जालना-छत्रपती संभाजीनगरमधून भाजपाचे सुहास शिरसाठ विजयी
छत्रपती संभाजीनगर : जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपने विजय मिळविला. महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुहास शिरसाठ यांनी तब्बल ४५४ मते मिळवली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना १३४ मते मिळाली. एम आय एमच्या उमेदवाराला ३५ मते मिळाली. जालना- छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा महायुतीने राखली असून पूर्वी ही जागा शिवसेनेकडे होती. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडून अंबादास दानवे यांनी विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळवला होता. ही जागा शिवसेनेकडेच राहावी यासाठी स्थानिक नेत्यांनी जोर लावला होता. परंतु नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला संख्याबळाच्या बाबतीत मागे टाकले होते.जालना महानगरपालिका भाजपने स्वबळावर लढत तिथे महापौर, उपमहापौर, सभापती अशी सगळीच महत्त्वाची पदे आपल्याकडे राखली होती. हीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाली.जालन्याप्रमाणेच संभाजीनगर महापालिकेची निवडणूक ही भाजपने शिवसेनेची युती न करता स्वबळावर लढवली होती. सत्ता स्थापनेच्या वेळेस भाजपने तेरा नगरसेवक असलेल्या शिवसेनेला सोबत घेत उपमहापौर पद दिले मात्र महापौर आणि स्थायी समिती सभापती पद आपल्याकडेच ठेवले होते.जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजपची कागदावर युती झाली मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजप २४ सदस्यांसह मोठा पक्ष ठरला. निवडणुकीत युती करूनही उमेदवार उभे केल्याने २३ सदस्य असलेल्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद उपाध्यक्षपद आणि महत्वाची सभापती पदे आपल्याकडे ठेवत शिंदे यांच्या शिवसेनेला बेदखल केले होते.
शिवसेनेकडून कुठलाही दगा फटका होऊ नये याची काळजी वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत घेतली होती.त्यामुळे भाजपच्या सुहास शिरसाठ यांचा विजय निश्चित मानला जात होता.महाविकास आघाडीने आधी देवयानी डोणगावकर यांना दिलेली उमेदवारी त्यांनी मागे घेतली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिकेचे गटनेते गणेश लोखंडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले. संख्याबळ नसल्याने त्यांना १३४ मतांवर समाधान मानावे लागले. एम आय एम ने इसाक खान यांना ३५ मते मिळाली. विजय उमेदवार सुहास शिरसाठ हे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सुहास शिरसाट यांच्या विजयाने भाजपच्या जिल्ह्यातील आमदारांची संख्या आता चार झाली आहे.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.