बारामती, ता. ७ : बीएचएमएस- सीसीएमपी पात्र डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनने स्वागत केले. बारामतीत झालेल्या बैठकीत राज्य शासन व मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत असोसिएशनने त्यांचे आभार व्यक्त केले.
या बैठकीदरम्यान नमूद केले की, बी.एच.एम.एस. हा साडेपाच वर्षांचा मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रम असून, त्यामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रातील मूलभूत तसेच क्लिनिकल शिक्षणाचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात सैद्धांतिक शिक्षणाबरोबरच रुग्णालयीन प्रशिक्षण आणि अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. त्यामुळे या पदवीधारकांना आधुनिक वैद्यकाचे आवश्यक शैक्षणिक ज्ञान व प्रत्यक्ष वैद्यकीय प्रशिक्षण प्राप्त होते.
याशिवाय, महाराष्ट्र शासनाने बी.एच.एम.एस. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्मोकोलॉजी हा अतिरिक्त अभ्यासक्रम सुरू केला असून, शासनमान्य वैद्यकीय महाविद्यालयातून हा अभ्यासक्रम व परीक्षा पूर्ण केलेल्या डॉक्टरांना संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी देण्यात येत आहे. असोसिएशनच्या मते ही नोंदणी कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून शासनाच्या निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. या
बैठकीत ग्रामीण व दुर्गम भागातील बी.एच.एम.एस. डॉक्टरांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख करण्यात आला.
‘सर्वसामान्य जनतेला त्रास होईल, अशा पद्धतीने आंदोलन करू नये. डॉक्टरांनी आंदोलन करू नये. आम्ही एका डॉक्टरमध्ये आणि दुसऱ्या डॉक्टरमध्ये भेदभाव करू शकत नाही. शासनाने हा निर्णय योग्य कायदेशीर तपासणीनंतर घेतला आहे,’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे असोसिएशनने स्वागत केले.
या बैठकीत उपस्थित सर्व डॉक्टरांनी स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात नसून कायद्याने बहाल केलेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी आहे. सर्व बी.एच.एम.एस. डॉक्टरांनी एकजुटीने, संयमाने व कायदेशीर मार्गाने पुढील लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.