भाजपची स्पर्धा प्रादेशिक पक्षांशी
विधान परिषद निवडणुकीत चुरस, काँग्रेसला एकही जागा नाही
सकाळ न्यूज नेटवर्क
पाटणा/बंगळूर, ता. २८ : तीन राज्यांमध्ये २३ जागांवर झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि प्रादेशिक पक्षांमध्ये चुरस दिसून आली. मात्र, या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये प्रामुख्याने स्पर्धा दिसून आली. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातील चारही जागांवर भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने विजय मिळविला. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चार जागा मिळाल्या, तर विरोधी राष्ट्रीय जनता दल व जनसुराज पक्षांनीही अस्तित्व दाखवून दिले.
भाजप-समाजवादी पक्षात चुरस
उत्तर प्रदेशमध्ये ११ जागांवर झालेल्या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये चुरस दिसून आली. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूक होत असून, त्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक दोन्ही बाजूंकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. सायंकाळपर्यंतच्या मतमोजणीमध्ये भाजपने पाच, तर समाजवादी पक्षाने तीन जागा जिंकल्या आहेत. अन्य तीन जागांवर मतमोजणी सुरू होती. आग्रा पदवीधर, लखनौ शिक्षक, मेरठ शिक्षक, मेरठ पदवीधर आणि गोरखपूर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले. अलाहाबाद-झाशी पदवीधर, वाराणसी शिक्षक, आग्रा-अलीगड शिक्षक या तीन मतदारसंघांतील मतदारांनी समाजवादी पक्षाला कौल दिला. वाराणसी व लखनौ पदवीधर मतदारसंघांमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार आघाडीवर होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये आग्रा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार डॉ. आकाश यादव यांचा कपडे फाटलेल्या अवस्थेत दिसत होते. त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
बिहारमध्ये चार जागांवर ‘एनडीए’
बिहारमध्ये झालेल्या विधान परिषदेच्या आठ जागांवरील निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) चार जागांवर विजय मिळाला. राष्ट्रीय जनता दलाला तीन जागा मिळाल्या असून, एका जागेचा फायदा मिळाला आहे. काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने एका जागेवर विजय मिळाला. त्यामुळे विधानसभेपाठोपाठ जनसुराज पक्षाने विधान परिषदेमध्येही प्रवेश केला आहे.
बिहारमधील चार पदवीधर मतदारसंघ आणि चार शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक झाली. पदवीधर मतदारसंघांमध्ये मोठा फेरबदल झाला नाही, मात्र शिक्षक मतदारसंघातील चारही निकाल मोठी उलथापालथ करणारे ठरले. पाटणा शिक्षक मतदारसंघातील जागेवर भाजपचे नवलकिशोर यादव यांचा पराभव झाला. यादव तीन दशकांपासून या जागेवरून निवडून येत होते. राष्ट्रीय जनता दलाचे डॉ. संजीव कुमार विजयी झाले आहेत. दरभंगा शिक्षक मतदारसंघामध्ये जनसुराज पक्षाचे सुरेश राय यांनी काँग्रेसच्या मदनमोहन झा यांचा पराभव केला. झा गेल्या तीन निवडणुकांपासून या जागेवरून निवडून येत होते. सारण मतदारसंघामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार राहुल राज यांनी संयुक्त जनता दलाचे आनंद पुष्कर यांचा पराभव केला. तिरहुत मतदारसंघात भाजपच्या नरेंद्र सिंह यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संजयसिंह यांच्यावर मात केली होती. आमदार अनंत सिंह यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या पाटणा पदवीधर मतदारसंघात भाजपचे संयुक्त जनता दलाचे नीरजकुमार यांनी जनसुराज पक्षाचे डॉ. अनुज यांचा पराभव केला. अनंतसिंह यांचे नीरजकुमारांशी मतभेद असल्यामुळे त्यांनी डॉ. अनुज यांना पाठिंबा दिला होता. दरभंगा मतदारसंघात भाजपचे सर्वेशकुमार, कोसी येथे डॉ. एन. के. यादव आणि तिरहुत येथून वंशीधर बृजवासी यांनी आपापल्या जागा कायम राखल्या आहेत.
कर्नाटकात काँग्रेसला धक्का
कर्नाटक विधान परिषदेच्या चारही जागांच्या निवडणुकीत भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने विजय मिळविला आहे. सत्ताधारी काँग्रेसला एकही जागा मिळाली नसून, त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे.
बंगळूर शिक्षक मतदारसंघात ‘एनडीए’चे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य पुट्टण्णा यांचा पराभव केला. पुट्टण्णा यांनी यापूर्वी शिक्षक मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवला होता. ईशान्य शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार शशिल जी. नमोशी यांनी विजय मिळवला. पश्चिम पदवीधर मतदारसंघात भाजपचे एस. व्ही. संकनूर यांनी काँग्रेसचे मोहन लिंबिकाई यांच्यावर निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. क्षिण-पूर्व पदवीधर मतदारसंघातही भाजपचे उमेदवार के. एम. सुरेश यांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार शशी हुलिकुंटेमठ यांना पराभव पत्करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.