भोर, ता. १७ : ‘‘राज्य परिवहन महामंडळाच्या भोर आगारातील कर्मचारी हे अपंग व दिव्यंगाची अवहेलना करीत असून आगार व्यवस्थापक त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना देत नाहीत आणि त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत,’’ म्हणून दिव्यांग ज्येष्ठ नागरिक सुरेश शेटे यांनी २६ जानेवारीला एस टी स्टँडवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आशयाचे निवेदन शेटे यांनी आगार व्यवस्थापनाला दिले असून पुणे विभागाचे विभागीय नियंत्रक यांना निवेदनाची प्रत पाठवली आहे. भोर आगाराने दिव्यांग बाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
‘‘एसटी बसमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना आणि अपंगांना सरकारने बसण्यासाठी जागा राखून दिलेली आहे, तरीही एसटीचे वाहक ज्येष्ठ नागरिकांना जागा उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे अपंग आणि ज्येष्ठ नागरिक यांना उभे राहून प्रवास करावा लागतोय. १८ डिसेंबरला या संदर्भात आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले गेले होते. परंतु यावर अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या नाहीत आणि संबंधित पत्राबद्दल कोणताही खुलासा दिलेला नाही. म्हणून शासकीय नियमांचे पालन न करता कामात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी आंदोलन करणार आहोत,’’ असे सुरेश शेटे यांनी सांगितले.