बीडमधील पीकनुकसानीपोटी
७५५ कोटींची मागणी
- जिल्हा प्रशासनाकडून आढावा सादर
- ७ लाख ८४ हजार ४७९ हेक्टरवर नुकसान
ॲग्रोवन वृत्तसेवा
बीड : बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे ७ लाख ८४ हजार ४७९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा आढावा सादर करण्यात आला असून, या पोटी ७५४ कोटी ७९ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच (ता.५) दुष्काळ आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील पीक नुकसान आणि भरपाईचा आढावा सादर केला.
बैठकीत चारा, पिण्याचे पाणी आणि अपूर्ण योजना यावर प्रामुख्याने चर्चा झाली. शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी पाच हजार रुपये आगाऊ रक्कम देण्याचे नियोजन आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली दिवाळीची मदत आणि कर्जमाफीची सद्यःस्थिती याबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला.
....चौकट...
केवळ १२.०१ टक्के पाणीसाठा
बीड जिल्ह्यातील भूजल पातळीत ४.५५ मीटरने घट झाली असून, १६४ प्रकल्पांमध्ये केवळ १२.०१ टक्के पाणीसाठा उरला आहे. ५१ प्रकल्प कोरडे पडल्याने २९४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने २७१० अवैध पाणी जोडण्या खंडित करून २६६ पंप जप्त केले आहेत.पंकजा मुंडे यांनी भूजल पातळी कमी होण्यावर चिंता व्यक्त करत, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढील पावसाळ्यापर्यंतचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या आणि प्रलंबित पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिल्या.
..... चौकट -----
केवळ २६ दिवस पुरेल एवढाच चरा
जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा केवळ २६ दिवस पुरेल असा अंदाज आहे. वन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि सीएसआरच्या माध्यमातून चारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात चारा छावण्यांची गरज भासल्यास त्यात ''जिओ फेन्सिंग'' आणि जनावरांच्या टॅगिंगचा वापर करण्याचे ठरले आहे.
.....
बीड आणि जालना येथील स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. महिला बचत गटांच्या माध्यमातून जालना आणि बीडच्या रेशीम व हातमाग उत्पादनांचा स्वतंत्र ब्रँड तयार करून महिलांना रोजगार मिळवून देण्याचे नियोजन असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
... फोटो B17801 ....
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती आणि उपायोजना बैठकीला उपस्थित मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व इतर.