सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३० ः महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती झाली आहे. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील अनेकांना प्रवेश देऊन नगरसेवकासाठी तिकीट दिले आहे. यामुळे भाजपचे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याच्या भावनेतून इच्छुकांनी आज संताप व्यक्त केला.
हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाबाबत अंतिम बोलणी सुरू होती. त्यावेळी हॉटेलमध्ये येऊन इच्छुकांनी तिकीट न मिळाल्याने संताप व्यक्त केला. अनेक नाराजांनी यापूर्वी आमदार राजूमामा भोळे यांच्याबरोबर बैठका घेऊन तशा भावनाही बोलावून दाखविल्या. उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. यादिवशी तरी तिकीट आपल्याला मिळेल अशी आशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना होती. मात्र त्यावर भाजपने पाणी फिरवले आणि इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना तिकीट दिले. ‘आयारामां’मुळे निष्ठावंतांना डावलले असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
अन मामा भावुक
माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार मंगेश चव्हाण, आमदार भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, महिला आघाडीच्या प्रतिभा शिंदे, माजी आमदार मनीष जैन हे जागा वाटपाबाबत अंतिम बोलणी करीत होते.
भोळे हे मोबाईलवर बाहेर आले. त्याच दरम्यान प्रभाग एक मधील भाजपचे निष्ठावान महिला संगीता पाटील, तारा पटेल, राजेंद्र मराठे, विठ्ठल पाटील आदी यांनी त्यांना घेराव घातला. ‘‘गेली सात वर्षे आम्ही ‘भाजप’चे काम करीत आहोत. तुम्हाला आमदार करण्यात आम्ही जिवाचे पाणी केले. आजारी असताना तुमच्यासाठी काम केले. पूर्ण वॉर्ड भाजपमय केला. मग आमच्या अन्याय का झाला. तुम्ही बोलले पाहिजे मामा. तुम्ही आमदार आहात. ते मंत्री असले म्हणून काय झाले. आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत,’’ असे सांगत संगीता पाटील, तारा पटेल यांना रडू फुटले. त्यांच्या भावना समजावून घेताना भोळेही भावुक झाले होते. ‘महायुती होइल असे वाटले नव्हते. ऐनवेळी महायुतीचा निर्णय झाला,’ असे सांगत ते हॉटेलमधून बाहेर पडले.