचे वेगळेपण पुढे आले आणि तिचा स्वतंत्र आढळ अधोरेखित झाला.
- डॉ. सविता व डॉ. संजय रहांगडाले, संशोधक दांपत्य
-----------
फोटो ओळी
जुन्नर, जि. पुणे ः परिसरात आढळलेली आणि भारती या नावाने नवी ओळख मिळालेली वनस्पती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.