विरोधकांकडे भूलथापांशिवाय काहीच नाही
शिवेंद्रसिंहराजे भोसले; कुसुंबी गटातील भाजप उमेदवारांसाठी केंडबेत सांगता सभा
केळघर, ता. ५ : बोंडारवाडी धरण प्रकल्प केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करतील, याची पूर्ण खात्री आहे; परंतु विरोधकांकडे जनतेला सांगण्यासाठी काहीच नाही आणि विकासकामे करण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
जावळीच्या कुसुंबी गटातील भाजपच्या उमेदवार अर्चना रांजणे, आंबेघर गणाचे उमेदवार विजय सपकाळ, कुसुंबी गणातील उमेदवार पुष्पा चिकणे यांच्या प्रचारार्थ केडंबे येथे आयोजित प्रचार सांगता सभेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
या वेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मेढ्याचे उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, नगरसेवक शिवाजीराव देशमुख, सुशांत कांबळे, रिकी तिवाटणे, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, निर्मला कासुर्डे, बबनराव बेलोशे, सागर धनावडे, कविता धनावडे, बंडोपंत ओंबळे, जयश्री शेलार, शिवाजीराव मर्ढेकर, दत्तात्रय पवार, बळवंत पाडळे, विकास ओंबळे आदींची उपस्थिती होती.
राजकारणात दिलेला शब्द पाळणे महत्त्वाचे असते, अशी शिकवण (कै.) भाऊसाहेब महाराज यांनी आम्हाला दिली आहे. जावळी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची विकासकामे आपण मार्गी लावल्यामुळेच जनतेने सलग मला आमदार म्हणून निवडून दिले आहे. बोंडारवाडी धरण प्रकल्पासंदर्भात विरोधक निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या मनात माझ्या भूमिकेविषयी संभ्रम व गैरसमज निर्माण करत आहेत; परंतु या प्रकल्पास सर्वप्रथम तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जावळी तालुक्यासाठी कण्हेर जलाशयातून एक टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. इरिगेशन (सिंचन) विभागाच्या वतीने हे धरण करण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यापासून प्रयत्न करत आहे. याची माहिती धरण कृती समितीला आहे. विरोधकांनी जावळी तालुक्यात एकही काम आणले नाही. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी मी प्रयत्न केले असून, हेही काम लवकरच पूर्ण होणार आहे. सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपने यश मिळवले असून, जावळी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे सर्व उमेदवार हे भाजपचे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असून, विजयाचा गुलाल फक्त भाजपच्या कार्यकर्त्यावर दिसणार आहे, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
ज्ञानदेव रांजणे म्हणाले, ‘‘जावळी तालुक्यातील सर्वच विकासकामे बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनीच केली असून, भविष्यातही राहिलेली कामे तेच पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला, तरी भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन मंत्री भोसले यांची राजकीय ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करावेत.’’
फोटो :.......... KEL26A01367
केडंबे : कोपरा सभेत बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले. समवेत सदाशिव सपकाळ, ज्ञानदेव रांजणे, अर्चना रांजणे आदी.
....................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.