PNE26W57976
सोलापूर : भाजपने पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आढाव्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री जयकुमार गोरे.
नोंदणीची संधी गमावलेल्या भाजपची मतदानासाठी रणनीती
संपर्कासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात अधिक मतदार नोंदणीची संधी गमावलेल्या भाजपने अधिकाधिक मते मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत मतदारांशी संपर्कासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
गतवेळेस पुणे पदवीधर मतदारसंघ गमावलेल्या भाजपने यावेळेस ही जागा जिंकण्यासाठी कंबर कसली. सतत ‘निवडणूक मोड’वर राहणाऱ्या या पक्षाने सतत बैठका, मेळावे घेतले. मात्र, अभाविपसह भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते मतदार नोंदणीपासून दूर राहिले. त्यामुळे नगरसेवकांना मतदार नोंदणीचे उद्दिष्ट देत निधी देण्याचे आमिष पालकमंत्री गोरे यांना दाखवावे लागले होते. अधिक मतदारांची नोंदणी करण्याची संधी पक्षाने गमावली असली, तरी आता मतदारांशी संपर्क करून अधिकाधिक मतदान घडवून आणण्याच्या दृष्टीने रणनीती आखली आहे.
पक्षाने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मंगळवारी येथील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये भाजपची निवडणुकीबाबत पहिलीच बैठक झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन, तर २५ पदवीधर व शिक्षक मतदारांमागे दोन कार्यकर्त्यांना नेमण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी दिल्या.
या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, दिलीप माने, राम सातपुते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, गणेश चिवटे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विलास घुमरे, रणवीर राऊत, दिग्विजय बागल यांच्यासह तालुकाध्यक्ष, मंडल अध्यक्ष, जिल्हा परिषद व महानगरपालिकांचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
पालकमंत्र्यांच्या बैठकीला पहिल्यांदाच
आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती
भाजपने पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आढाव्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीला विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे हे आमदार गैरहजर होते. मात्र, पालकमंत्री गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुभाष देशमुख यांची पहिल्यांदाच उपस्थिती लक्षवेधी ठरली.
उजनी पर्यटन प्रकल्पाचे काम लवकरच
उजनीवरील एआय प्रकल्पाला जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. त्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे पालकमंत्री गोरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. महायुतीच्या उमेदवारांच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने बैठक झाली. बूथ आणि मतदारयादीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली आहे. पहिल्या टप्प्यातील तयारीबाबत चर्चा झाली आहे. महायुतीत समन्वय राहील. कोणीही बहिष्कार घालणार नाही. ते कोणी लिहून दिले आहे का, याचा विचार करावा लागेल, असे त्यांनी दहा हजार शिक्षक निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.