हिर्डोशी, ता. २६ : भोर तालुक्यात यावर्षी पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे बहुतांश भात शेती वाया गेली आहे. कडक उन्हामुळे भात खाचरातील पाणी आटून भात खाचरे कोरडी पडली. त्यामुळे पाण्याअभावी अनेक ठिकाणी भाताला लोंब्या आल्या नाहीत, तर जेथे लोंब्या आल्या तेथे दाण्यांऐवजी केवळ पळांज झाले आहे. भात खाचरात भात पाहण्यासाठी गेल्यावर केलेले कष्ट व वाया गेलेले पीक पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. पीक करपल्याने पेंढाही मिळणे अवघड झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यात यंदा खरीप हंगामात १६ हजार ४४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. त्यापैकी १० हजार ४९६ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका बसला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. लावणी झाल्यानंतर भात पिके चांगली तरारली होती. मात्र, भात पोसणीच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे यंदाची भात शेती वाया गेली. सुरुवातीला माळरानावरील भात खाचरे तर नंतर पाण्याची खाचरेही कोरडी पडली. हजारो रुपये खर्च करून कुटुंबासह कष्ट करत उभे केलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने यंदा शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे.
१९७२ ला दुष्काळ झाला होता. त्यावेळी आमचे वय लहान होते. परंतु आम्हाला आठवतंय तेव्हापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाल्याचे आठवत नाही असे साठ वयोगटातील काही शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
पुरेपूर मोबदला मिळण्याची मागणी
भोर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून शासनाकडून पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे भात क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाया गेले. त्यात प्रत्येक शेतकऱ्याचे कमी जास्त क्षेत्र आहे. त्यामुळे सरसकट देण्यात येणारी पाच हजार रुपये ही नुकसानभरपाई रक्कम तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पुरेपूर मोबदला भरपाई म्हणून मिळावी, अशी मागणी होत आहे.
१९७२ ला दुष्काळ झाला होता. त्यावेळी आमचे वय लहान होते. परंतु आम्हाला आठवतंय तेव्हापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाल्याचे आठवत नाही असे साठ वयोगटातील काही शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
दरवर्षी दहा-बारा पोती भात व्हायचा. परंतु, यंदा भाताकडे पाहिल्यावर एकही दाणा घरात येणार नाही. त्यामुळे शेतीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. शिवाय यंदा तांदूळ विकत घ्यावा लागणार असल्याने आर्थिक नुकसान होणार आहे.
- सिंधू मादगुडे, शेतकरी, नाटंबी (ता. भोर)
शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक गणिते अवलंबून असलेले भात पीक पूर्ण वाया गेले आहे. यापूर्वीही भात पिकाचे नुकसान झाले होते. त्यावेळी मिळणाऱ्या उत्पादनाच्या सरासरी दहा पोत्यांपैकी सात पोती तरी मिळायची. परंतु, यावर्षी मात्र भात पूर्ण वाया गेल्याने अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकसानीचे प्रमाण खूप मोठे आहे. शासनाकडून भरघोस मदत मिळावी.
- सुभाष कोंढाळकर, शेतकरी, चिखलावडे (ता. भोर)
04099
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.