मुख्यमंत्र्यांसमक्षच भाजपमधील गटबाजी अधोरेखित
शहराध्यक्षांनी टाळला दोन्ही देशमुख आमदारांचा नामोल्लेख
सोलापूर, ता. २८ : भाजपच्या वतीने आयोजित विजयी सभा आणि सत्कार सोहळ्यात शहर भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील ज्येष्ठ आमदार विजय देशमुख व सुभाष देशमुख यांची नावे घेत शिष्टाचार पाळला, तर दुसरीकडे शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी मात्र दोन्ही आमदारांचा नामोल्लेख टाळत इतर आमदारांचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील गटबाजी अद्याप कायम असल्याची चर्चा रंगली.
महापालिका निवडणुकीपूर्वी काही नेत्यांच्या राजकीय प्रवेशापासून ते जागावाटपापर्यंत दोन्ही देशमुख यांच्या विरोधात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी असा संघर्ष पाहायला मिळाला होता. निवडणुकीच्या निकालानंतर पदाधिकारी निवड, स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या अशा विविध मुद्द्यांवर दोन्ही गटांतील शीतयुद्ध कायम राहिले. त्यात लिंगायत स्मशानभूमीच्या जागेच्या वादामुळे आणखी भर पडली होती.
हा वाद शमला असे वाटत असतानाच आज झालेल्या विजयी मेळाव्यात शहराध्यक्षा तडवळकर यांनी भाषणादरम्यान दोन्ही देशमुख आमदारांचा उल्लेख टाळल्याने गटबाजी पुन्हा एकदा समोर आली. उलट मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री गोरे यांनी दोन्ही देशमुखांची नावे अग्रक्रमाने घेत पक्षातील एकोपा दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या शहराध्यक्षांनीच गटबाजीला खतपाणी घातल्याची चर्चा सभास्थळी सुरू होती.
काय म्हणाल्या शहराध्यक्षा तडवळकर?
हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित सभेत प्रास्ताविक व स्वागताची जबाबदारी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यावर होती. भाषणाच्या सुरवातीला त्यांनी व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेतली; मात्र आमदार विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांचा उल्लेख केला नाही.
तसेच महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे आभार मानताना पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वामुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.